भारत दौऱ्यावर असलेल्या इंग्लंडविरूध्द उर्वरीत तीन सामन्यांसाठी टिम इंडियाची घोषणा मोठ्या दिरंगाई नंतर बीसीसीआयकडून करण्यात आली. सर्वांना उत्सुकता होती ती माजी कर्णधार व प्रमुख खेळाडू विराट कोहलीच्या उपलब्धतेची. मात्र पहिल्या दोन कसोटींप्रमाणेच बाकीच्या तीन सामन्यातही न खेळण्याच्या त्याच्या निर्णयावर तो ठाम राहिल्याने निवड समितीला आपला मार्ग निवडावा लागला. कोहली या मालिकेत नेमकं कोणत्या कारणांमुळे खेळत नाही हे तमाम क्रिकेट रसिकांना सांगणे विराट कोहलीला फारसे महत्वाचे व गरजेचे वाटले नाही त्यामुळे ते सांगण्याची तसदी त्यानेही घेतली नाही. तसेच बीसीसीआयने त्याचा नेमके खेळण्याचे कारण गुलदस्त्यात ठेऊन क्रिकेट रसिकांना त्यांच्या आवडत्या खेळाडूचे सुख दुःख जाणून घेण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवले. वास्तविक या बहुचर्चित " कारणाला " कोहलीनेच विनाकारण ताणवले असल्याने त्याच्या फॅन्सचा त्याच्या विषयी असलेला आदरभाव कमी झाल्यास त्याला तोच जबाबदार असेल.
सद्यस्थितीत प्रमुख फलंदाजांच्या दुखापती व काहींच्या खराब फॉर्ममुळे कधी नव्हे तो भारतीय संघ मायदेशात दबावाखाली खेळताना दिसत आहे. कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म त्याच्यावर रुसला आहे. शुभमन गिल आता कुठे लाईनवर आल्याचे दिसते मात्र पुन्हा त्याची गाडी कधी रुळावरून घसरेल याचा भरवसा नाही. श्रेयस अय्यर डावाची सुरुवात तर चांगली करतो परंतु जम बसल्यावर अर्ध्यावर डाव सोडून रंगलेली मैफील सोडून मधूनच निघून जातो. त्यामुळे त्याने त्याचे आसन स्वतःच डळमळीत केलं. पाठदुखीचा त्रास व अर्धवट फॉर्म यांच्या प्रादुर्भावाने त्याला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात यशस्वी ठरलेले केएल राहुल व रविंद्र जडेजा वायझॅक कसोटीत दुखापतीमुळे खेळले नव्हते. मात्र तेही संघात परतल्याने फलंदाजीची फळी थोडीशी ताकदवर झाल्यासारखे वाटते. परंतु समितीने दोघांच्याही फिटनेसवर खात्री न दिल्यामुळे ते स्कॉडमध्ये असले तरी अंतिम संघात निवडले जातील का हे सामन्याच्या दिवशी असलेल्या त्यांच्या तंदुरुस्तीवर अवलंबून आहे. ते जर दोघेही खेळले तर मागच्या कसोटीत खेळलेला रजत पाटीदार पुन्हा बेंचवर जाईल. या परिस्थितीत सर्फराज खानचे कसोटी पदार्पण लांबणीवर पडणार असल्याचे दिसते.
विराट कोहलीची संघाला गरज असताना त्याचे न खेळणे संघाला वरकरणी जड जात असले, इतर फलंदाज फॉर्मात नसले तरी यशस्वी जयस्वालने पहिल्या कसोटीत ८६ व १५, दुसऱ्या कसोटीत २०९ व १७ अशा खेळी केल्या आहेत. पहिल्या डावात तो यशस्वी होताना दिसतो मात्र दुसऱ्या डावात तशीच अपेक्षा असताना नेमकं अपयश आडवं येतं. नेमका तोच चांगल्या फॉर्मात असल्याने दुसऱ्या डावातील त्याचे लवकर बाद होणे संघासाठी त्रासदायक ठरत आहे. यशस्वीने दुसऱ्या डावावरही लक्ष केंद्रित केलं तर ते वैयक्तिक त्याच्यासाठी व संघासाठीह फायदेशीर ठरेल. पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात २३१ धावांचे किरकोळ आव्हान मोठया नावांच्या फलंदाजांना पेलले नाही, कारण त्या डावात कोणीच जबाबदारीने खेळले नव्हते. वायझॅकला दुसऱ्या डावात नेमकी शुभमनची बॅट चालली म्हणून इंग्लंड समोर मोठे आव्हान उभे करता आले व बाकीचे काम गोलंदाजांनी पार पाडले, सामना जिंकला म्हणून इतर फलंदाजाच्या अपयशाची मोठी चर्चा झाली नाही. आता पुढील तिनही सामन्यात इंग्लंडकडून कडवा प्रतिकार होणार असल्याने सर्वच फलंदाजांना जास्त मेहनत करावी लागणार आहे.
