माळवाडगाव, मुठेवाडगाव परिसरातील शेतकरी आक्रमक ; पाणी न मिळाल्यास आंदोलन
श्रीरामपूर प्रतिनिधी:
भंडारदरा धरणातून लाभक्षेत्रातील चारा आणि उन्हाळी पिकांसाठी उन्हाळी हंगामातील शेवटचे सिंचन आवर्तन सोडण्यात आले असून धरणाच्या दोन्ही डावा आणि उजवा कालवा पूर्ण क्षमतेने प्रभावित करण्यात आले आहेत मात्र प्रवरा डाव्या कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी श्रीरामपूर तालुक्याच्या टेल भागातील माळवाडगांव मुठेवाडगांव परिसरात अद्यापही सोडण्यात आलेले नाही त्यामुळे माळवाडगांव मुठेवाडगांव परिसरातील शेतकरी आक्रमक झाले असून माळवडगांव मुठेवाडगांव परिसरात पाटबंधारे विभागाने पाण्याचे योग्य नियोजन करून तात्काळ पाणी सोडावे अन्यथा शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे विभागाचे संबंधित अधिकारी जबाबदार राहतील अशी मागणी पाटबंधारे विभागाकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
श्रीरामपूर तालुक्याच्या टेल भागातील डी ३ चारीद्वारे माळवाडगांव मुठेवाडगांव परिसरातील शेतकऱ्यांना शेतीला पाणीपुरवठा केला जातो. मात्र ९ मे पर्यंत देखील कोणत्याही प्रकारे पाटबंधारे विभागाकडून संबंधित चारीला पाणी सोडण्याबाबत कोणत्याही प्रकारचे नियोजन केले नसल्याने या भागातील शेतकरी आक्रमक झाले आहे. शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाचा उन्हाळी आवर्तनासाठी सात नंबर फॉर्म भरून आपल्या पशुधनासाठी चारा पिके तसेच ऊस पिकांची लागवड केली होती. मात्र सध्या कडक उन्हामुळे शेतकऱ्यांची विहीर, बोरवेलसह सर्व स्त्रोत आटलेले असल्याने शेतकरी पाटबंधारे विभागाच्या पाण्यावर अवलंबून आहे.
मात्र पाटबंधारे विभागाकडून पाणीपुरवठा वेळेवर केला जात नसल्याने शेतकऱ्यांची पिके डोळ्यासमोर जळून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे माळवाडगांव, मुठेवाडगांव परिसरातील शेतकरी पुरते हवालदिल झाले असून (डी तीन) चारीला पाटबंधारे विभागाने उच्च दाबाने पाणीपुरवठा तात्काळ सुरू करून शेतकऱ्यांची पिके वाचवावीत अशी मागणी शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकारी श्रीमती करिष्मा कुऱ्हाडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
जर पाटबंधारे विभागाकडून शेतकऱ्यांना वेळेवर पाणी उपलब्ध न झाल्यास आणि शेतकऱ्यांची भरणे न झाल्यास शेती पिकाचे नुकसान झाल्यास याला सर्वस्वी पाटबंधारे विभाग जबाबदार राहील असा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर नानासाहेब आसने, रावसाहेब आसने, शिवाजी लक्ष्मण मुठे, रमेश मुठे, गोरख चिडे, विनायक मुठे, तात्या चौधरी, अंकुश आसने, अशोक चौधरी, अनिल पाचपिंड, योगेश लटमाळे, शरद जासुद, सचिन आसने, ज्ञानेश्वर मुठे, भाऊसाहेब मुठे,अनिल चौधरी, राजू चौधरी, दत्तू बडाख, दादासाहेब मुठे, रमेश नाईक, गणेश गोसावी, गणेश आसने, संदीप आसने आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
*पत्रकार संदिप आसने
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

