shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आशियामध्ये यशस्वी ठरलेला सेना देश इंग्लंड..


            सेना देश हा शब्द आपल्या अनेकदा कानावर अथवा वाचनात आला असेल. सेना देश म्हणजे साऊथ आफ्रिका (एस), इंग्लंड (ई), न्यूझिलंड (एन) आणि ऑस्ट्रेलिया (ए). या चार गोऱ्या बहुल लोकसंख्या असलेल्या देशांच्या नावाच्या इंग्रजी अद्याक्षराने सुरू होणाऱ्या एकत्रित नावाला सेना देश असे संबोधले जाते. या देशातील वातावरण कायमस्वरूपी थंड असल्याने व येथील खेळपट्टया स्विंग व सिम होणाऱ्या असल्याने तेथे जलदगती गोलंदाजांची मोठ्या प्रमाणात चलती असते. त्यामुळे या देशातील क्रिकेटकडे वळलेले व प्रामुख्याने गोलंदाज बनू पाहणारे मुले जलदगती गोलंदाजीकडे जास्त वळतात. त्या तुलनेने फिरकी गोलंदाजीकडे वळणाऱ्या मुलांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे तेथील फलंदाजांना वेगवान गोलंदाजांचाच सराव मोठया प्रमाणात होतो. तसेच तेथील खेळपट्टया फिरकी गोलंदाजांना विशेष मदत करणाऱ्या नसल्यामुळे सेना देशातील फलंदाजांना फिरकी गोलंदाजी खेळण्यास फारसे मिळत नाही.

            त्या उलट आशिया खंडातील खास करून क्रिकेट खेळणाऱ्या प्रमुख भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश मधील हवामान चार चार महिन्यानंतर बदलणारे असल्याने खेळपट्टया बऱ्याचशा क्षुष्क असतात. त्यामुळे तेथील खेळपट्टयांना लवकर तडे जातात. परिणामतः या खेळपट्टयांवर फिरकी गोलंदाजांना यशस्वी होण्यास जास्त वाव मिळतो. त्यामुळे आशिया खंडात फिरकी गोलंदाजीकडे वळणारे मुलं जास्त प्रमाणात आढळतात. म्हणून आशिया खंडात दर्जेदार फिरकी गोलंदाज सातत्याने उदयास आले आहेतपंपटपपप व जागतिक क्रिकेटच्या नकाशावर नावारूपाला आले आहेत. त्याचाच भाग असलेले मुथय्या मुरलीधरन, शेन वॉर्न,अनिल कुंबळे,नाथन लायन, रविचंद्रन आश्विन, सारखे फिरकी गोलंदाज जगातल्या सर्वात जास्त बळी घेणाऱ्या गोलंदाजात आघाडीवर आहेत. वॉर्न व लायन हे ऑस्ट्रेलियन गोलंदाज आपल्या देशातील वातावरण फिरकीस पोषक नसले तरी नैसर्गिक गुणवत व मेहनतीच्या बळावर जागतिक दर्जाचे फिरकी गोलंदाज बनले. 
            मागील काही वर्षात सेना देशांनी आपापल्या देशात फिरकी गोलंदाजांना पोषक परिस्थिती बनण्यासाठी फिरकीस सहाय्य करणाऱ्या खेळपट्टया बनविण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत केल्या असून आशिया खंडातील सेवा निवृत्त प्रथितयश फिरकीपटूंना आपल्या देशातील फलंदाजांना प्रशिक्षित करण्यास करारबद्ध केले जाऊ लागले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात सेना देशातील फलंदाज फिरकी गोलंदाजी खेळण्यास सुधारले आहेत. त्याचा परिणाम आशिया खंडातील त्यांची कामगिरीही चांगल्या प्रकारे होऊ लागली आहे. मात्र या चार देशांपैकी इंग्लंडची मागील अकरा वर्षात आशिया खंडात नेत्रदिपक कामगिरी झाली आहे. या बाबतीत इंग्लंडने वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियालाही मागे टाकले आहेत. टिम इंडियाने  मागील अकरा वर्षात भारतात खेळताना एकदाही मालिका गमावली नाही. भारताला भारतात हरविणारा शेवटचा संघ इंग्लंडच असून सन २०१२-१३ च्या दौऱ्यात आलिस्टर कुकच्या इंग्लिश संघाने चार कसोटींच्या मालिकेत २-१ अशी सरशी मिळविली होती. त्यानंतर जगभरातले सर्वच संघ भारताला भारतात हरविण्यासाठी जीवाची बाजी लावून प्रयत्न करत आहेत मात्र त्यांना काही केल्या यश मिळत नाही. 

