तसं बघाल तर जीवनातल्या प्रत्येक क्षेत्राची सुरुवात शुन्यातूनच होते. संबंधीत क्षेत्रातील प्रगती पावलो गणिक माणसाला प्रगल्भ बनवते व नंतर तीच गती मोठया अंका समोर शुन्य वाढवून त्या व्यक्तीचा दर्जा व उंची वाढवते. मग ते पैसे असो वा क्रिकेटमधील धावा, बळी व झेलांचे आकडे असो. क्रिकेटमध्ये आकड्यांना अनन्यसाधारण महत्व असते.एव्हाना यातील मनोरंजक आकड्यांमुळेच तर अख्खं जग क्रिकेटच्या प्रेमात पडले आहे. क्रिकेटमधील विक्रम - पराक्रम हे आकड्यांवरच ठरत असल्याने या आकडेवारीत इंटरेस्ट असणाऱ्यांसाठी ते जास्त मजेशीर ठरते. मग ते क्रिकेट आंतरराष्ट्रीय दर्जाचं असो की सध्या जगभर पेव फुटलेल्या टि२० क्रिकेटचे असो.
क्रिकेटमध्ये खास करून फलंदाजांच्या कामगिरीवर प्रत्येकाची नजर असते. त्याने ठोकलेले षटकार -चौकार जसे प्रत्येकाचे मनोरंजन करत असले तरी त्याने रचलेले धावांचे इमले सर्वांचे आकर्षण ठरते. मात्र तोच फलंदाज शुन्यावर बाद झाला तर त्याच्या इतका दुर्देवी कोणीच नसतो, आणि हो तो जर त्याच्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर शुन्यावर बाद झाला तर त्याला लोकांच्या टिकेचा धनीही बनावं लागतं. अन् विशेष म्हणजे डावाच्या पहिल्याच चेंडूवर शुन्याचा धनी बनलेल्या प्रकाराला गोल्डन डक या गोंडस नावाने संबोधले जाते. तसं बघाल तर तो प्रकार संबंधित खेळाडूसाठी लाजिरवाणा असतोच शिवाय त्याच्या संघाला अडचणीत आणणारा ठरतो.
प्रस्तुत लेखात आपण जगातील सर्वात मोठी व लोकप्रिय लिग असलेल्या आयपीएल मधील शुन्यावर बाद झालेले खेळाडू व गोल्डन डकचे शिकार बनलेल्या फलंदाजांविषयी जाणून घेऊया.
आयपीएल २०२४ चा एलिमिनेटर सामना बुधवारी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळला गेला. या सामन्यात संजू सॅमसनच्या संघाने आरसीबीला पराभूत करून क्वालिफायर- दोन मध्ये प्रवेश केला. या एलिमिनेटर सामन्यात आरसीबीला आस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलकडून चांगल्या कामगिरीची मोठी अपेक्षा होती मात्र तो त्याच्या ऑस्ट्रेलियन रणनितीनुसार हातचं राखून खेळला व गोल्डन डकचा बळी ठरला. या मोसमात तो चौथ्यांदा शून्यावर बाद झाला. ग्लेन मॅक्सवेलमोठा धूर्त खेळाडू आहे.आयपीएलमध्ये अनेक फ्रँचाईजीकडून मोठ मोठ्या रकमा घेऊन तो खेळला खरा, परंतु कोणत्याही संघासाठी त्याने आपली सर्वोत्तम कामगिरी केली नाही. उलट भारतीय खेळपट्टया, मैदाने, भारतीय खेळाडू त्यांचे चाल चलन, कच्चे पक्के दुवे यांचा सखोल अभ्यास करून घेतो व आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताविरूध्दच त्या ज्ञानाचा उपयोग करून महत्त्वाच्या व निर्णायक सामन्यात करतो. तसे बघाल तर हा प्रकार सर्वच ऑस्ट्रेलियन खेळाडू सर्रास करताना आढळतात आणि भारतीय संघ मालक त्यांना मोठयात मोठया मानधनावर आपल्याकडे खेचतात. शेवटी हे ऑस्ट्रेलियन आपले गुण उधळून संबधित संघ मालकांच्या तोंडाला पानं पुसतात. सन २०२३ च्या विश्वचषकात सर्व संघ तंबूत जाऊन बसला असताना याच अनफिट मॅक्सवेलने आफगाणिस्तानविरूध्द एका पायावर द्विशतकी खेळी करून सामना जिंकला व याच विजयाच्या आधारे अंतिम फेरीत यजमान भारताला लोळविले.
