पर्यावरण साक्षरता लेख तिसरा. दि.२३/०५/२०२३
पाण्यासारखा पैसा उधळू नका! हा वाक्प्रचार सर्वांनी ऐकलेला आहे. मात्र आजची परिस्थिती अशी आहे की पैशासारखं पाणी नासवू नका...
आज आपल्यापुढे शुद्ध पाणी मिळविणं ही समस्या फार मोठी, चिंतनाची झालेली आहे. शुद्ध पाणी विकत घ्यावे लागते. याला कारण आपलीच तज्ञ मंडळी आहेत. आपली म्हणजे या देशातील साऱ्या तज्ञ मंडळींनी व सत्ताधारी मंडळींनी स्वातंत्र्य मिळाल्यापासून जी जिवघेणी धोरणे अवलंबिली त्या धोरणामुळेच कोल्हापूरच्या पंचगंगेसह महाराष्ट्रातील बहूतेक नद्यांचे पाणी काळे दिसू लागले . कारखान्यांतील सरसकट विषारी रसायने, गावचे सांडपाणी नदीत सोडल्यामुळे नद्या म्हणजे विषारी पाण्याची गटारे अशी अवस्था झालेली आहे. हे ज्यांच्यामुळे झाले त्यांना आपण तज्ञ म्हणायचे काय? मागे वळून बघायची गरज आहे.
हा बदल स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रगती/विकासाच्या नावाने आणि शहरी केंद्राकरणाच्या, कारखानदारीच्या केंद्रीकरणामुळे झालेला आहे. त्यामुळे या सर्वाला राजकीय नेते, तज्ञ मंडळी, कृषी विद्यापीठे, प्रदूषण मंडळे, वनविभाग, नगरपालिका, ग्रामपंचायती व तत्सम यंत्रणाच कारणीभूत असून या सर्वांच्या विरोधात जाब विचारणे गरजेचे आहे.
शोधून देखील शुद्ध पाण्याची नदी मिळणार नाही एवढे मोठे पाप या यंत्रणांनी करून ठेवलेले आहे. सहज नदीत जावे, हातपाय धुवावे व पोटभर पाणी प्यावे अशी अवस्था राहिलेली नाही.
अगदी खेडेगावामध्ये युरिया, अमोनियम सल्फेट सारखी खते वापरून जमिनीतील गांडुळांना संपविण्यात आले. त्याचवेळी मोठ्या प्रमाणावर बेडकांची निर्यात करण्यात आली. परिणामी शेतीवर रोग पडू लागले व कीटकांचा प्रादुर्भाव वाढला. तेव्हा कीटकनाशके आली. कीटकनाशकांबरोबर औषध फवारणी आली. तणनाशके आली. ही सर्व विषारी द्रव्ये शेतातील पाण्यातून नदीत पोहोचली. म्हणजे उगमापासून समुद्रापर्यंत या विषारी द्रव्यांचा प्रवास सुरू झाला. याच नद्यांच्या प्रवाहात
रासायनिक कारखान्यांचे, साखर कारखान्यांचे मळीसकटचे दूषित पाणी, शहरातील वाढत्या लोकसंख्येचे सांडपाणी मिसळत गेल्या ७५ वर्षापासून या सर्वांचा परिपाक होत होत भूगर्भात हेच विषारी पाणी पोहोचले व आज आपण पाणी पाणी करत खिशातील पैसे मोजत प्लास्टिकच्या बाटल्या भरभरून पाणी खरेदी करत आहोत, एवढी अधोगती या आपल्या देशातल्या तज्ञांमुळे आपली झालेली आहे.
विचार करा! जाब विचारण्यासाठी, कृषिविषयक धोरणे बदलण्यासाठी, पर्यावरण रक्षणासाठी, भावी पिढीच्या आरोग्य रक्षणासाठी पुढे या.
पाणी विकत घेणे म्हणजे आरोग्य विकत घेणे हे समजून घ्या. सुदृढ आरोग्यासाठी शुद्ध हवा, पाणी, सेंद्रिय, विषमुक्त धान्य, फळभाज्या व संतुलित पर्यावरण यांपासून वंचित झालेल्या भावी पिढीसाठी आत्मचिंतन करा.
चंद्रकांत शहासने, पुणे. मो.९९६००६१३०९

