सातत्याने प्रकाशझोतात राहणे व पब्लिसिटी मिळविणे हे कोणाला नाही आवडत ? याचे सर्वात मोठे व चालते बोलते उदाहरण म्हणजे पाकिस्तान क्रिकेट व पाकिस्तानचे क्रिकेटपटू. मैदानावरील खेळात यांची कामगिरी सध्या वर्गातल्या 'ढ' मुलालाही लाजवेल अशी आहे. मागील तीन महिन्यात खेळलेल्या आठपैकी एकाही सामन्यात विजय यांच्या दिशेला फिरकलाही नाही व त्यांच्या संघाने सोडा एकाही क्रिकेटपटूने विजयाच्या वाटेला जाण्याचाही प्रयत्न केला नाही. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत वाताहत झाल्यानंतर ऑस्ट्रेलियात डब्ल्यूटिसी अंतर्गत तीन कसोट्यांच्या मालिकेत सुफडासाफ झाल्यानंतर न्यूझिलंडमध्ये झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत क्लिनस्विपचा फटका सहन करावा लागला. याचा अर्थ क्रिकेटींग मामल्यात त्यांची नाचक्कीच झाली नाही तर मोठी मानहानीही स्विकारावी लागली. आगामी टि२० विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने त्यांच्या तयारीकडे बघितले तर केवळ शुन्य असे म्हंटले तरी ते गैर ठरू नये.
पाकिस्तानचे राजकारणच मुळात राजकीय सर्कस आहे. यामध्ये कोण कधी कुठे कोलांटी उडी मारेल याची शाश्वती नसते. तेथील राजकारण लोकशाहीच्या गोंडस नावाखाली चालते. मात्र त्यात लोकशाहीचा लवलेशही नसतो तर फक्त जुलमी हुकुमशाही चालते. केवळ स्वत:चे काय खरे हे सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रकार तेथे चालतो. पाकिस्तानात मागील काही दिवसात राजकीय उलथापालथींचे अनेकपात्री प्रयोग चालूच आहेत. मात्र याचा पडद्यामागचा सूत्रधार वेगळाच आहे आणि हे समजण्याइतके आपणही चाणाक्ष आहात, होय लष्कर ! पाकिस्तानचे लष्कर व त्या लष्काराचे प्रमुखच सर्व सुत्र हलवतात. त्यांच्या इशाऱ्यावरून माजी क्रिकेट कर्णधार इम्रानखान पंतप्रधान असलेल्या निर्वाचित सरकारचा कडेलोट झाला. त्यानंतर पंतप्रधान इम्रान खान नियाझी यांना अटक करून नजरकैदेत टाकले व त्यांच्या पीटीआय या पक्षाचे तिन तेरा वाजवले व येत्या मार्च महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांत पीटीआय सत्तेच्या शर्यतीत नसेल याची दक्षता घेतली जात आहे. या दरम्यान शाहबाज शरीफचे कटपुतली सरकार आले व गेलेही.
त्यानंतर अनवर उल हक यांच्या नेतृत्वाखाली काळजीवाहू सरकार आले. सार्वत्रिक निवडणुका निष्पक्षपाती रितीने व्हाव्यात हे काळजीवाहू सरकारचे काम असताना इम्रानखान व त्याच्या उरल्यासुरल्या पीटीआय पक्षाला नेस्तनाबूत करण्याचे अनोखे राजकारण तेथील हंगामी सरकार काळजीपूर्वक करत असल्याचेच चित्र सध्या तरी दिसत आहे. सध्या न्युझिलंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान संघाच्या एका सामन्यात काही उत्साही प्रेक्षकांनी इम्रान खानचा फोटो असलेले पोस्टर झळकवले यानंतर पाकिस्तानातील इंटरनेट सुविधाच खंडीत करून आपल्या राजकीय दिवाळखोरीचे दर्शन हंगामी सरकारने घडविले.
पाकिस्तानच्या राजकारणाचा उल्लेख येथे यासाठी करावा लागला की, पाकिस्तानच्या घटनेनुसार तेथील पंतप्रधान पाकिस्तान क्रिकेटचे आश्रयदाते आहेत आणि त्यांच्या इशाऱ्यावरच पाकिस्तान क्रिकेट चालते. तेथील राजकिय सत्ता बदलली की पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( पीसीबी ) चेही सत्तांतरण होणे. इम्रान खान पंतप्रधानपदावर असताना रमिज राज पीसीबीचा चेअरमन होता. इम्रान पदच्युत झाल्यानंतर शाहबाज शरीफ पंतप्रधान बनला. त्यांच्या काळात नजम सेठी पीसीबी प्रमुख झाला. शाहबाज जाताच अनवर उल हक याचे हंगामी सरकार आले. त्यानंतर झका आश्रफ हा पाकिस्तान पिपल्स पार्टीचा नेता पीसीबी प्रमुख बनला. लष्करी हुकुमशहा प्रमाणे त्याने आपला कारभार चालवताना पीसीबीला राजकारणाचा अड्डाच बनविले. झकाच्या नावाखाली त्याचा मुलगाच पीसीबीची सत्ता चालवत होता.
