shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

टि२० विश्वचषकासाठी आयपीएलचा निकष लावूनच टिम इंडिया निवडली आहे ?


            एक जून पासून वेस्ट इंडिज आणि अमेरिका हे दोन देश संयुक्तरित्या टि२० विश्वचषक स्पर्धेचं आयोजन करणार असून वीस देशांचा विक्रमी सहभाग असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना २९ जून रोजी वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे, तर स्पर्धेतला सर्वात हाय होल्टेज सामना म्हणून गणला जाणारी भारत व पाकिस्तान यांच्यातील साखळी सामन्यातील लढत ९ जून रोजी न्युयॉर्क (अमेरिका) येथे होणार आहे.


            मागील ११ वर्षांपासून टिम इंडिया एकही आयसीसी स्पर्धा जिंकू शकली नसल्याने यावेळी तरी भारतीय चमू आयसीसी करंडकाचा दुष्काळ संपविणार का ? हा लाख मोलाचा प्रश्न क्रिकेट समजणाऱ्या प्रत्येकाच्या जिभेवर असणार यात तिळमात्र शंका नाही. 
           विजेतेपदाचा तिढा सोडविण्यासाठी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) च्या निवड समितीने एक पंधरा सदस्यीय व चार सदस्यीय राखीव खेळाडूंची फळी सदर स्पर्धेत खेळण्यासाठी नुकतीच निवडली आहे. हा संघ निवडण्यासाठी निवड समितीने काही निकष ठरविले होते तर काही खेळाडूंची मागील कामगिरी विचारात घेऊन संघाची अंतिम घोषणा करण्यात आली. वास्तविक १४४ कोटी लोकसंख्या असलेल्या क्रिकेटवेड्या देशातून पंधरा जणांचा संघ निवडणे म्हणजे तारेवरची कसरतच असते. तरीही हा संघ निवडताना सर्व संबधितांनी सर्वमान्य संघ देण्याचा प्रयत्न केला. 
            या प्रयत्नातूनच रोहित शर्मा (कर्णधार ) यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदिप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदिप सिंग, जसप्रित बुमराहा व मोहम्मद सिराज या पंधरा जणांची मुख्य संघात निवड झाली तर दौऱ्यावर असताना अचानक होणाऱ्या दुखापती किंवा इतर महत्वाच्या कारणास्तव यातील कोणी खेळाडू खेळण्यास असमर्थ ठरला तर त्यांची जागा भरून काढण्यासाठी शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद व आवेश खान या चार खेळाडूंना संघासोबत पाठविले जाणार आहे. असे करण्या मागचे मुख्य कारण म्हणजे आयसीसीने तसा नियमच बनविला आहे. शिवाय वरील १९ जणांच्या संघात काही बदल करायचे ठरल्यास त्यासाठी २५ मे हि अंतिम मुदतही आयसीसीने जाहिर केली आहे.
            आयपीएल हि जगातील सर्वात मोठी लिग स्पर्धा आहे हे जगमान्य असून या स्पर्धेत जगभरातले विविध देशांचे नामवंत खेळाडू सहभाग घेतात. यंदा आयपीएल व टि२० विश्वचषक स्पर्धा पाठोपाठ असल्याने आयपीएल मधील कामगिरी हा निकष प्रत्येक देशाने आपला विश्वचषकासाठी अंतिम संघ निवडताना ठेवला होता. त्याच अनुषंगाने प्रत्येक देशाचा संघ निवडला गेला. अर्थात भारताच्या निवड समितीने आधी ठरविल्या प्रमाणेच आयपीएल मधील कामगिरी विचारात घेतली हे खरं असले तरी काही विचित्र गोष्टी समोर आल्याने खरोखर आयपीएल मधील कामगिरी लक्षात घेऊन टिम इंडियाचे सिलेक्शन झाले का ? हा प्रश्न पडतो.
            केकेआर कडून खेळणारा रिंकू सिंग मागील दहा महिने टिम इंडियाचा नियमित सदस्य होता शिवाय त्याची कामगीरी इतर सर्वांपेक्षा सरस होती. 
