shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पाऊस मेहेरबान हैद्राबाद ठरले प्लेऑफचे हक्कदार


          सतरावे आयपीएल सत्र अंतिम पर्वात असताना प्ले ऑफ मध्ये खेळणाऱ्या चार संघाचा शोधही शब्दशः शेवटच्या टप्प्यात आला असून आता फक्त एका संघाची प्रतिक्षा आहे आणि तोही शनिवार पर्यंत पूर्ण होऊन प्ले ऑफ मध्ये नेमकं कोणाचं कोणतं स्थान असेल व कोण कोणाशी दोन हात करेल हेही स्पष्ट होईल.

          गुरुवारी रात्री हैद्राबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर पावसाने अक्षरशः थैमान घातले. मात्र याचा लाभ यजमान सनरायझर्स हैद्राबादला झाला व प्ले ऑफचे तिकीट मिळवून दिले. हैद्राबाद आणि लखनौ यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला आणि त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक एक  गुण विभागून मिळाला. आपल्या अखेरच्या सामन्याअखेर हैद्राबादचे आता पंधरा गुण झाले असून ते गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. त्याचबरोबर हैद्राबाद प्ले ऑफ मध्ये पोहोचणारा तिसरा संघ ठरला आहे. याआधी कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सने जागा निश्चित केली आहे हे आपणास ठाऊक आहेच.

            हैद्राबाद आणि गुजरात यांच्यातील सामन्यात पावसामुळे नाणेफेक देखील होऊ शकली नाही.  पाऊस थांबल्यानंतर पंचांनी नाणेफेक रात्री आठ वाजता करून सामना सव्वा आठ वाजता सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र नाणेफेकीच्या वेळे आधी पुन्हा पाऊस झाला. यानंतर सततच्या पावसामुळे पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर पावसामुळे रद्द झालेला गुजरातचा हा सलग दुसरा सामना आहे. यापूर्वी कोलकाताविरुद्धचा सामनाही रद्द करण्यात आला होता. वरूण राजाच्या अवकृपेमुळे सन २०२२ चे विजेते व सन २०२३ चे उपविजेते गुजरात या सत्रात प्ले ऑफचा भोजा करू शकले नाहीत. त्याआधी कोलकाता आणि मुंबई यांच्यातील सामन्यालाही पावसाचा फटका बसला होता. हा सामना दोन तास पंधरा मिनिटे उशिराने सुरू झाला आणि तो प्रत्येकी सोळा षटकांचा खेळविण्यात आला होता.

            हैद्राबादने सन २०२० नंतर प्रथमच प्लेऑफ फेरीत स्थान मिळविले आहे. यापूर्वी ते सन २०२० मध्ये बाद फेरी खेळले होते. हैद्राबादला एकंदर सातव्यांदा प्लेऑफचे तिकीट मिळाले आहे.  हैद्राबादने प्लेऑफमध्ये प्रवेश केल्याने दिल्ली कॅपिटल्ससाठी यंदाची आयपीएल संपूर्णतः संपली  आहे. दिल्लीचे सर्व १४ सामने संपले असून त्यातून त्यांच्या खात्यात १४ गुण जमा झाले आहेत. दिल्लीची -०.३७७ धावगती असून हा लेख लिहीला जाईपर्यंत ते गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहेत.

           शेवटी चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपरजायंट्स हे तीन संघ प्लेऑफसाठी उरलेले एक स्थान भरण्यासाठी शर्यतीत आहेत. हैद्राबादचे आता तेरा सामन्यांतून पंधरा गुण आहेत आणि चेन्नई सुपर किंग्ज वगळता इतर कोणताही संघ पंधरा किंवा त्याहून अधिक गुण मिळवू शकत नाही. या स्थितीत सनरायझर्स प्ले ऑफसाठी पात्र ठरले. तेरा सामन्यांनंतर चेन्नईचे चौदा गुण आहेत. अठरा मे रोजी सीएसकेचा सामना बेंगळुरूशी होणार आहे. बेंगळुरू आणि लखनौचे प्रत्येकी बारा गुण आहेत. तथापि, लखनौची निव्वळ धावगती खूपच नकारात्मक आहे आणि त्याची भरपाई करणे त्यांच्यासाठी अवघड आहे. अशा स्थितीत चेन्नई आणि बेंगळुरू यांच्यातील सामना आभासी नॉकआऊटच मानला जात आहे. चेन्नईचा विजय त्यांना सरळ प्लेऑफमध्ये घेऊन जाईल तर आरसीबीला प्रथम फलदांजी केली तर अठरा धावांनी व नंतर केली तर अकरा चेंडू राखून विजय मिळवावा लागेल. त्यामुळे हा सामना चुरसीचा होऊन प्रेक्षकांना मनोरंजनाचा मोठा आस्वाद मिळणार यात कुणाचेच दुमत नसावे.

            मुंबई, दिल्ली, गुजरात, पंजाब हे संघ अधिकृतरित्या बाद झाले आहेच आता यामध्ये आणखी दोन दुर्देवी संघांची भर पडणार आहेत. ते संघ कोणते असतील हे सीएसके -आरसीबी लढतीनंतर स्पष्ट होईलच. 


लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
मो. नंबर -९०९६३७२०८२
close