तीन जानेवारीला भारताचा द. आफ्रिका दौऱ्यावरचा शेवटचा कसोटी सामना केपटाऊन येथे सुरू होत आहे. दोन कसोटींच्या मालिकेतील पहिला सामना गमावल्याने टिम इंडियावर मालिका गमावण्याचे संकट उभे ठाकले असून केवळ दुसरा कसोटी जिंकणे हाच टिम इंडियासमोरचा एकमेव पर्याय उरला आहे आणि हे साध्य करणे इतकं सोपं नाही. याचं मोठं कारण म्हणजे भारतीय फलंदाजांचं वेगवान गोलंदाजांसमोर होत असलेलं पानिपत ! आजपर्यंत डावखुरी वेगवान गोलंदाजी भारतीय फलंदाजांची मोठी डोकेदुखी ठरत आली आहे. सध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही वनडे, टि२० मालिकेत व पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिका संघात नव्यानेच पदार्पण केलेल्या डावखुरा जलदगती गोलंदाज नांद्रे बर्गरने भारतीय फलंदाजांच्या नाकी नऊ आणले. पहिल्या कसोटीत त्याच्यापुढेच कागदोपत्री धावांच्या रासी व शतकांचे इमले बांधणारे भलेभले फलंदाज जमिनदोस्त झाले आणि बलाढय व आयसीसी मानांकनातील अव्वल क्रमांकाचा भारतीय संघ नामुष्कीजन्यरित्या पराभूत झाला. टिम इंडियाची कमजोरी असलेली डावखुरी वेगवान गोलंदाजी हा आजचा अभ्यासाचा विषय आपण निवडला आहे.
क्रिकेट खेळणं म्हणजे काही संघांसाठी डाव्या हातचा खेळ असतो. हि म्हण आपण ऐकली असेलच. पण हि म्हण क्रिकेटमध्ये अगदी चपखल बसते. क्रिकेटमध्ये डावखुरे आणि उजवी हाताचे खेळाडू असतात. यामध्ये उजव्या हाताच्या खेळाडूंचे प्रमाण मोठे असते. त्यामुळे त्यांच्या खेळण्याच्या पद्धतीचा सहजासहजी अभ्यास करता येतो. परंतु डावखुरे खेळाडू कमी प्रमाणात असल्यामुळे त्यांच्या अनोख्या शैलीचा लाभ त्यांच्या संघांना मोठया प्रमाणात होत आला आहे. त्यामुळे प्रत्येक संघ आपल्या ताफ्यात डावखुरे फलंदाज, गोलंदाज घेऊन संघाचे संतुलन राखण्याचा प्रयत्न करतात. तसे बघाल तर प्रत्येक संघात डावखुरे खेळाडू असतातच असे नाही. मात्र ज्यांच्याकडे डावखुऱ्या खेळाडूंचा भरणा असतो त्यांची कामगिरी इतर संंघांच्या तुलनेत अतिशय उठावदार होते व त्या संघाचे विजयाचेे प्रमाणही इतरांच्या तुलनेत उजवे असते.
डावखुरा फलंदाजाची शैली उजव्या हाताच्या फलंदाजाच्या तुलनेत नेत्रदिपक असते. मात्र डावी उजवी फलंदाजाची जोडी जेंव्हा मैदानात खेळत असते तेंव्हा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघास त्रासदायक ठरते. प्रत्येक वेळेस क्षेत्ररक्षण बदलण्याची त्रासदायक तसदी संबंधीत कर्णधारास घ्यावी लागते. त्यामुळे त्यांच्याकडून चुका होऊ शकतात व याचा कळत न कळत लाभ फलंदाजी करणाऱ्या संघास होतो. परंतु याच तऱ्हेने डावखुरे गोलंदाज संघात असले तर त्या संघाची व त्याच्या कर्णधाराची चंगळच होऊन जाते.डावखुरे फिरकी गोलंदाज जितके फलंदाजांना त्रासादायक ठरतात त्याही पेक्षा घातक डावखुरे जलदगती गोलंदाज ठरतात. त्यांचे झपकन आत येणारे चेंडू फलंदाज कितीही पारंगत असला तरी त्याला चकवून जातात. डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांचे आऊटस्विंगरही खतरनाकच असतात. शिवाय त्यांचे उसळते चेंडू उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांपेक्षा जास्तच जिवघेणे असतात. जगातल्या बऱ्याचश्या संघांकडे अशा प्रकारचे चांगले डावखुरे जलदगती गोलंदाज आहेत व त्याचा लाभ त्यांना सातत्याने होत असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असल्याचे आपण बघत आहोतच.
मात्र याबाबत टिम इंडिया कमजोर असल्याचे विदारक चित्र समस्त क्रिकेट जगत उघड्या डोळ्यांनी बघत आहे. भारतीय संघाकडे मागील दशकात ना चांगले डावखुरे फलंदाज होते ना दर्जेदार डावखुरे वेगवान गोलंदाज नव्हते. कदाचित याच मोठया कमजोरीमुळे टिम इंडिया गत दशकात आयसीसी स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवू शकली नाही.