.परंतु या सत्रात केकेआरने त्याला व्यवस्थित न हाताळल्याने त्याचे प्रदर्शन अपेक्षेनुरूप झाले नाही. तर सीएसके कडून खेळताना शिवम दुबेने बॅटने करामत करून विश्वचषकाचे तिकीट मिळविले.
           आयपीएल २०२४ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू आणि मुंबई इंडियन्स यांची कामगिरी अतिशय निराशजनक झाली असून गुणतालिकेत ते अनुक्रमे दहाव्या व नवव्या स्थानी आहेत. परंतु टिम इंडियामध्ये या दोन संघातील खेळाडूंचाच भरणा अधिक आहे. मुंबईचे चार तर बेंगलुरूचे दोन खेळाडू विश्वचषकाचे वारकारी ठरणार आहेत. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार हार्दिक पांड्या, सुर्यकुमार यादव व जसप्रित बुमराहा यांचा तर आरसीबीकडून विराट कोहली व मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे. यातील विराट कोहली सोडला तर कोणाचीही कामगिरी विश्वसनीय झालेली नाही. मुंबईचा कर्णधार असलेल्या हार्दिक पांड्याची फलंदाजी, गोलंदाजी, नेतृत्व या सर्व स्तरांवर फजिती उडाली तर त्याचे व्यक्तीगत धिंडवडे प्रेक्षकांनी भर मैदानात काढले हे तर कोणत्याही क्रिकेटपटूसाठी वाईट स्वप्नापेक्षाही भयंकर होते. हे सर्व असूनही हे सहा खेळाडू विश्वचषकाच्या अंतिम भारतीय संघात शंभर टक्के खेळणार हे सत्य आहे. गुणतालिकेत आठव्या स्थानावरील पंजाब संघातला डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदिप सिंगची कामगिरीही बिलकुल खराब आहे तरीही तो संघासोबत जाणार आहे.
             सर्वात मोठी आश्चर्याची बाब म्हणजे चालू आयपीएल सत्रात गुणतालिकेत अव्वल तीन पैकी दोन संघातील एकही खेळाडू भारतीय संघात निवडला गेला नाही. आघाडीवर असलेल्या राजस्थान संघातील तीन खेळाडू, कर्णधार संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल व युजवेंद्र चहल मुख्य संघात आहेत तर आवेश खान राखीव खेळाडूत आहे. दुसऱ्या क्रमांकाच्या केकेआर व तिसऱ्या क्रमांकाच्या लखनौचा एकही खेळाडू भारतीय संघात निवडण्यात आला नाही.
           गुणतालिकेतील चौथ्या क्रमांकाच्या सीएसकेच्या शिवम दुबे व रविंद्र जडेजाला विश्वचषक खेळायला मिळणार आहे तर सनरायझर्स हैद्राबादचा एकही खेळाडू संघात नाही. दुसरीकडे या सत्रात दिल्लीची कामगिरीही लक्षवेधक नाही पण त्यांचे तीन खेळाडू रिषभ पंत, अक्षर पटेल व कुलदिप यादव हे भारतीय चमूत निवडले आहेत. तसं बघाल तर गुजरातचा शुभमन गिल, केकेआरचा रिंकू सिंग, दिल्लीचा खलिल अहमद व राजस्थानचा आवेश खान राखीव खेळाडू म्हणून संघासोबत जातील.
             एकंदर संघातील खेळाडूंच्या नावावर नजर टाकली तर एक बाब लक्षात येते की निवड समितीने आयपीएल निकष लावून संपूर्ण संघ निवडलाच नाही. ऋतूराज गायकवाड, संदिप शर्मा, शशांक सिंग, मयंक यादव, आशुतोष शर्मा, अभिषेक शर्मा, टि. नटराजन हे खरोखर चमक दाखविलेले खेळाडू शेवटी अंधारातच राहिले. मागील किमान चार विश्वचषकात अपयशी ठरलेले केवळ मोठ्या नावाचेच खेळाडू मुख्य संघात आहेत. त्यामुळे या संघाकडूनही विश्वचषक जिंकण्याची आशा धरणे म्हणजे दिवसा ढवळ्या तेही उघडया डोळ्यांनी स्वप्न बघण्यासारखेच आहे.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
मो. नंबर -९०९६३७२०८२
close