अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सनरायझर्स हैद्राबाद विरुद्धच्या क्वालिफायर- एक मधील सामन्यात दोन वेळचा चॅम्पियन कोलकाता नाइट रायडर्स ( केकेआर) ने चमकदार कामगिरी केली आणि हैद्राबादचा आठ गडी राखून पराभव करून अभिमानाने अंतिम फेरीत प्रवेश केला. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या नेतृत्वाखाली केकेआरसाठी गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. यानंतर व्यंकटेश अय्यर आणि कर्णधार श्रेयस अय्यरने नाबाद अर्धशतके झळकवित संघाला विजयापर्यंत नेले. यापूर्वी कोलकाता संघ तीन वेळा क्वालिफायर- एक मध्ये खेळला आहे आणि तिन्ही वेळा जिंकला असून क्वालिफायर-१ मध्ये हैद्राबादविरुद्ध अपराजित राहण्याची परंपरा जपली आहे.
सनरायझर्स हैद्राबादने प्रथम फलंदाजी करताना राहुल त्रिपाठीच्या पस्तीस चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर १९.३ षटकांत १५९ धावा केल्या. केकेआरसाठी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू मिचेल स्टार्कने चार षटकांत ३४ धावा देत तीन बळी घेतले. प्रत्युत्तरात कोलकाताकडून व्यंकटेश आणि श्रेयसने शानदार फलंदाजी केली. या दोघांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर केकेआरने १३.४ षटकातच २ बाद १६४ धावा करत सामना जिंकला. कोलकाता चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला असून या आधी सन २०१२, २०१४ आणि २०२१ च्या मोसमात विजेतेपदाच्या लढतीत पोहोचला होता, त्यापैकी दोनदा संघाने ट्रॉफी जिंकली होती. कर्णधार श्रेयस अय्यरने २४ चेंडूंत पाच चौकार व चार षटकारांच्या मदतीने नाबाद ५८ धावा केल्या तर व्यंकटेश अय्यरने २८ चेंडूंत पाच चौकार व चार षटकारांच्या मदतीने नाबाद ५१ धावा केल्या.
सतराव्या आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचणारा कोलकाता संघ पहिला संघ ठरला असला तरी, हैदराबाद संघ पराभवानंतरही स्पर्धेबाहेर नाही आणि त्यांना स्पर्धेच्या नियमानुसार विजेतेपदाच्या सामन्यात प्रवेश करण्याची आणखी एक संधी मिळेल. हैद्राबादचा आता शुक्रवारी क्वालिफायर- दोनमध्ये बुधवारी आरसीबी आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील एलिमिनेटरच्या विजेत्याशी सामना होईल. क्वालिफायर-दोनचा विजेता संघ रविवारी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणाऱ्या विजेतेपदाच्या लढतीत केकेआरशी भिडणार आहे.
प्रत्युत्तरात लक्षाचा पाठलाग करताना कोलकाताला रहमानउल्ला गुरबाज आणि सुनिल नारायण यांनी वेगवान सुरुवात करून दिली. फिल सॉल्टच्या अनुपस्थितीत खेळायला आलेल्या गुरबाजने संघाला निराश केली नाही आणि पहिल्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी केली. मात्र टी. नटराजनने पॉवर प्लेनंतर गुरबाजला बाद करून केकेआरला पहिला धक्का दिला. गुरबाज १४ चेंडूत २३ धावा करून बाद झाला. यानंतर नारायणनेही हात उघडून काही फटके मारले, मात्र पॅट कमिन्सने त्याला बाद करून हैद्राबादला दुसरे यश मिळवून दिले. नारायण १६ चेंडूंत चार चौकारांच्या मदतीने २१ धावा करून बाद झाला.