सन २००७, २०११ व २०१३ ला टिम इंडियाने आयसीच्या स्पर्धा जिंकल्या त्यामध्ये झहीर खान, इरफान पठाण, आर पी सिंगसारखे घातक डावखुरे वेगवान गोलंदाज होते. त्यामुळे विरोधी फलंदाजांना नियंत्रणात ठेवण्यात हे गोलंदाज यशस्वी ठरले. त्याचे फळ भारताला तीन मोठया स्पर्धा जिंकण्याच्या रूपाने मिळाले. यानंतर भारतीय संघात डावखुरे वेगवान गोलंदाज अभावानेच दिसले त्याचा फार मोठा फटका भारतीय संघाला बसला. सन २०१४ ते २०२३ या दशकात भारतीय संघ अतिशय भक्कम व चांगला असायचा. सातत्याने आयसीसी स्पर्धात सरस कामगिरी केली. मात्र विजेतेपदाच्या दरवाज्यातून चार वेळा माघारी फिरावे लागले. याचे प्रमुख कारण म्हणजे डावखुरे जलदगती गोलंदाज !
डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज समजणे कोणत्याही फलंदाजासाठी नेहमीच कठीण असते. उजव्या हाताच्या गोलंदाजाच्या तुलनेत, डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाचा चेंडू अस्ताव्यस्त कोनात येतो आणि फलंदाजासाठी एक आंधळे स्थान निर्माण करतो. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी, जेव्हा जेव्हा डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाच्या वेगामुळे चेंडू आतील बाजूस येतो तेव्हा फलंदाज एलबीडब्ल्यू होण्याची शक्यता देखील वाढते. अशा स्थितीत फलंदाज विकेट वाचवण्यासाठी मोठे फटके खेळण्याऐवजी बचावात्मक मोडमध्ये येतात.
आजकाल अनेक खेळपट्ट्या फलंदाजांसाठी अधिक उपयुक्त आहेत आणि त्यामुळे विकेट घेण्यात डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाची भूमिका वाढते. कारण फलंदाज उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध तेवढाच सराव करतात जितका ते डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध करतात.
कोणतीही मोठी स्पर्धा जिंकणाऱ्या संघाकडे किमान एक डावखुरा वेगवान गोलंदाज असतो, असे अनेकदा दिसून आले आहे.
सन २००३ च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत खेळलेल्या भारताकडे आशिष नेहरासारखा दर्जेदार डावखुरा गोलंदाज होता. सन २००७ मध्ये टि२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाकडे इरफान पठाण आणि रुद्रप्रताप सिंग यांच्या रूपाने दोन उत्कृष्ट डावखुरे वेगवान गोलंदाज होते. यानंतर झहीर खान सन २०११ च्या विश्वविजेत्या भारतीय संघात होता. सन २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचलेल्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये मिचेल स्टार्क आणि ट्रेंट बोल्ट सारखे डावखुरे वेगवान गोलंदाज होते आणि ते दोघेही या स्पर्धेतील संयुक्त सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज होते. सन २०२१ च्या टी-२० विश्वचषकातही अशीच समीकरणे होती. सन २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्येही पाकिस्तानच्या मोहम्मद आमिरने भारतीय फलंदाजांना खूप त्रास दिला होता.
सन २०२१ व २३ च्या वर्ल्ड टेस्ट चँपीयनशिप फायनलमध्ये अनुक्रमे ट्रेंट बोल्ट व मिचेल स्टार्क यांनी न्यूझिलंड व ऑस्ट्रेलियाला भारताविरूद्ध सरस ठरविले. सन २०२३च्या वनडे विश्वचषकातही मिचेल स्टार्कचा भारताचा कर्दनकाळ ठरल्याने भारताचे विजेतेपद मिळविण्याचे स्वप्न भंगले.
भारताकडे दर्जेदार डावखुरे गोलंदाज नसल्याने भारताच्या फलंदाजांना सरावास चांगली संधी मिळत नसल्याने डावखुऱ्या गोलंदाजांविरूद्धचा भारतीय फलंदाजांचा गृहपाठ कच्चाच राहून जातो व त्याचा तोटा प्रत्यक्ष आंतरराष्ट्रीय सामन्यात दिसून येतो. त्यासाठी भारतात लवकरात लवकर डावखुरे वेगवान गोलंदाज तयार करणे गरजेचे आहे. भारतासाठी भविष्याची शिदोरी ठरू पाहणारे काही डावखुरे वेगवान गोलंदाज तयार होत आहे. त्यापैकी .टी नटराजन, यश दयाल, मोहसिन खान, अर्शदीपसिंह, चेतन साकरिया, खलील अहमद, मुकेश चौधरी यांच्यावर बीसीसीआय व आयपीएल फ्रँचाईसी मेहनत घेत आहेत त्यामुळे येत्या काही दिवसात टिम इंडियाचा डावखुऱ्या गोलंदाजांचा दुष्काळ संपू शकेल.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल नंबर -९०९६३७२०८२

