आयपीएलच्या सतराव्या पर्वात एलिमिनेटरमध्ये, राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा चार गडी राखून पराभव केला आणि स्पर्धेतून बाहेर फेकले. अशाप्रकारे बंगलोरचा सलग सहा सामने जिंकण्याचा प्रवासही संपला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करावी लागल्यानंतर आरसीबीने वीस षटकांत आठ गडी गमावून १७२ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने १९ षटकांत सहा गडी गमावून विजयी लक्ष्य गाठलेच.
आता चोवीस मे रोजी दुसऱ्या बाद फेरीत (क्वॉलिफायरमध्ये) त्यांचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ २६ मे रोजी कोलकाता नाईट रायडर्सशी अंतिम झुंज देईल. या सामन्यापूर्वी आरसीबीने सलग सहा सामने जिंकून प्ले ऑफमध्ये प्रवेश केला होता. आता सलग सतराव्या हंगामात बेंगळुरूला विजेतेपद मिळवता आले नाही. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल आपले खातेही उघडू शकला नाही. त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध विजय मिळवून देणाऱ्या यश दयालने तीन षटकांत ३७ धावा दिल्या आणि त्याला एकही गडी बाद करता आला नाही.
बेंगळुरूच्या खेळाडूंनी दिनेश कार्तिकला ज्या प्रकारे मिठी मारली, त्यावरून असे मानले जात आहे की कार्तिकचाही हा आयपीएलमधील शेवटचा सामना होता. कार्तिकने यापूर्वी सीएसकेला पराभूत केल्यानंतर सांगितले होते की, सीएसकेविरुद्धचा सामना त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील शेवटचा असेल असे त्याला वाटत होते. अशा स्थितीत कार्तिकची कारकीर्द संपल्याचे मानले जात आहे.
तत्पूर्वी रविचंद्रन अश्विन, आवेश खान आणि ट्रेंट बोल्ट यांच्या शानदार गोलंदाजीसमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या एलिमिनेटरमध्ये अपेक्षेइतकी मोठी धावसंख्या उभारता आली नाही. राजस्थानच्या गोलंदाजांनी आरसीबीला आठ विकेट्सवर एकूण १७२ धावांवर रोखले. आवेश खानने ४४ धावांत तीन बळी घेतले, तर अश्विनने १९ धावांत दोन आणि बोल्टने १६ धावांत एक बळी घेतला. विराट कोहलीने २४ चेंडूत ३३ तर रजत पाटीदारने २२ चेंडूत ३४ धावा केल्या. महिपाल लोमररने शेवटी १७ चेंडूत ३२ धावा करत आरसीबीला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले.
संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून पॅट कमिन्सने क्वालिफायर-१ मध्ये कोलकाताविरुद्ध जी चुक केली होती ती चुक केली नाही. संजूने प्रथम आरसीबीला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दुसऱ्याच षटकात विराट कोहलीने संदिप शर्माला चौकार मारून शानदार सुरुवात केली. ड्यू फ्लेसिसने याच षटकात डावातील पहिला षटकार मारला. मात्र, दुसरीकडून गोलंदाजी करणाऱ्या बोल्टला दोघेही सावधपणे खेळले. बोल्टने अचूक मारा करताना दोन षटकात केवळ पाच धावा दिल्या. विराटने आवेशच्या पहिल्याच चेंडूला हुक करून स्वतःचा पहिला षटकार ठोकला. या षटकात ड्यू फ्लेसिसने दोन चौकार मारून एकूण १७ धावा केल्या. बोल्टला आक्रमणात ठेवण्याचा कर्णधार संजूचा निर्णय बरोबर ठरला. ड्यू फ्लेसिसचा पुल मिडविकेटवर पॉवेलने सुंदर झेल घेतला. ड्यू फ्लेसिसने चौदा चेंडूत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने सतरा धावा केल्या. कोहलीसह त्याने २८ चेंडूत ३७ धावा जोडल्या. बोल्टने पहिल्या तीन षटकात केवळ सहा धावा देऊन एक बळी मिळविला.
विराटने सहाव्या षटकात संदिप शर्माला दोन चौकार मारून आरसीबीला पन्नास धावांवर पोहचविले. चौकारासह विराटने आयपीएलमधील आठ हजार धावाही पूर्ण केल्या. आरसीबीने पॉवर प्ले मध्ये एक बाद पन्नास धावा केल्या होत्या, ज्यामध्ये विराटच्या १९ चेंडूत तीस धावा होत्या. या सामन्याला विराट विरुद्ध चहल म्हटले जात होते. मोक्याचा वेळ संपल्यानंतर संजूने चहलला आक्रमणात आणले आणि त्याने विराटला फ्लाईटवर चकविले, मिडविकेट सीमारेषेवर तो चोवीस चेंडूत तीन चौकार आणि एक षटकार ठोकून झेल देऊन परतला.
