खाकी वर्दीतील माणुसकीमुळे अनाथ अर्भकाला मायेची सावली ; इंदापूर पोलिस अधिकाऱ्यांचे होत आहे कौतुक.
फोटो: सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार,महिला पोलीस कर्मचारी माधुरी लडकत यांच्या हस्ते भारतीय समाजसेवा केंद्र कोरेगाव पार्क, पुणे या संस्थेने हे बालक कायदेशीर प्रक्रिया पार पाडत ताब्यात घेतले.
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील बिजवडी (ता - इंदापूर) येथे अज्ञात दोन तासाचे जन्मलेले नवजात महिला जातीचे अर्भक आढळल्याने धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. १६ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील ससाने यांच्या घराच्या पाठीमागील वन विभागाच्या क्षेत्रा मधील कच्या रोडच्या बाजूला असलेल्या चारीमध्ये एक महिला जातीचे दोन तासाचे जन्मलेले नवजात जिवंत बालक (अर्भक) सापडले होते. या अर्भकाला इंदापूर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून इंदापूर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये प्राथमिक उपचार करत पुढील उपचारासाठी संबंधित अर्भकाला डॉक्टर व महिला पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने सोलापूर येथे पाठवले होते.
बावीस दिवसांनी सदर स्त्री जातीच्या अर्भकास उपचारानंतर इंदापूर येथे पुन्हा आणण्यात आले. यावेळी खाकी वर्दीतील
माणुसकीचा झरा पाहण्यास मिळाला. यावेळी भारतीय समाजसेवा केंद्र कोरेगाव पार्क, पुणे या संस्थेने हे बालक कायदेशीर प्रक्रिया पार पाडत ताब्यात घेतले. यामुळे या अनाथ अर्भकाला मायेची सावली मिळाली. महिला पोलीस कर्मचारी माधुरी लडकत यांनी अर्भक सांभाळण्यापासून ते संस्थेच्या ताब्यात देण्यापर्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली. यावेळी इंदापूर
पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांच्या हस्ते या अनाथ अर्भकास संबंधीत संस्थेतेकडे देण्यात आले. यावेळी संस्थेच्या सदस्या जयश्री केंद्रे, स. फौ. भरत जाधव, दिनेश चोरमले, अकबर शेख, शनिदेव कांबळे, अनिल नागरगोजे, वैभव मदने आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

