छत्रपती संभाजीनगर
७ जानेवारी २०२४: लेखक टी. एस. चव्हाण लिखित "भोईड" आणि "चिंगळी" या दोन कादंबऱ्यांचे दि. ७ जानेवारी २०२४ रोजी वसंतराव नाईक महाविद्यालय सभागृह येथे प्रा. डॉ. संजय मुन याच्या हस्ते प्रकाशन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात साहित्यिक प्रा. डॉ. ऋषीकेष कांबळे होते.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. संजय मून म्हणाले की, "वडार समाजाचे देशासाठी फार मोठे योगदान आहे. ते वास्तु निर्माते व शिल्पकार आहेत. अंजिठा वेरुळ येथील लेण्या कोरल्यामुळे देशाची सांस्कृतिक वारसा जगाला कळली. टी. एस. चव्हाण यांनी वडार समाजाचा इतिहास लिहला त्यामुळे समाजाचा चित्र व खरे वास्तव जगासमोर आला ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे."
भोईड या चरित्रात्मक कांदबरीवर प्रा. डॉ. नवनाथ गोरे यांनी भाष्य केले. त्यांनी सांगितले की, "ही कादंबरी वडार समाजातील एक वीर पुरुषाच्या जीवनावर आधारित आहे. या कादंबरीद्वारे वडार समाजातील जात पंचायत व रूढी परंपरेचे चित्र रेखाटले आहे. या कादंबरीमुळे वडार समाजाच्या वास्तव चित्रणात एक महत्त्वपूर्ण भर पडली आहे."
चिंगळी या कांदबरीवर प्रा. डॉ. संजय शिंदे यांनी भाष्य केले. त्यांनी सांगितले की, "ही कादंबरी वडार समाजातील एका सामान्य स्त्रीच्या जीवनावर आधारित आहे. या कादंबरीद्वारे वडार समाजातील स्त्रीच्या संघर्ष आणि त्यागाची गाथा मांडली आहे. या कादंबरीमुळे वडार समाजाच्या वास्तव चित्रणात एक महत्त्वपूर्ण भर पडली आहे."
अध्यक्षीय समारोप करताना प्रा. डॉ. ऋषीकेष कांबळे म्हणाले की, "वडार समाज शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आल्याशिवाय प्रगती अशक्य आहे. टी. एस. चव्हाण यांनी वडार समाजावर विपुल प्रमाणात लिखाण केले आहे. हे काम सोपे नाही. कठोर मेहनत आणि कठोर साधना शिवाय शक्य नाही. तेव्हा वडार समाजाला विकासाच्या प्रवाहात येण्यासाठी नक्कीच दिशा मिळेल. हे उपलब्ध साहित्य वाचलं पाहिजे. साहित्यामुळे समाजाला दिशा मिळते. म्हणून साहित्याला समाजाचा आरसा असे म्हटले जाते. भोईड आणि चिंगळी सुद्धा समाजाला योग्य दिशा दाखवतील, म्हणूनच लेखक टी. एस. चव्हाण कौतुकास पात्र आहेत."
या प्रसंगी प्रमुख पाहुणे जेष्ठ पत्रकार स.सो. खंडाळकर आणि साहित्यिक किशन पवार यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले. तसेच प्रख्यात विचारवंत के.ई.हरिदास, व अँड. डी व्ही खिल्लारे, बौद्धांचार्य वि. के. वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुत्र संचालन पुंडलिक धनगर यांनी केले व उपस्थित मान्यवरांचे आभार डी.व्ही. वाघमारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकनाथ खिल्लारे, दुर्गादास गुंडे, सचिन चव्हाण, हिरामण चव्हाण, नवनाथ जाधव यांनी परिश्रम घेतले.
या कादंबऱ्यांमुळे वडार समाजाच्या इतिहास आणि संस्कृतीची ओळख समाजाला होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