झकाच्या साडेपाच महिन्यांच्या काळात आशिया चषक, वनडे विश्वकप, ऑस्ट्रेलिया दौरा, न्युझिलंड टूर पार पडल्या. मात्र या सर्व दौऱ्यात पाकिस्तानी संघाची कामगिरी रसातळाला जाऊन पाकिस्तानी क्रिकेट शब्दश: रस्त्यावर आले. क्रिकेट प्रशिक्षणाची कोणतीही पदवी नसलेल्या व प्रशासनाचा काडीचाही अनुभव नसलेल्या मोहम्मद हाफिजला संघाचा मुख्य प्रशिक्षक व पाकिस्तान क्रिकेटचा सर्वेसर्वा नियुक्त करून झका आश्रफने क्रिकेटींग विनोदच केला. विशेष म्हणजे या नियुक्त्या करताना त्याने कुठलेही नियुक्तीचे अधिकृतपत्र मोहम्मद हाफिजला दिले नाही. दोन दिवसांपूर्वीच झका आश्रफने आपल्या पीसीबी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन पाकिस्तान क्रिकेटला वाऱ्यावर सोडले. पीसीबीला नवीन अध्यक्ष मिळेल तेंव्हा मिळेल. पण हा लेख लिहिला जाईपर्यंत तरी पीसीबीला कोणी वाली नव्हते व हाफिज घटनाबाह्य व बेकायदेशीर रित्या पदावर आहे.
इतकेच नाही तर एक व्यक्ती एक पद या नियमाचा पुरता फालुदा करताना याच झकाने पाकिस्तान क्रिकेटमधून निवृत्त न झालेला व मागच्या सत्रात पाकिस्तान सुपर लिग (पीएसएल) मध्ये खेळत असलेल्या व पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचा क्रिडामंत्री रियाझ वहाबला निवड समिती प्रमुख करून आपल्याच विद्वत्तेचे दिवाळे काढले. आपणास आठवत असेलच याच वहाब रियाझने ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी माजी कर्णधार सलमान बटला निवड समिती सदस्य म्हणून निवडले व हाफिजच्या सांगण्यावरून दोन दिवसात पदच्युतही करून स्वत:चे व पाकिस्तान क्रिकेटचे हसे करून घेतले होते.
या सगळ्या राजकीय गदारोळात तेथील क्रिकेटवर नियत्रंण ठेवणारी यंत्रणाच अस्तित्वात नसताना क्रिकेट संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा कशी ठेवणार ? पाकिस्तानचा संघ प्रत्यक्ष मैदानावर विजयासाठी झगडत असताना यश त्यांच्याकडे पाठ फिरवून बसले आहे. यातच संघातही अंतर्गत कलह व धुसफूस सुरूच असून संघहितासाठी कोणीच खेळताना दिसत नसून आपली वैयक्तिक कामगिरी सुधारण्यासाठीच खेळाडू दिसतात आणि त्यातही त्यांना यश मिळत नसल्याने पाकची कामगिरी सातत्याने खालावत चालली आहे. त्यामुळेच पराभवा मागून पराभवांचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला आहे. हे सर्व कुठेतरी थांबायला हवं. नाही तर पाकिस्तान क्रिकेट मधील कधी काळी विश्वविजेता व झुंजार खेळाडूंनी भरलेला जिगरबाज संघ होता, अशी पुढच्या पिढीला सांगायची वेळ येऊ नये म्हणजे खूप काही कमावल्यासारखं होईल.
एकंदर विचार करता पाकिस्तान क्रिकेटची अवस्था अतिशय वाईट बनली असून त्यांचे दुःखाचे दिवस लगेचच संपतील असे तरी दूर दूरूनही दिसत नाही. त्यांच्या या परिस्थितीला फक्त आणि फक्त तेथील राजकारण व राजकारणीच जबाबदार असून जागतिक क्रिकेटच्या भल्यासाठी त्यांना लवकर उपरती होवो हिच आशा व अपेक्षा !
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट पंच, प्रशिक्षक व समिक्षक.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल नंबर -९०९६३७२०८२.