पहिल्या दोन कसोटी सामन्यानंतर मालिका बरोबरीत आहे. परंतु जरा वेगळीच माहिती प्रकाशात आल्यामुळे खास करून भारतीय गोटात काहीशी अस्वस्थता जाणवते. भारताकडे जगातला सर्वोत्तम फिरकी मारा आहे. तर इंग्लंडकडे उपलब्ध असलेल्या चारपैकी दोन गोलंदाजांनी याच मालिकेत कसोटीचा श्रीगणेशा केला. तर एक जण यापूर्वी दोनच कसोटी खेळला आहे. महत्वाचा व अनुभवी फिरकी गोलंदाज जॅक लिच दुखापतीमुळे संघाबाहेर गेला. तरीही या नवीन फिरकी गोलंदाजांनी त्यामधे ज्यो रूटच्या पार्ट टाईम फिरकीचीही मदत मिळते, यांनी मिळून ३३ भारतीय फलंदाजाचे बळी घेतले. तर रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल व कुलदिप यादव या जगविख्यात फिरकीपटूंना इंग्लंडचे फक्त २३ बळी घेता आले. या गोलंदाजी दरम्यान इंग्लिश फिरकीपटूंनी भारतीय फिरकी गोलंदाजांच्या तुलनेत धावाही कमी दिल्या आहेत व बळी घेण्यामागे भारतीयांची सरासरीही जास्त आहे. विशेष म्हणजे टिम इंडियात नव्या फलंदाजांचा समावेश आहे तर इंग्लंड संघात अनुभवी व बॅजबॉलचे एक्सपर्ट फलंदाज संघात आहे. मात्र दुसरा असा निष्कर्ष निघतो की, भारतीय फिरकीपटूंनी इंग्लिश फलंदाजांना त्यांच्या कौशल्याच्या बळावर प्रत्येक वेळी बाद केले आहे. तर भारताकडून एखाद दुसरा अपवाद वगळता इतर सर्वच फलंदाजांनी धावा वाढविण्याच्या हट्टापायी मोठे फटके मारण्याच्या नादात आपले बळी हकनाक गमावले आहे. भारतीय फलंदाजांनी काहीसा संयम राखला तर टिम इंडियाची परवड थांबेल व विजयाकडे सहज वाटचाल करता येईल.
श्रीकर भरतची फलंदाज व यष्टीरक्षक म्हणून कामगीरी चिंताजनक असल्यामुळे त्याच्या ऐवजी ईशान किशनच्या नावावर विचार होईल असे वाटले होते. मात्र पुन्हा एकदा संघ प्रबंधन व निवड समिती त्यावर तोडगा काढू शकले नाही. हि बाब संघाला प्रत्यक्ष सामन्यात त्रासदायक ठरू शकते. ध्रुव जुरेल या नव्या यष्टीरक्षकाला पदार्पणाची संधी मिळते का हे बघायला नक्कीच आनंदायक वाटेल. परंतु केएल राहुल पुर्ण फिट असला तर तो यष्टीमागे दिसू शकतो व भरतला बाहेर ठेवून सर्फराजला संघात घेऊन फलंदाजीही बळकट केली जाऊ शकतो.
दोन्ही संघात एक मोठा फरक जर कोणी सोडून जात असेल तर तो आहे जसप्रित बुमराहा. भारतीय खेळपट्टया फिरकीला धार्जीण्या असल्या तरी बुमराहाने आपल्या धारदार माऱ्याने दोन सामन्यात पंधरा बळी घेऊन भारताला मालिकेत बरोबरीत आणले. आता तर आयसीसी रँकींग मध्ये अव्वल स्थानी गेल्याने त्याच्या गुणवत्तेला खरोखर न्यायच मिळाला आहे. कोहलीच्या गैरहजेरीत भारताने मागील दहापैकी सात सामने जिंकले, एक अनिर्णित राहिला व दोन गमावले. या आकडेवारीचा विचार केला तर कोहलीच्या गैरहजेरीचा विशेष फरक जाणवत नसून उलट नवीन खेळाडूंना स्वतःला सिध्द करण्याची संधीच मिळते व त्यात ते यशस्वीही ठरत आहेत. त्यामुळे हेकेखोर व स्वतःची मनमानी करणाऱ्या कोहलीला वेगळाच विराट चमत्कार दाखविण्याची संधी नवोदितांनी दवडू नये. शेवटच्या तीन सामन्यांसाठी निवडलेला भारतीय संघ असा आहे - रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, के. एल. राहुल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), के. एस. भरत (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप (* खेळाडूंचा प्लेईंग ११ मधील समावेश फिटनेस टेस्टवर अवलंबून आहे)
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
मोबाईल नंबर - ९०९६३७२०८२

