देशाचे नेतृत्व आज नरेंद्र मोदी यांच्या सारख्या सक्षम नेत्याच्या हातात : अजित पवार
इंदापूर : देशाचे नेतृत्व आज नरेंद्र मोदी यांच्या सारख्या सक्षम नेत्याच्या हातात आहे. हीच गॅरंटी आहे. हे विकासाची पूर्ती करणारे सरकार आहे. नरेंद्र मोदी तिस-यावेळी पंतप्रधान व्हावेत असे यासाठी अधिकाधिक खासदार निवडून आणावेत असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज ( दि.२५) येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता व शेतकरी मेळाव्यात बोलताना केले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हा मेळावा झाला. आ. दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, सुरेश घुले, सूनेत्रा पवार या मेळाव्यास उपस्थित होत्या.
अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले की, राजकारणात परिस्थितीनुरुप निर्णय घ्यावे लागतात. मध्यंतरी एक वर्षाच्या काळात आपण सत्तेवर नसल्याने विकास कामे थांबली होती. त्यांना स्थगिती मिळाली होती. निधी मिळण्यास मर्यादा आल्या होत्या. यामध्ये लोकांचे नुकसान होवू लागले होते. त्यामुळे लोकांच्या कामाच्या दबावातून कार्यकर्त्यांच्या पाठबळावर आपण व आपल्या सहका-यांनी वेगळी भूमिका घ्यायचे ठरवले. समोरुन सत्तेत येण्याचे निमंत्रण होते. ते स्वीकारुन भाजप सरकारमध्ये सामील झालो पण विचारधारा सोडली नाही, असे ते म्हणाले.
नरेंद्र मोदी याच्याकडेच पुढील काळात पंतप्रधानपद द्यावे असे देशातील ६५ टक्के जनतेची मत आहे. मोदींकडे विकासाची दृष्टी आहे. अथक काम करण्याची क्षमता आहे. त्यांना पंतप्रधान करण्यासाठी चारशे खासदार निवडून आणायचे आहेत. महाराष्ट्रात ही जबाबदारी पार पाडायची आहे.त्यांच्या विचारांचा एक एक खासदार निवडून आणायचा आहे. त्यासाठी आपल्याबरोबर आपले मित्रपक्ष खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. आपल्यात व सहकारी पक्षात मतभेद व्हावेत यासाठी अनेक लोक देव पाण्यात बुडवून बसले आहेत. पण आपण तसे होणार नाही याची काळजी द्यावी. मित्रपक्षाचा अवमान होईल, भावना दुखावल्या जातील असे कोणी बोलू नये अशी विनंती पवार यांनी
केली.
इंदिरा गांधींचा पराभव करण्यासाठी विरोधक एकवटले. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार आले. ती ताकद मतदानामध्ये आहे. मतदार जे बटन दाबतील, ती व्यक्ती निवडून येवू शकते, असे सांगून पवार म्हणाले की, आपल्याला काम करायचे आहे. मागचा काळ वेगळा होता. त्या काळात आपण ज्यांना ज्यांना साथ द्यायला पाहिजे होती, त्यांना ती दिली. आत्ताचा काळ वेगळा आहे. आजच्या विरोधकांमध्ये एकवाक्यता नाही. चार दिशेला चार तोंडे आहेत. त्यांच्या आवाहनामुळे भावनिक होवू नका. प्रत्येकाचा एक काळ असतो. काही दिवस सासवांचे असतात तसेच सुनांचे ही असतात, अशी टिप्पणी पवार यांनी केली.
१९९९ ते २०१४ या काळात ज्या प्रमाणे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आमदारकी खासदारकीला एकत्र आघाडी करायची व जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत वेगळी लढवायची त्याच धर्तीवर येथून पुढच्या काळात महायुतीतील घटकपक्षासमवेत काम करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे. त्यामुळे भाजप नेते कार्यकर्त्यांची मदत घ्यावी लागणार आहे, असे संकेत ही पवार यांनी दिले.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांची भाषणे झाली.
●● राजकारणात कधी कधी परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात. इतिहासात वेळेनुसार गटातटाचे राजकारण झाल्याचे दाखले आहेत. २०१९ ला विचारसरणी जुळत नसताना देखील महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेबरोबर गेला होता. त्या ही वेळेस भाजपने एकत्र मिळून सरकार करावे अशी भूमिका घेतली होती. दोन पक्षाच्या आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसला कदाचित सत्तेचा वाटा जास्त मिळाला असता. कार्यकर्त्यांना वेगवेगळी पदे देता आली असती. मात्र पक्षाने त्यावेळी वेगळी भूमिका घेतली. सर्वांनी तो निर्णय मान्य केला. त्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यानी चांगले काम केले. आपण ही निधीचे चांगले पाठबळ दिले. मात्र त्या काळात शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष पुढे आला. एकनाथ शिंदे अनेक मंत्री आमदारांसमवेत बाहेर पडले. त्यामुळे आपल्या कामांना खीळ बसली.
आपला लोकप्रतिनिधी सत्ताधारी पक्षाच्या विचाराचा गेला तर आम्ही राज्यात जेवढा निधी देतो त्यापेक्षा किती तरी जास्त निधी केंद्रातून मिळू शकतो. मोठे प्रकल्प, योजने आणू शकतो. ती जबाबदारी मी घेतो काळजी कशाला करता, असे सांगून साखर कारखान्यावरची कित्येक वर्षांची आयकर विभागाची टांगती तलवार भाजप सरकारने काढून टाकली. अन्यथा दहा हजार कोटी रुपयांचा आयकर शेतक-यांना भरावा लागला असता, असे काम करण्यात धमक असावी लागते, असे पवार यांनी सांगितले.