दोन धक्क्यांनंतर केकेआर संघ दडपणाखाली येईल असे वाटत होते, पण व्यंकटेश आणि श्रेयसने दमदार फलंदाजी करत हैद्राबादच्या गोलंदाजांवर सतत दबाव ठेवला. या काळात हैद्राबादचे क्षेत्ररक्षण चांगले नव्हते आणि त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी श्रेयस अय्यरला दोनदा जीवदान दिले. याचा श्रेयसने चांगलाच फायदा घेतला. प्रथम व्यंकटेशने अर्धशतक झळकावले आणि त्यानंतर श्रेयसही आपले अर्धशतक पूर्ण करण्यात यशस्वी ठरला. चौदावे षटक टाकण्यासाठी आलेल्या ट्रॅव्हिस हेडच्या चार चेंडूंवर श्रेयसने वीस धावा चोपताना षटकार खेचून संघाला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु केकेआरचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ट्रॅव्हिस हेडला बाद करून हैद्राबादला मोठा धक्का दिला. या मोसमात हेडने शानदार फलंदाजी करत संघाला अनेक सामन्यांमध्ये वेगवान सुरुवात करून दिली. मात्र गेल्या दोन सामन्यांपासून त्याची बॅट शांत आहे आणि त्याला खातेही उघडता आलेले नाही. याआधी पंजाब किंग्जविरुद्ध खेळल्या गेलेल्या सांघिक गटातील शेवटच्या सामन्यात हेडही शून्यावर बाद झाला होता. यानंतर वैभव अरोराने अभिषेक शर्माला आंद्रे रसेलकरवी झेलबाद करून हैद्राबादला दुसरा धक्का दिला. अभिषेक तीन धावा करून बाद झाला. आयपीएलच्या चालू मोसमात हेड आणि अभिषेकची जोडी एका सामन्यात दुहेरी आकडी धावा करू शकलेली नसल्याची ही पहिलीच वेळ आहे.
आयपीएलच्या चालू मोसमात हैद्राबादचे द्राफलंदाज पॉवर प्लेमध्ये तुफान फलंदाजी करत आहेत, मात्र या सामन्यात पॉवर प्लेच्या वेळी त्यांचे फलंदाज काही विशेष करू शकले नाही. पॉवर प्लेमध्ये हैदराबादने ४५ धावा केल्या, पण चार विकेट गमावल्या. हेड आणि अभिषेक व्यतिरिक्त हैद्राबादने पहिल्या सहा षटकात नितीश रेड्डी आणि शाहबाज अहमद यांच्या विकेट्स गमावल्या. हे दोन्ही फलंदाज स्टार्कने बाद केले. नितीश नऊ धावा करून परतला आणि शाहबाज खाते न उघडता माघारी परतला. पॉवर प्ले दरम्यान हैद्राबादने चार विकेट गमावण्याची ही या हंगामातील दुसरी वेळ होती. तत्पूर्वी हैद्राबादमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात संघाने चार गड्यांच्या मोबदल्यात बासष्ठ धावा केल्या होत्या. या हंगामात पॉवर प्लेमध्ये हैद्राबादची ही तिसरी सर्वात कमी धावसंख्या होती.
सततच्या पडत्या विकेट्स नंतर राहुल त्रिपाठीने धाडसी खेळी खेळली आणि अवघ्या २९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने हेन्रिक क्लासेनसोबत पाचव्या विकेटसाठी बासष्ठ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी वरुण चक्रवर्तीने क्लासेनला बाद करून तोडली. क्लासेन एकवीस चेंडूत बत्तीस धावा करून बाद झाला. काही वेळाने रसेलच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे राहुलनेही आपली लय गमावली आणि तो धावबाद झाला. राहुलने पस्तीस चेंडूत पंचावन्न धावांच्या खेळीत सात चौकार आणि एक षटकार लगावला.
राहुल त्रिपाठी आणि क्लासेनच्या भागीदारीच्या जोरावर हैद्राबादने ढासळणारा डाव सांभाळला. शेवटी कर्णधार कमिन्सने शेवटच्या षटकांमध्ये वेगवान खेळ करत संघाची धावसंख्या दीडशेच्या पुढे नेली. कमिन्सने २४ चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने तीस धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात रसेलने त्याचा डाव संपवला. या सामन्यात हैद्राबादची फलंदाजी खराब राहिली आणि संघाचे फक्त चार फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले.
हैद्राबाद भले हा सामना गमावला असला तरी अंतिम फेरीत जाण्याची एक संधी त्यांना मिळणार आहे. त्यांचा कर्णधार पॅट कमिन्स वन डे , टेस्टचा विश्वविजेता कर्णधार असून आयपीएलचे जेतेपद मिळविले तर त्याने नेतृत्व केलेल्या सर्व मोठ्या स्पर्धा जिंकणारा तो जगातला पहिला कर्णधार ठरेल.
लेखक -.
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
मो.नं. -९०९६३७२०८२

