गौतम बुद्ध यांना जी ज्ञानप्राप्ती झाली,त्यामध्ये प्रथम त्यांना चार आर्यसत्याचे आकलन झाले. जगात दुःख आहे. हे दुःख, तृष्णा, वासना, हव्यास याने निर्माण झाले आहे. दुःख दूर होऊ शकते का ? हा तिसरा अत्यंत महत्वाचा प्रश्न होता. तेंव्हा त्याचाही शोध घेऊन आपण दुःख दूर करू शकतो हा आत्मविश्वास त्यांनी जगाला दिला आणि दुःखांनी तळमळत पडलेल्या, तडफडत असलेल्या माणसाला दुःख मुक्तीचा मार्ग दिला. भोग आणि आत्मक्लेश या दोन्हीपासून सुख मिळू शकत नाही.
कामतृष्णेपासून मुक्त झालात तरच सुख मिळेल. जीवनाच्या स्वाभाविक गरजा जरूर पूर्ण करा,शरीराचे आरोग्य चांगले ठेवा.हे तर तुमचे कर्तव्यच आहे. तुम्ही आवश्यक गरजा पूर्ण केल्या नाहीत तर ज्ञान देखील तुम्ही मिळवू शकणार नाही.पण सतत वासनेत डुंबून जाणे ,सतत भोग घेण्याची लालसा मनात असणे ,सतत इंद्रियांच्या द्वारे इच्छा निर्माण होतात त्या इच्छांच्या मागे इच्छा पूर्ण करण्यासाठी धावत सुटणे ,अति सुख मिळविण्यासाठी वाट्टेल त्या टोकाला जाणे, हे मात्र चांगले नाही. एक इच्छां पूर्ण झाली की दुसरी तयार होते. दुसरीला धरता तेंव्हा तिसरी पुढे येत असते. इच्छा अनंत आहे. जीवनात सर्वच इच्छा पूर्ण कशा होतील? एक इच्छा पूर्ण झाल्याचे सुख मिळाले की पुन्हा पुन्हा तो अनुभव हवासा वाटतो. हा हव्यास कधीच संपत नाही ,आणि सर्व इच्छा पूर्ण होत नाहीत. मग तुम्हाला प्रत्येक इच्छा अपूर्ण राहिली की दुःख वाढते.सुखाचे क्षण कमी पण दुःख पर्वताएवढे होते. म्हणूनच कामवासनेच्या मागे धावत सुटणे दुःखद असते. यातून समाधान मिळणे मुश्कील होते. हा रानटीपणाचा मार्ग मानवी जीवनाला हानिकारक आहे. दुसरे असे की आत्मक्लेश करून घेणे ,देहाला दंड देणे ,अन्न वर्ज्य करून तपश्चर्या करणे हा देखील टोकाचा आणि घातक मार्ग आहे .जो माणसाच्या देहाला आणि चित्ताला समाधान देऊ शकत नाही. त्यामुळे कामवासनेच्या आत्यंतिक तहानेने पछाडलेल्या माणसाची ही जिंदगी काय कामाची ? तसेच तपश्चर्या करून आत्मक्लेश करणे तसेच इंद्रियांच्या नैसर्गिक स्वाभाविक गरजा देखील पूर्ण होऊच द्यायच्या नाहीत ही टोकाची भूमिका घेणे त्यातूनही आपल्याला काही फायदा होत नाही. मी या दोन्ही गोष्टीना महत्व न देता मध्यममार्ग हाच आयुष्याला हितकारी आहे हे समजून घेतले आहे. मला ईश्वर आत्मा याच्याशी काही देणे घेणे नाही. जन्मापूर्वी काय झाले नंतर काय होईल याबद्दलही मी बोलत नाही. मला याची जाणीव झाली आहे की माणूस दुःखात राहत आहे.. माणूस दुःखापासून कसा मुक्त होईल याचा शोध मी घेतला आहे. दुःख दूर करण्याचा मार्ग म्हणजे माझा धम्म आहे. मला तरी जगातला सर्वात मोठा प्रश्न जगातले दुःख कसे दूर करता येईल हाच महत्वाचा आणि यथार्थ वाटला आहे. त्यामुळे मी फक्त याच विषयी तुम्हाला सांगतो. बुद्धाना ज्या वेळी पाच परिव्राजक यांनी विचारले की दुःख दूर करण्याचा मार्ग कोणता ? त्यावेळी त्यांनी दुःख मुक्तीचा मार्ग सांगितला आहे. हा मार्ग खरोखर जगातील सर्व माणसांचे कल्याण करणारा मार्ग आहे. बुद्धाने या मार्गाला पवित्र व सदाचरण करण्याचा मार्ग म्हटले आहे. त्यांनी सांगितलेला मध्यम मार्ग हाच कल्याणकारी मार्ग त्यांना वाटतो. मध्यममार्गात त्यांनी शिलाला , सदाचरणाला महत्व दिले हाच मार्ग दुःख मुक्तीचा मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले.