             सध्या इंग्लिश संघ भारत दौऱ्यावर असून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. त्यापैकी पहिली कसोटी हैद्राबादला संपन्न झाली. त्यामध्ये विजयाचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय संघ अनपेक्षितरित्या २८ धावांनी पराभूत झाले. इंग्लंडच्या विजयात कसोटी पदार्पण करणारा डावखुरा फिरकी गोलंदाज टॉम हार्टले चमकला. शिवाय यजमान भारतीय संघातील प्रमुख खेळाडू रविंद्र जडेजा, केएल राहुल जायबंदी झाल्याने संघाबाहेर गेले. तसेच मोहम्मद शमी पायाची दुखापत व विराट कोहली वैयक्तिक कारणांमुळे संघात नसल्याने संघ कमजोर बनला आहे. त्यामुळे भारताच्या या दुर्बलतेचा लाभ घेऊन उर्वरीत सामन्यात भारतावर दबाव वाढवून विजय मिळवत मालिका जिंकण्याचा इंग्लंडचा डाव आहे. त्यासाठी आणखी चार सामने खेळावे लागणार असल्याने नेमकं काय होईल हे येणारा काळच सांगेल.
              पण इंग्लंडने मागील अकरा वर्षात आशिया खंडात इतर सेनादेशांपेक्षा सरस कामगिरी कशी केली याच्यावर थोडासा प्रकाशझोत टाकूया. सन २०१३ नंतर इंग्लंडची आशिया खंडातील कामगिरी सुधारली आहे. मागील अकरा वर्षात ते आशिया खंडात तेवीस कसोटी खेळले, त्यापैकी अकरा सामने इंग्लंड जिंकले आहेत. याचा अर्थ सरळ निघतो की, फिरकीला मदत करणाऱ्या आशियाई खेळपट्टयांवर इंग्लंडचा बोलबाला राहिला आहे. तसे बघाल तर आशियात ते दहा सामने हारलेही आहेत व दोन सामने अनिर्णित राहिलेत. भले ते दहा सामने हारले असले तरी  त्यांच्या पूर्वीच्या आकडेवारीवर नजर टाकली तर तिच्यात मोठा फरक जाणवतो. या दरम्यान त्यांचे विजयाचे प्रमाण ४७.८० % इतके आहे. हि बाब येथे प्रामुख्याने अधोरेखीत कराविशी वाटते.

             इंग्लंडच्या तुलनेत ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड व दक्षिण आफ्रिकेल्या मागील अकरा वर्षातील आशियातील कामगिरीत मोठी तफावत दिसते. ऑस्ट्रेलियाने सन २०१३नंतर आशियात २६ सामने खेळले, त्यातील १६ गमावले व फक्त पाचच जिंकले. तर पाच सामने अनिर्णित राहिलेत. कांगारूच्याया विजयाचे प्रमाण केवळ १९.२० % इतकेच आहे. न्युझिलंडने मागील अकरा वर्षात १९ पैकी पाच जिंकले, सात हारले व सात अनिर्णित राहिलेत. त्यांच्या विजयाची टक्केवारी २६.३० इतकी आहे. दक्षिण आफ्रिकेने आशियात सतरा कसोटी खेळले. त्यातील केवळ दोन जिंकले, अकरा हारलेल चार अनिर्णित राहिलेत. त्यांच्या विजयाचे प्रमाण फक्त ११.७० % इतकेच राहिले आहे.
             इंग्लिश चमू भारत भूमीवर सतरा कसोटी मालिका खेळला आहे. त्यापैकी पाच जिंकल्या, नऊ हरल्या व तीन मालिकांचा निकाल लागला नाही. सन १९३३-३४, सन १९७६-७७, सन १९७९-८०, सन १९८४-८५ व सन २०१२-१३ अशा पाच मालिका इंग्लंड भारतात जिंकल्या आहेत. आता सुरू असलेल्या मालिकेत त्यांनी सुरूवातीलाच आघाडी घेतली असल्याने मालिका विजयाचे स्वप्न त्यांना पडणे क्रमप्राप्त आहे. मात्र भारत पिछाडीवरून मालिका जिंकण्यात पारंगत असल्याने इंग्लंडच्या स्वप्नांचा डोलारा फुलतो का कोसळतो ? यावरच आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट पंच, प्रशिक्षक व  समिक्षक. Email:  dattavighave@gmail.com
मोबाईल नंबर -९०९६३७२०८२
close