२५ जानेवारी २०२४ रोजी म्हणजे गुरुवारी हैद्राबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर डब्ल्यूटीसी अंतर्गत भारत व इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचा श्रीगणेशा होईल. आयसीसी मानांकन व कागदोपत्री टिम इंग्लंड पेक्षा सरस दिसते. शिवाय मागील अकरा वर्षात टिम इंडिया मायदेशात अजय असल्याने भारतालाच मालिका विजयाचा प्रबळ दावेदार समजले जात आहे. सन २०१२-१३ च्या मालिकेत केविन पीटरसनच्या इंग्लिश संघानेच भारताला हरविले होते. त्यानंतर इंग्लंड तीन वेळा भारतात आले मात्र मार खाऊनच परत गेले. त्यामुळे यावेळी नेमकं काय होईल याची प्रतिक्षा केली जात आहे. बेन स्टोक्स व ब्रेंडन मॅकलम हे मुळचे न्यूझिलंडचे नागरीक या इंग्लिश संघाचे अनुक्रमे कर्णधार व प्रशिक्षक आहेत. या जोडगोळीने संघाची धुरा स्विकारल्यानंतर " बॅजबॉल " नावाचे नवे सुत्र वापरून त्यांनी इंग्लिश संघात मोठा बदल घडविला आहे. त्याचा परिणाम म्हणजे त्यांची विजयाची टक्केवारी वाढली असून इतर संघांसाठी ती धोक्याची घंटा ठरत आहे.
बॅजबॉल हे इंग्लिश प्रशिक्षक ब्रेंडन मॅकलमचे टोपण नाव आहे. खरे तर हे नाव त्याला आवडत नाही. मात्र त्याच नावे बनविलेल्या फॉर्मूल्याने त्याने इंग्लिश संघात खास करून फलंदाजांमध्ये आक्रमकपणे खेळण्याची शक्ति ओतली आहे. टि२०त खेळतात तशीच पध्दत व मानसिकता त्या बॅजबॉल फॉर्मूला भाग आहे. याचा बिनधास्त व आक्रमकपणा हा मूळ गाभा आहे.विकेट पडल्या तरी आक्रमण सुरूच ठेवायचे हा देखील बॅजबॉलचा मूळ गाभा आहे. हे सुत्र सध्या ते वापरत आहे.
त्याचा परिणाम इंग्लंडने म्हणजे मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध एशेस मालिकेत २-० पिछाडीवरून बरोबरी साधली. पाकिस्तानविरूध्दच्या मालिकेत एकाच दिवसात पाचशे धावा ठोकण्याचा पराक्रम केला. तर टिम इंडियाविरूध्द मायदेशात ३७६ धावांचा पाठलाग करून अशक्यप्राय विजयही मिळविला व त्याचबरोबर आणखी कसोटी विजय मिळविले असल्याने सर्वत्र बॅजबॉल या फॉर्मूल्याची चर्चा सुरू आहे. मात्र ती भारतात शंभर टक्के यशस्वी होईलच याची खात्री खुद्द इंग्लिश संघ व समर्थकांना नाही. त्याचे कारण म्हणजे भारतीय संघाच्या मानसिकतेत झालेला बदल.
टिम इंडियाला भारतात येऊन हरविण्याचे स्वप्न जगातील सर्वच देश बघतात. मग त्यात विश्वविजेता ऑस्ट्रेलियाही आहे. मात्र दरवेळेस ते सपाटून मार खाऊन रित्या हातानेच परत जातात. याचा धसका ऑस्ट्रेलियन टिमने इतका जोरात घेतला आहे की, मायदेशातही स्वस्त: च्या फेव्हरीट खेळपट्टयांवर, सर्वच अनुकूल वातावरणातही भारताविरूध्द जिंकू शकत नाही. मागील दोन कसोटी मालिकेत याची प्रचिती समस्त जगाने घेतली आहेच. विशेष म्हणजे गेल्या पस्तीस वर्षात केवळ भारत हाच एकमेव कसोटी खेळणारा देश आहे की, ज्याने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात जाऊन माती चारली आहे.
भारतीय संघाची मानसिकता खास करून कसोटी या प्रकारात पराकोटीला पोहोचली आहे. त्याचाच परिणाम म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅंपियनशिपच्या मागील दोनही चरणात टिम इंडिया अंतिम फेरीत पोहोचली. दुर्दवाने भारताला विजेतेपद मिळाले जरी नसले तरी सर्वच कसोटी खेळणाऱ्या देशांमध्ये टिम इंडियाचा दरारा वाढला आहे. भारताची फलंदाजीतील ताकद जगजाहीर आहेच मात्र फिरकी गोलंदाजांचा धाकही भल्याभल्या फलंदाजांच्या पायात थरकाप निर्माण करतो. शिवाय मागील काही वर्षात भारताच्या जलदगती माऱ्याला अशी काही धार आली आहे की, जगभरात कुठेही व कोणाहीविरूध्द भारतीय गोलंदाज एखाद दुसरा सामनाच नाही तर मालिका जिंकत आहेत. त्यामुळे टिम इंडिया आयसीसी मानांकनात अव्वल स्थानी राहात आहे.