पस्तीस वर्षीय ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला. आयपीएल मध्ये सर्वाधिक वेळा गोल्डन डकचा बळी होण्याच्या बाबतीत तो दिनेश कार्तिकच्या बरोबरीने पोहोचला आहे. आयपीएलमध्ये अठरा वेळा दिनेश कार्तिक शुन्यावर बाद झाला आहे. त्याच्या पाठोपाठ मॅक्सवेल देखील आयपीएलमध्ये अठराव्यांदा शुन्यावर बाद झाला असून आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद होण्यात आरसीबीचेच ग्लेन व दिनेश हे दोघे संयुक्तरित्या आघाडीवर आहेत. ओव्हर ऑल टि- ट्वेंटी क्रिकेटमध्ये मॅक्सवेल बत्तीस वेळा शुन्याचा धनी बनला आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेले फलंदाज दिनेश कार्तिक १८, ग्लेन मॅक्सवेल १८ रोहित शर्मा १७, पियुष चावला १६ आणि सुनिल नारायण १६ हे आघाडीवर आहेत.
तर आंतरराष्ट्रीय, लिग व इतर टी-२० क्रिकेटमध्ये मिळून सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद झालेल्या फलंदाजात सुनिल नारायण ४४ वेळा हा आघाडीवर असून ॲलेक्स हेल्स ४३, राशिद खान ४२, ग्लेन मॅक्सवेल ३२, पॉल स्टर्लिंग ३२ हे एका पाठोपाठ नंबर लावून आहेत.
आयपीएलचा सतरावा मोसम ऑस्ट्रेलियन दिग्गज मॅक्सवेलसाठी विशेष खास नव्हता. त्याला फलंदाजीत दहा सामन्यांत केवळ बावन्न धावा करता आल्या. या मोसमात तो चार वेळा गोल्डन डकचा बळी ठरला. राजस्थान विरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात अश्विनने त्याला ध्रुव जुरेलकरवी झेलबाद केले. ही त्याची आतापर्यंतची फलंदाजीतील सर्वात खराब कामगिरी आहे. आयपीएल २०२४ मध्ये, मॅक्सवेलने ८.० च्या इकॉनॉमी रेटने धावा खर्च करताना केवळ सहा बळी घेतले.
आयपीएलच्या एका सत्रात सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद झालेल्या फलंदाजात जोस बटलर, राजस्थान रॉयल्स सन २०२३ मध्ये पाच वेळा. हर्षल गिब्ज, डेक्कन चार्जर्स सन २००९ मध्ये चार वेळा. मिथुन मिन्हास, पुणे वॉरियर्स सन २०११ मध्ये चार वेळा. मनीष पांडे, पुणे वॉरियर्स सन २०१२ मध्ये चार वेळा. शिखर धवन, दिल्ली कॅपिटल्स, सन २०२० मध्ये चार वेळा. ओएन मॉर्गन, केकेआर, सन २०२१ मध्ये चार वेळा. निकोलस पूरन पंजाब किंग्ज सन २०२१ मध्ये चार वेळा. दिनेश कार्तिक आरसीबी, सन २०२३ चार वेळा. ग्लेन मॅक्सवेल आरसीबी सन २०२४ मध्य चार वेळा या मान्यवरांचा समावेश आहे.
सुरुवात शुन्यातून होत असली तरी शेवट शुन्याने व्हावा असे कोणालाच वाटत नसतं. पण शेवटी तंत्र, मंत्र चुकले तर अशी नौबत येणारच. त्यासाठी संयम व धीराने घेणं हेच यावरचं रामबाण औषध आहे.
लेखक -.
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
मो.नं. -९०९६३७२०८२

