भारतीय टेनिसस्टार सानिया मिर्झा हिच्याशी काडीमोड केल्यानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार व लिग क्रिकेट फेम पाकिस्तानी खेळाडू शोएब मलिक मॅच फिक्सिंग प्रकरणात अडकला असल्याचा संशय असून त्याच संशयाच्या भोवऱ्यात गुरफटला असताना तो बांगलादेश सोडून दुबईला पळाला आहे. जवळजवळ एक तपभर चाललेला संसार मोडून जेमतेम आठवडाभर लोटला नसेल तोच एक आश्चर्यचकित करणारी बातमी येऊन धडकली आणि मलिकच्या हितचिंतकात कुजबूज सुरु झाली आणि सानियाच्या गोटात जरासा दिलासा मिळाल्याची आनंदवार्ता होती.
सना जानेद या पाकिस्तानी अभिनेत्रीशी तिसरं लग्न केलेला शोएब मलिक या प्रकरणानंतर बांगलादेश प्रिमियर लिग खेळण्यासाठी बांगलादेशला गेला आणि त्याच लिग स्पर्धेत खेळताना त्याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर आलेल्या मिडीया रिपोर्टसनुसार तो ज्या संघाकडून खेळत होता त्या संघाने त्याच्याशी केलेला करार रद्द केला असून शोएब बांगलादेश सोडून दुबईला रवाना साला आहे.
सध्या बांगलादेशात बांगलादेश प्रिमियर लिग स्पर्धा सुरू असून २२ जानेवारी २०२४ रोजी फॉर्च्यून बारिशल आणि खुलना टायगर्स यांच्यातील सामना सुरू होता. प्रथम फलंदाजी करताना फॉर्च्यून बारिशलने वीस षटकात १८७ धावा ठोकल्या. त्यामध्ये मुशुफिकीर रहिमच्या झुंझार ६७ धावांचा समावेश होता. त्यानंतर टायर्गस विजयाचा पाठलाग करत असताना फॉर्च्यूनचा कर्णधार तमीम इकबालनने चौथे षटक टाकण्यासाठी शोएबला पाचारण केले.आणि तेथेच सगळे रामायण घडले. पहिले पाच चेंडू त्याने हुशार मुलासारखे टाकून फक्त सहाच धावा दिल्या. मात्र त्यानंतर बरंच काही बिघडल्यासारख झालं. राहिलेल्या एका वैध चेंडूसाठी शोएबने चक्क तीन अवैध चेंडू फेकले. म्हणजे त्याने तीन नोबॉल चेंडू फेकले. त्या एका वैध चेंडूसाठी त्याला बारा धावा मोजाव्या लागल्या. टायगर्सने दोन षटके राखून विजय मिळविला खरा पण त्यानंतर वेगळेच प्रकरण उद्भवले. शोएब मलिकवर थेट मॅच मिक्सिंगचाच आरोप होऊ लागला. वरकरणी हा खेळाचा भाग दिसत असला तरी त्यामागे एक वेगळेच कुटिल कारस्थान असल्याचा वास येत होता.
मिडिया रिपोर्ट्सनुसार या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार आहे. या प्रकरणात शोएब दोषी आढळला तर त्याला कडक शिक्षा सुनावली जाऊ शकते. त्यामुळे उर्वरित स्पर्धेत शोएब खेळणार नाही हे स्पष्टच दिसते. त्यामुळे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
दुबईला पोहोचल्यानंतर स्वतःच्या कर्तृत्वाची सफाई देताना मलिकने अधिकृत माहिता दिली. त्यामधे त्याने या सगळ्या अफवा असून त्यांचा मी धिक्कार करतो असे सांगितले. कर्णधार तमीम इकबाल सोबतच चर्चा करुन पुढचे नियोजन केले असल्याचे त्याने पुढे म्हंटले आहे. वरून पुर्वनियोजित कार्यक्रमानुसारच बांगलादेश सोडल्याचे आपल्या सारवा सारवीत म्हंटले आहे. आपल्या संघाच्या समर्थनासाठी मी कायम उपस्थित राहिल असे शेवटी सांगून, 'मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली ' या म्हणीचा प्रत्यय करून दिला.
भारतीय महिला टेनिस खेळाडू सानिया मिर्झाशी घटस्फोट घेतल्यानंतर भारतात त्याच्या विषयी संताप व्यक्त केला जात होता. मात्र या प्रकरणाने त्याच्या विषयी आगीचा डोंब उठला आहे. हि परिस्थिती निव्वळ भारतातच नसून त्याच्या मायदेशात अर्थात पाकिस्तानातही वेगळे वातावरण नाही. तेथील प्रसार व प्रचार माध्यमात तर मोठया प्राधान्यक्रमाने या प्रकरणाच्या चर्चा सुरू असून प्रसिद्धी माध्यमांना तर यामुळे सुग्रास खाद्यच मिळाले आहे. बऱ्याच ठिकाणी तर त्याने घटस्फोट दिलेल्या आयेशा सिद्दीकी व सानिया मिर्झा या घटस्फोटीत बायकांच्या तळतळाटीमुळेच या प्रकरणात शोएब मलिक गुंतल्याचे म्हंटले जात आहे.
शोएबची आंतरराष्ट्रीय कारकिर्द फारशी चमकदार नसली तर पाकचे नेतृत्व करण्याचे भाग्यही त्याला मिळाले आहे. त्याने एकूण ३५ कसोटीत १८९८ धावा, ३ शतके व ८ अर्धशतके ३२ बळी, १८झेल अशी कामगिरी केली. त्याचबरोबर २८७ एकदिवशीय सामन्यात ७५३४ धावा, ९ शतके, ४४ अर्धशतके, १५८ बळी व ९६ झेल. अशी वनडेत बऱ्यापैकी कामगिरी केली. तर टि२० सामन्यात १२४ वेळा पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले. त्यामध्ये २४३४ धावा, ९ अर्धशतके २८ बळी व ५०झेल अशी कामगिरी केली. मात्र र्ध्या हळकुंडात पिवळा झाल्यासारखी थोड्याशा यशाची हवा घुसली आणि बायांचा नाद लागला. या नादात तो आपल्या मर्यादा ओलंडत असल्याचं त्याच्या लक्षातच आलं नाही आणि आता तर दिशाच भरकटला. आता सापडला म्हणून लोकांना माहिती झालं या आधी किती वेळा लोकांच्या डोळ्यात धुळ फेकण्यात यशस्वी झाला अल्लाहच जाणो. मात्र चुक करणाऱ्याला शिक्षा होणे गरजेचे आहे त्याशिवाय तो वठणीवर येणारच नाही.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट पंच, प्रशिक्षक व समिक्षक. Email: dattavighave@gmail.com
मोबाईल नंबर -९०९६३७२०८२

