आदर्श शिक्षणाचा मापदंड म्हणजे कौठळीची काळेलवस्ती शाळा... महेंद्र रेडके
इंदापूर : शुक्रवार दि.26 जानेवारी 2024 रोजी कौठळी ता. इंदापूर येथील काळेलवस्ती शाळेवरती देशाचा 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून विविध कलागुणांचे अविष्कार सादर करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष स्वप्निल काळे, महेंद्र रेडके,माजी सरपंच प्रकाश काळेल यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी महेंद्र रेडके होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात रेडके म्हणाले की काळेलवस्ती या ठिकाणी शाळेसाठी इमारत नव्हती. अशावेळी माजी सरपंच प्रकाश काळेल यांनी स्वतःची जमीन शाळेसाठी दान दिली त्यामुळेही शाळेची इमारत उभी राहू शकली. त्यांनी आपल्या सरपंच पदाच्या कार्यकाळात पाच वस्ती शाळा मंजूर करून घेतल्या. आणि त्यात शेकडो विद्यार्थी आता शिक्षण घेण्याचे काम करत आहेत. या ठिकाणचे मुख्याध्यापक प्रशांत भिसे व सहशिक्षक तानाजी नरळे हे देखील विद्यार्थ्यांसाठी खूप कष्ट घेत असून त्यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच शारीरिक व सांस्कृतिक गुणवत्ता जपली आहे.उत्कृष्ट ज्ञानदानाबद्दल सहशिक्षक तानाजी नरळे यांचा सन्मान करण्यात आला.येथील पालक वर्ग देखील सजग असून त्यांचे शाळेसाठी नेहमीच सहकार्य लाभले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी पालकांनी मोठी आर्थिक देणगी शाळेसाठी जमा केली. विद्यार्थ्यांसोबतच महिलावर्ग देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक प्रशांत भिसे यांनी केले. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

