shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अखेरचा हा तुम्हा दंडवत*श्री. के. एल. खाडे अनंतात विलीन


श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुका पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेचे माजी कार्याध्यक्ष, रेल्वे स्टेशनचे सेवानिवृत्त स्टेशनमास्तर, श्रीरामपूर शहराच्या जडणघडणीचे साक्षीदार, साहित्यिक किसनराव लक्ष्मणराव उर्फ के. एल. खाडे यांचे शुक्रवार दि.१९ एप्रिल २०२४ रोजी वयाच्या ९४ व्या वर्षी अल्प आजाराने निधन झाले. त्यांचा जन्म ०३ जुलै १९३० रोजी राहाता तालुक्यातील केलवड या आजोळी गावी झाला. ते श्रीरामपूर जवळील निपाणी वडगाव येथील मूळ रहिवासी होते. त्यांचे आजोबा फकिरा देवजी खाडे (१८७० ते १९२२) हे वारकरी होते. माळकरी असलेल्या या खाडे परिवारातील लक्ष्मणराव खाडे आणि गंगूबाई खाडे यांचे सुपूत्र असलेले के.एल. खाडे यांच्या सेवाभावाचा वसा आणि वारसा त्यांनी जीवनभर जोपासला. १९३८ पासून त्यांची शाळा सुरु झाली. गावातील शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. श्रीरामपूरच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण झाले.१९५० ला ते मॅट्रिक झाले. त्या अगोदरच २५ मे १९४८ रोजी त्यांचा विवाह गावातीलच कारभारी राऊत यांच्या हौसा मुलीबरोबर झाला. अहमदनगर, पुणे येथे कॉलेज शिक्षण झाले. वांबोरी हायस्कूलला ते शिक्षक झाले. जामखेडला ते विद्यार्थीप्रिय शिक्षक होते.

 जामखेडला असतानाच ते रेल्वेत नोकरीला लागले. ०४ मार्च १९५३ रोजी त्यांनी रेल्वेची नोकरी स्वीकारली. दौंडला तारमास्तर, मध्यप्रदेश बीना येथे स्टेशनमास्तर झाले. म्हैसगाव, विळदघाट, बेलवंडी, श्रीरामपूर, कोपरगावला स्टेशन अधिक्षक झाले. अशा विविध ठिकाणी नोकरी केली. ३१ जुलै १९८८ रोजी ते सेवानिवृत्त झाले   ' मी स्टेशनमास्तर',' माझी बखर' या त्यांच्या आत्मचरित्रात हा भ्रमंतीचा प्रवास आहे. रेल्वे खात्यात एक अभ्यासू आणि शिस्तबध्द अधिकारी म्हणून त्यांची छाप आहे.१९८८ पासून  त्यांनी जीवनभर समाजसेवा, साहित्यनिर्मिती आणि ज्येष्ठांसाठी अपूर्व योगदान दिले.ते पुरोगामी चळवळीत कार्यरत होते. मंडल आयोगाचे अभ्यासक म्हणून त्यांचे विचार आणि लेखन दिशादर्शक आहे ३० मार्च१९५३ रोजी मंडल आयोग नेमण्यात आला. धनगर समाजाचा त्यांनी सखोल अभ्यास केला. अनेक लेख लिहिले' यशवंतराव होळकर, अहिल्याबाई होळकर याविषयी त्यांचे लेखन प्रभावी आहे. अहिल्याबाई होळकर यांनी गोंधवणी येथे पाण्याची बारव बांधली. अनेक लोकोपयोगी कामे केली, त्यामुळेच पूज्य अहिल्याबाई होळकर यांचा श्रीरामपुरात पुतळा व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पुणतांबा, शिर्डी रेल्वेसंबंधी त्यांनी लेखन केले. श्री. के एल. खाडे यांचे व्यक्तिमत्त्व धाडसी होते. ते विचारवंत होते. मी त्यांच्या विविध लेखांचे' विचारवेध' नावाने संपादन केले. या पुस्तकातून त्यांचे विचारदर्शन घडते. तीन मुली,चार मुले असा त्यांचा मोठा परिवार आहे. सौ. कमलताई सोनजे यांनी 'आमचे दादा' विषयी भरपूर लेखन केले. तसेच सुभाष खाडे,संजय खाडे, प्रकाश खाडे, अविनाश खाडे, डॉ. मोहनराव,  शांताताई काळे, नलिनी खाडे, अलकाताई खाडे, आशाताई खाडे प्रमिलाताई खाडे आणि सुलोचनाताई आदिंनी के एल खाडे यांची खूपच सेवा केली.११ एप्रिल २०२४ रोजी लातूरचे प्राचार्य डॉ. मधुकर सलगरे यांच्या उपस्थितीत शेवटचा सन्मान ठरला. माजी प्राचार्य टी.ई. शेळके, डॉ. बाबुराव उपाध्ये, सुखदेव सुकळे, माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, प्रा. शिवाजीराव बारगळ आदिंनी त्यांचा साहित्यिक सन्मान केला. एक अपूर्व आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसला. अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवूनी जाती' या जाणिवेने त्यांच्या चरणी ही शब्दफुले अर्पितो!
*- डॉ. बाबुराव उपाध्ये, श्रीरामपूर - 9270087640*

*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगाव*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
close