निवडणुकीचा अंतिम टप्पा संपलेला आहे. आता वाढत्या उन्हाळ्याकडे आणि पाण्याच्या टंचाईकडे विचारपूर्वक पहा. येणाऱ्या विधानसभेपूर्वी निलगिरीचा बंदोबस्त कसा करता येईल याबाबत थोडे चिंतन करूया.
निलगिरीचा वृक्ष भूगर्भातील पाणी मोठ्या प्रमाणावर खेचून घेतो त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खाली जाते याबद्दल आता अधिक संशोधन करायची गरज नाही असे वाटते. वड, उंबर, पिंपळ, जांभूळ,आंबा, करंज, कडूनींब,नीव,नांदुरी हे देशी वृक्ष प्रचंड प्रमाणात भूगर्भात पाण्याची निर्मिती करतात. या उलट निलगिरी पाणी आटवते हे सगळं माहिती असूनदेखील गेल्या अनेक वर्षापासून सह्याद्रीच्या डोंगरावर, गावातून, शेताच्या बांधा बांधावर, गावाच्या कडेकडेला मोठ्या प्रमाणात निलगिरीची लागवड झाली. परिणामी पाणवठे आटले. उन्हाळी झरे आटले. डोंगर कपारीतील नाले, डोह आटले. पशुपक्ष्यांना डोंगरात पाणी मिळेनासे झाले. अशी दुर्दशा ओढावलेली आहे. हवेतील गारवा नाहिसा झाला. निलगिरीपासून उत्तम प्रकारे कागद तयार होतो. निलगिरीचे अनेक उपयोग आहेत असा केवळ प्रचार करून लागवडीस उपयुक्त, सरसकट झाड लावले की वाढते म्हणून निलगिरी लावली आणि ती मोठ्या प्रमाणात वाढली. निलगिरीची वाढलेली झाडे तोडून ती कागद कारखान्याला किंवा औषध निर्मिती करण्यासाठी कुठे विक्री झाल्याची उदाहरणे ऐकिवात नाहीत. मात्र अतोनात, बेसुमार वाढ झालेली निलगिरी आता वातावरणातले पाणीच नष्ट करण्याचं काम करते आहे. तेव्हा ती निलगिरी तोडणे अत्यंत गरजेचे झालेले आहे. असे केल्याने प्रचंड मोठमोठ्या वाढलेल्या निलगीरीच्या झाडांच्या लाकडाच्या विक्रीतून मोठ्या प्रमाणात सरकारचा अर्थिक फायदा देखील होईल. तर भूगर्भातील पाणी मोठ्या प्रमाणात खेचून घेणारे लाखो निलगिरी वृक्ष नामशेष झाले तर भूगर्भात पाण्याचा साठा नक्कीच शिल्लक राहील. जल पातळी वाढेल.
याबाबत प्रामुख्याने पर्यावरणवादी संघटनांसह ग्रामपंचायतीपासून महानगरपालिकेपर्यंत प्रत्येक पातळीवर, प्रत्येक नागरिकाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.
निलगिरीचे मोठमोठे प्रचंड वृक्ष आपण पाहतो. निलगिरीची जंगले पाहतो. ही सगळी जंगले भूगर्भातील पाण्याचा नाश करण्यास कारणीभूत आहेत. तेव्हा जनतेने रेटा लावून शासनाकडून या वृक्षांची तोड करून निलगिरी नामशेष कशी करता येईल त्यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. यावर्षीच्या वृक्षारोपणाच्या मोहिमेत निलगिरी तसेच विदेशी वृक्ष, जे पर्यावरणास मारक आहेत त्यांच्या लागवडीवर जाणीवपूर्वक बहिष्कार टाकावा. आपल्याला विषय पटत असल्यास वृक्ष साक्षरता, लोक जागरणास्तव हा विचार मंत्रालयापर्यंत सर्वत्र प्रचार करावा व क्रियाशील होऊन निलगिरीचे पर्यावरणनाशाचे आक्रमण, निलगिरी नावाचा अतोनात पाणी पिणारा हा राक्षस महाराष्ट्रातून संपवावा.
चंद्रकांत शहासने, पुणे.
९९६००६१३०९

