सन २०२३ मध्ये विविध खेळातील एकूण २६ खेळाडूंना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार मिळाला. त्यामध्ये क्रिकेटमधील भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला ९ जानेवारी २०२४ रोजी भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा २०२३ मधील सनसनाटी कामगिरीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शमीच्या नावाची शिफारस केली होती. शमीने २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेतील अवघ्या ७ सामन्यात २४ बळी घेऊन स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून मान मिळविला.
सन २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत पहिल्या चार सामन्यांसाठी मोहम्मद शमीचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला नव्हता. १९ ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्ध हार्दिक पांड्याला घोट्याला दुखापत झाल्यानंतर शमीचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता. शमीने स्पर्धेत झटपट प्रभाव पाडताना साखळी सामन्यात न्युझिलंडविरुद्ध भारतीय संघासाठी पाच बळी घेतले. त्यानंतर शमीने मागे फिरून पाहिलेच नाही. उपांत्य फेरीत त्याने न्युझिलंडचा धुव्वा उडवताना आणि ७ बळी घेत भारताचे काम सोपे केले. शमीने स्पर्धेत एकूण २४ बळी घेतले आणि भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या पुढे गेला.
अर्जुन पुरस्कार हा क्रिडा क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या क्रिडापटूंना दिला जाणारा हा भारताचा दुसरा सर्वोच्च क्रिडा पुरस्कार आहे. महाभारतातील सर्वोत्तम धनुर्धर अर्जुनाच्या नावे हा पुरस्कार सुरू करण्यात आला. महाभारतातील कुरूक्षेत्रातील युध्दा दरम्यान भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचे सारथी बनले आणि भगवत गितेचं अमुल्य ज्ञान अर्जुनाला दिले. राम, लक्ष्मण व परशुरामानंतर अर्जुन प्राचीन भारतातील महान योद्धयांपैकी एक गणला जातो. हिंदु धर्मात अर्जुनाला मानाचे स्थान दिले जाते. त्याच सर्वोत्तम धनुर्धराच्या सन्मानार्थ भारतातील क्रिडापटूंना अर्जुन पुरस्कार नावाचा सन्मान दिला जातो.
सन १९६१ मध्ये सुरू झालेला हा पुरस्कार सन १९९१-९२ मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार सुरू होईपर्यंतचा भारताचा सर्वोच्च क्रिडा पुरस्कार म्हणून गणला जायचा. आता तो दोन नंबरचा सर्वोच्च पुरस्कार समजला जातो. भारत सरकारच्या क्रिडा व युवा मंत्रालयातर्फे दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारात अर्जुनाची कास्याची प्रतिमा, सन्मानपत्र व रोख १५ लाख रूपयांचा धनादेश भारताच्या महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जातो. त्यासाठी क्रिडा व युवा मंत्रालयातर्फे एक निवड समिती स्थापित केली जाते व ती समिती मागील चार वर्षात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कार्य करून देशाचे नाव रोशन करणाऱ्या खेळाडूस अर्जुन पुरस्काराने सन्मानीत करण्याची अधिकृत घोषणा करते.
सन १९६१ पासून क्रिकेटमध्ये उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूंना अर्जुन अवॉर्ड द्यायला सुरुवात झाली त्यानंतर सन २०२३ पर्यंत ५९ पुरुष व महिला क्रिकेट पटूंना हा सन्मान देण्यात आला आहे. यामध्ये ४७ पुरूष व १२ महिला क्रिकेट खेळाडू सामिल आहेत. सलीम दुर्रानी (१९६१), मन्सूर अली खान पतोडी (१९६४), विजय मांजरेकर (१९६५),चंदू बोर्डे (१९६६), अजित वाडेकर (१९६७), ईरापल्ली प्रसन्ना (१९६८), बिशन सिंह बेदी (१९६९), दिलीप सरदेसाई (१९७०), श्रीनिवासराघवन व्यंकटराघवन ( १९७१), एकनाथ सोलकर ( १९७२), बी एस चंद्रशेखर (१९७२), अंजन भट्टाचार्जी (१९७४),सुनील गावस्कर (१९७५), शांता रंगास्वामी (1976), गुंडप्पा विश्वनाथ (१९७७-७८), कपिल देव (१९७९-८०), चेतन चौहान (१९८०-८१), सैयद किरमानी (१९८०-८१), दिलीप वेंगसरकर (१९८२), मोहिंदर अमरनाथ (१९८२), डायना एडुल्जी (१९८३), रवी शास्त्री (१९८४), शुभांगी कुलकर्णी (१९८५), मोहम्मद अजहरुद्दीन (१९८६), संध्या अग्रवाल (१९८६), मदनलाल शर्मा (१९८७), मनोज प्रभाकर (१९९३), किरन मोरे (१९९४), सचिन तेंडुलकर (१९९५), अनिल कुंबळे (१९९६), जवागल श्रीनाथ (१९९७), अजय जडेजा (१९९७), सौरव गांगुली (१९९७), राहुल द्रविड (१९९८), नयन मोंगीया (१९९८), व्यंकटेश प्रसाद (२०००), व्ही. व्ही. एस. लक्ष्मण (२००१), विरेंद्र सेहवाग (२००२), हरभजन सिंह (२००३) मिताली राज (२००३),अंजू जैन (२००५), अंजुम चोपडा (२००६), गौतम गंभीर (२००७), झूलन गोस्वामी (२०१०),झहीर खान (२०११), युवराज सिंग (२०१२), विराट कोहली (२०१३), रविचंद्रन अश्विन (२०१४), रोहित शर्मा (२०१५), अजिंक्य रहाणे (२०१६), चेतेश्वर पुजारा (२०१७), हरमनप्रीत कौर (२०१७), स्मृति मनधाना (२०१८), पूनम यादव (२०१८), रविंद्र जडेजा (२०१९), इशांत शर्मा ( २०२०), दिप्ती शर्मा (२०२०), शिखर धवन (२०२१), मोहम्मद शमी (२०२३) यांना आतापर्यंत पुरस्कृत करण्यात आले.
वैयक्तीक जीवनात अनेक चढउतार व यातना सहन करता करता आंतरराष्ट्रीय स्तरावर टिम इंडियासाठी नेहमी अर्जुनासारखी कामगिरी करणाऱ्या मोहम्मद शमीला त्याच्या भावी आयुष्य व क्रिकेट कारकिर्दीसाठी शुभेच्छा व पुरस्कारासाठी महभिनंदन !!!
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल नंबर -९०९६३७२०८२.