अश्विन आणि चहलने पॉवर प्ले नंतर पुढील तीन षटकांत धावांचा वेग रोखला. या काळात केवळ तेरा धावा निघाल्या आणि विराटची महत्वपूर्ण विकेट गेली. दहाव्या षटकात कॅमरून ग्रीनने चहलला एक षटकार आणि एक चौकार ठोकला. यादरम्यान अश्विनच्या चेंडूवर जुरेलने पाटीदारचा सोपा झेल सोडला. त्यावेळी पाटीदार सहा धावांवर खेळत होता तरआरसीबीची धावसंख्या ७८ धावा होती. तेराव्या षटकात अश्विनने सलग दोन चेंडूंवर कॅमरून ग्रीन (एकवीस) आणि मॅक्सवेल (शुन्य) यांच्या रूपाने आरसीबीला दुहेरी झटके दिले. मॅक्सवेल आयपीएलमध्ये अठराव्यांदा शुन्यावर बाद झाला. पाटीदारलाही मोठी खेळी खेळता आली नाही. आवेशने त्याला ३४ धावांवर बाद केले. आवेशनेच कार्तिकला अकरा धावांवर बाद करत लोमररसोबतची बत्तीस धावांची भागीदारी संपवली. यानंतर आवेशच्या गोलंदाजीवर बत्तीस चेंडूत सतरा धावा करून लोमररही बाद झाला.
विजयासाठीच्या १७३ धावांच्या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या राजस्थानची सुरुवात चांगली झाली. यशस्वी जयस्वाल आणि टॉम कोहलर कॅडमोर यांनी ४६ धावांची सलामी दिली. लॉकी फर्ग्युसनने कॅडमोरला वीस धावांवर त्रिफळा चित करून राजस्थानला पहिला धक्का दिला. त्यानंतर यशस्वीने कर्णधार संजू सॅमसनसोबत दुसऱ्या विकेटसाठी पस्तीस धावांची भागीदारी केली. यशस्वी अर्धशतक पूर्ण होण्यापूर्वीच कॅमरून ग्रीनचा बळी ठरला. त्याने तीस चेंडूंत आठ चौकारांच्या मदतीने पंचेचाळीस धावा ठोकल्या.
मोठा फटका मारण्याच्या नादात संजू सॅमसन यष्टीचित झाला. संजूने तेरा चेंडूत सतरा धावांची फारच छोटी खेळी केली. कोहलीच्या एका शानदार थ्रोवर ध्रुव जुरेल आठ धावा करून धावबाद झाला. मात्र, दुसऱ्या टोकाकडून रियान परागने धावा सुरूच ठेवल्या. त्याने शिमरॉन हेटमायरसोबत ४५ धावांची भागीदारी केली आणि बंगळुरूच्या हातून सामना हिसकावून घेतला. परागला अठराव्या षटकात सिराजने क्लीन बोल्ड केले. तो २६ चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३६ धावा करून बाद झाला. त्याच षटकात सिराजने शिमरॉन हेटमायरलाही ड्यू फ्लेसिसकरवी झेलबाद केले. त्याने चौदा चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने सव्वीस धावा केल्या.
सामन्याचा काटा इकडून तिकडे फिरत असताना वेस्ट इंडियन रोव्हमन पॉवेलने आठ चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने सोळा धावांची नाबाद खेळी केली आणि राजस्थानला विजयाची सिमारेषा ओलांडून दिली. पॉवेलने १९ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून सामना जिंकला. आरसीबीकडून सिराजने दोन तर फर्ग्युसन, कर्ण शर्मा आणि ग्रीन यांना प्रत्येकी एक गडी बाद केला.
पंचांचे चुकीचे निर्णय, पावसाचा व्यत्यय, इंग्लिश खेळाडूंचे महत्वाच्या क्षणी सोडून जाणे, यामुळे सुरुवातीला जोरदार फॉर्म व लयीत असलेल्या राजस्थान रॉयल्सच्या खेळाचा टेंपोच बिघडून गेला होता. लिलया प्ले ऑफचे तिकीट मिळेल असे वाटत असताना सलगचे चार पराभव व एक पावसामुळे वाया गेलेला सामना याच्या नंतरही केवळ नशिब बलवत्तर म्हणून ते बचावले व प्लेऑफमध्ये पोहोचले. सर्वात महत्वाचे म्हणजे ऐन मोक्याच्या क्षणी या सामन्यात त्यांचे सर्व सुर जुळले आणि दुसऱ्या पात्रता सामन्यासाठी त्यांना चेन्नईचे तिकीट मिळाले. तेथेही हाच सकारात्मक बाणा राखला तर चेपॉकवरच होणाऱ्या अंतिम सामन्यानंतर संजू सॅमसन व चमू आपणास विजयोत्सव साजरा करताना दिसू शकेल.
लेखक -.
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
मो.नं. -९०९६३७२०८२