भारतीय संघात जागतिक पातळीवर चमकणारे वेगवान गोलंदाज असले तरी भारतीय वातावरण व माती ही प्रामुख्याने फिरकी गोलंदाजांना सहाय्य करणारी असल्याने अगदी पूर्वीपासूनच भारतात खेळपट्टया फिरकी गोलंदाजांना पोषक अशाच असतात. त्यामुळे भारतात एका पेक्षा एक महान फिरकी गोलंदाज तयार झाले आहेत. त्याच बरोबर फिरकी गोलंदाजीच कायम खेळावी लागत असल्याने फिरकी गोलंदाजी चांगल्या प्रकारे खेळणारे निष्णात फलंदाजही तयार झाले आहेत. त्याची मोठी परंपरा असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय फलंदाजांचाच मोठा दबदबा आहे. क्रिकेटच्या सर्वच प्रारूपात सर्वाधिक धावा करणारे, शतकं ठोकणारे, षटकार - चौकार मारणारे फलंदाज भारताचेच आहेत. त्यामुळे भारतीय फलंदाज संघाचे आधारस्तंभ बनली असून त्यांच्या यशापशावर टिम इंडियाचे बरेचसे भवितव्य अवलंबून आहेत.
जगभरात वेगवान गोलंदाजी व त्यांना साथ देणाऱ्या खेळपट्टया मोठया प्रमाणात असताना फिरकी गोलंदाजी खेळणाऱ्या तरबेज फलंदाजांचं प्रमाण बरंचस कमी आहे. त्यातच भारतात आल्यानंतर पाहुण्या संघांचा फिरकी गोलंदाजी खेळण्याचा कमजोर दुवा लक्षात घेऊन बीसीसीआय त्यांच्या पाहुणचारासाठी खास करून लाल व काळ्या मातीचे वेगवेगळे आखाडे तयार करते व आपल्या कडील फिरकीची कला अवगत असलेल्या पारंगत जादूगारांना पाचारण करून पाहुण्यांचा पाहुणचार करायला सांगते. आजवरचा इतिहास सांगतो की, भारतातील फिरकीला धार्जिण्या खेळपट्टयांवर पाहुण्या फलंदाजांची फार काही चाललेली नाही. उलट रोग आलेल्या कोंबड्यांसारखे ते भारतीय फिरकी गोलंदाजांसमोर माना टाकतात. भारतातील फिरकीला मदत करणाऱ्या खेळपट्टयांचा पाहुण्या संघांनी इतका मोठा धसका घेतलेला असतो की सामन्यापूर्वीच आर्धी लढाईत हरलेले असतात. त्यामुळे राहिलेला सामना जिंकण्यास टिम इंडियाला फारसे अवघड जात नाही.
याच फिरकीला पोषक खेळपट्टयांवर परदेशी फलंदाज नागीण डान्स करत असताना परदेशी फिरकी गोलंदाजांचे चेंडू बोट भरही वळत नाही. त्याच खेळपट्टयांवर भारतीय फलंदाज नांगर टाकून भारतीय खोऱ्याने धावा ओढतात. येथे दोन्ही संघांच्या फिरकी गोलंदाज व फलंदाजांच्या कौशल्ये व मानसिकतेचा फरक दिसून येतो. याच दोन बाबी जय पराजयातला फरक ठरवून जातात. हो, भारतातील खेळपट्टया फिरकीला पोषक असतात किंवा बनविल्या जातात मात्र भारताचा हा डाव भारतीय संघावरच उलटल्याचे काही प्रकार घडले आहेत. परदेशी फिरकी गोलंदाजांच्या जाळ्यात भारतीय फलंदाज फसल्याचे व सामने गमावल्याचे उदाहरणेही आहेत. मात्र ते अतिशय दुर्मिळ असल्याने परदेशी संघाचे भारतात विजयाचे प्रमाणही नगण्य आहे. भारताचे फलंदाज फिरकी खेळताना कधी कधी अडखळतात मात्र असे कधीतरीच घडत असल्याने खास करून परदेशी फिरकी गोलंदाजांचे फिरकी गोलंदाजी करण्याचे कसब पणास लागते. तरीही भारतीय फलंदाजांची कामगिरीच भारताचे यशाचे रहस्य ठरते. याचे कारण स्पष्ट आहे भारताचे गोलंदाज आपली जबाबदारी इमाने इतबारे पार पाडतात व आपल्या फलंदाजांवर छोटेसे काम सोपवतात.
भारतात यशस्वी व्हायचे असेल तर निष्णात फिरकी गोलंदाज व तशीच खेळणारे तज्ञ फलंदाज संघात असणे गरजेचे आहे. हि बाब परदेशी संघांनी पक्की ध्यानात ठेवूनच भारतात यावे अन्यथा रित्या हाताने व पराभूत चेहऱ्याने मायदेशी परतण्या शिवाय गत्यंतर नाही.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट पंच, प्रशिक्षक व समिक्षक.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल नंबर -९०९६३७२०८२

