अंबाजोगाई/परमेश्वर गित्ते
बीड लोकसभा मतदार संघाची निवडणूक दरवेळी प्रतिष्ठेची बनलेली आहे. दर निवडणुकीत आपसूकपणे जातीवादाचा रंग दिला जातो. विकासाचे मुद्दे बाजूला टाकले जातात आणि व्यक्तिगत पातळीवरची टीका-टिप्पणी सुरू होते. सध्या लोकसभा निवडणुकीत केवळ उमेदवारी अर्ज दाखल केले असून त्याची छाननी झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेणे आणि प्रचाराची खरी रंगत येणे बाकी असतानाच आतापासूनच हा मतदार संघ सोशल मीडियावर हॉट बनला आहे. दररोज व्यक्तिगत पातळीवर टीका-टिप्पणी केली जात आहे. विकासाचा मुद्दा बाजूला पडला असून वैयक्तिक मुद्यांना आणि वैयक्तिक जीवनावर टीका-टिप्पणी होत असल्याने सामान्य मतदारांची भ्रमनिराशा होत आहे. सर्वच पक्षांनी याचा विचार करण्याची गरज आहे अन्यथा तुम्ही कोणत्या 'लायकीचे' समजून मतदार आपला हक्क अदा करतील. टीका -टिप्पणीमध्ये आता एकमेकांच्या ऑडिओ - व्हीडीओपर्यंतची बाब समोर येऊ लागल्याने निवडणूक आता गरमागरम होईल की काय? अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
बीड लोकसभा मतदार संघ हा साधारणतः 2009 पासून जातीय मुद्द्यावर सुरू झाली त्या अगोदर 11-12 पर्यंत चालायची. परंतु 2009 पासून निवडणुकीने ओबीसी मराठा वाद सुरू केला आहे. स्पर्धा निकोप आणि खुल्या वातावरणात व्हावी असे अपेक्षित आहे. विकासाचे मुद्दे सांगितले जावे. पण असे होताना दिसत नाही. गेल्या 15 दिवसांपासून सोशल मीडियावर मराठा समाज आणि वंजारा समाज यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोपांची राण उठवली जात आहे. त्यानंतर सभेतून नेत्यांनी सुद्धा विकासाच्या मुद्याला बाजूला सारून बहुरंग सोनवणे असे नामकरण करण्यात आले. तर प्रतिस्पर्धी गटाने सुद्धा पालकमंत्र्यांचे किती रंग आहेत. हे सर्वश्रुत असल्याचे सांगितले. दररोज सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. भाजपकडून बजरंग सोनवणे यांच्या कारखान्याच्या बाबतीत, काटा मारण्याच्या बाबतीत व त्यांच्या गुत्तेदारीच्या बाबतीत प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत. तर सोनवणे समर्थकांकडूनसुद्धा जशास तसे उत्तर दिले जात आहे. विद्यमान खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या अकार्यक्षमतेवर जोरदार टीका केली जात आहे. एकूणच ही निवडणूक आता वेगळ्या टप्प्यावर येऊन ठेपली आहे. प्रत्यक्ष निवडणुकीला पंधरा दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. परंतु आतापासूनच वातावरण गरम केले जात आहे. पूर्वीची मुक्त वातावरणातली निवडणूक दिसून येत नाही. वैयक्तिक आणि आतल्या मुद्यांना हात घातला जात आहे. धनंजय मुंडे यांनी बजरंग सोनवणे यांच्यावर टीका केलेली होती. या टिकेला उत्तर म्हणून सोनवणे यांनी थेट धनंजय मुंडे यांना इशारा देत मतदारांना व लोकांना मुंडे हे एकेरी भाषेत कशा शिव्या देतात याच्या माझ्याकडे चार कॅसेट आहेत. त्यामुळे त्यांनी टीका करू नये. अन्यथा त्या कॅसेट निवडणूक आयोगाकडे सादर करील. असे सांगितले. एकूणच निवडणूक ही निकोप वातावरणात पार पडणे अपेक्षित आहे. विकासगाथा सांगणे आणि मते मिळवणे ही प्रथा आहे. परंतु ही प्रथा कुठेतरी बाजूला पडत आहे आणि व्यक्तिगत पातळीवर निवडणूक जात असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीने याचे भान ठेवण्याची गरज आहे. कारण यांच्याकडूनच नव्या समाज निर्मितीची अपेक्षा आहे आणि हेच जर चुकीचा मार्ग दाखवणार असतील तर उद्याच्या पिढीचे भवितव्य काय? असा प्रश्न निर्माण होतो. सोनवणे यांनी किती दिवे लावलेत हे सर्वश्रुत आहे. तर प्रितमताईंच्या माध्यमातून किती कामे झाली आहेत. हेसुद्धा जिल्ह्यातील मतदारांना ज्ञात आहे. दोघांचाही इतिहास जगजाहिर आहे. त्यामुळे व्यक्तिगत कारणांमुळे गाजत असलेली ही निवडणूक विकास कामाभोवती फिरावी अशी अपेक्षा सामान्य मतदारांची आहे. सर्वांना सद्बुद्धी मिळो एवढीच उद्याच्या लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा आहे.
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