बुद्धांनी चांगला मनुष्य होणे हे धम्माचे ध्येय त्यांनी मानले आहे. त्यासाठी जीवनात काही तत्वे माणसाने पाळली पाहिजेत. शील हा धम्माचा पाया आहे. १ कोणत्याही प्राण्याची हिंसा करू नका ,कोणास इजा करू नका.२ चोरी करू नका अगर कोणाच्याही मालकीची वस्तू बळकावू नका. ३ व्यभिचार करू नका , कामवासनेत डुंबून जाऊ नका, ४ असत्य बोलू नका, ५ मती गुंग करणाऱ्या कोणतेही मादक पेय अगर वस्तूचे सेवन करू नका. हेच ते पंचशील तत्व. खरे तर माणसाला चांगला किंवा वाईट माणूस ठरवायचा असेल तर हे निकष म्हणजे मोजमाप आहे. पंचशील तत्व हे चांगला माणूस बनण्याचा आदर्श आहे. ज्याला दुःख मुक्त व्हायचे आहे त्याने प्रथम पंचशील आपल्या आचरणात नेहमी पालन केले पाहिजे. ही तत्वे व्यक्तीच्या हिताची आहेत की नाहीत अनुभवाने खात्री करा .पंचशील ही जीवन निर्मळ करणारी, आदर्श आचार संहिता आहे गौतम बुद्धांचे मत होते. पृथ्वीतळावर सर्व काळात सुखी समाधानी माणूस होण्यासाठी ,एक आदर्श समाज तयार होण्यासाठी ही मौलिक आहेत. राष्ट्र कोणतेही असो, कोणताही मानवी समूह सर्वांचे कल्याण व्हायचे असेल तर सर्वानीच ही तत्वे पाळायला हवी. आज जगात जी युद्धे झाली, हिंसा झाली,वाटोळे झाले त्याचे कारण टोकाचे भोगवादी व चंगळवादी जीवन आहे .तरी देखील त्यांचे दुःख कमी न होता वाढतच चाललेले आहे. आपल्या देशातील अराजक, हिंसा ही सर्वांचे दुःख निर्माण करायला कारणीभूत ठरली आहे.
गौतम बुद्धांनी जो अष्टांगिक मार्ग सांगितला. यालाच त्यांनी ‘दुःखनिरोधगामिनी प्रतिपदा’ असे म्हटले आहे.बुद्धांच्यापूर्वी एवढा सोपा ,नेमका ,आचरणास योग्य असा मार्ग कोणीही सांगितला नव्हता. हे आठ मार्ग तीन प्रमुख भाग आहेत. हे तीन विभाग म्हणजे १ प्रज्ञा, २ शील, ३ समाधी, उदा. प्रज्ञा विभागात १ सम्यक दृष्टी, २ सम्यक संकल्प हे दोन मार्ग येतात . शील विभागात ३ सम्यक वाणी ४ सम्यक कर्मांत ५ सम्यक आजीविका हे तीन मार्ग येतात. तर समाधी विभागात ६ सम्यक व्यायाम ७ सम्यक स्मृती ८ सम्यक समाधी हे मार्ग येतात. जो माणूस पंचशील पालन करतो तो शहाणा माणूस या मार्गाने गेला तर दुःख मुक्त होऊ शकतो.
सम्यक दृष्टी हा बुद्धांनी सांगितलेला पहिला मार्ग. दुःख, दुःख समुदय,दुःख निरोध,दुःख दूर करण्याचा मार्ग अष्टांग मार्ग आहे ही यथार्थ ज्ञान देणारी दृष्टी म्हणजे सम्यक दृष्टी. रूप तयार होते नष्ट होते,वेदना उत्पन्न होतात नष्टही होतात , नाम उत्पन्न होते नष्ट होते, संस्कार उत्पन्न होतात नष्ट होतात, विज्ञान उत्पन्न होते नष्ट होते, म्हणजे दुःख आहे. अनित्य हेच सत्य असल्याचे कळून जो विमुक्त होतो , त्याला सम्यक दृष्टी असते. सर्व काही परिवर्तनशील व प्रवाही आहे. माणसाच्या मनात सुष्ट आणि दुष्ट दोन प्रकारच्या इच्छा निर्माण होतात हे जो माणूस समजून घेतो त्याने नेहमीच चांगल्या इच्छा घेऊन चांगले कर्म करायला पाहिजे .माणसाचा हेतू हा दुष्ट असता कामा नये. आपले कर्म आपल्याला दुःख मुक्त करेल असेच असले पाहिजे. योग्य मार्गाने जाण्याची दृष्टी म्हणजे सम्यक दृष्टी. मनाला योग्य मार्गाने नेणे ,डोळस होणे ,अंधश्रद्धा व अज्ञान यातून मुक्त होणे , यथार्थ जग माहित करून घेत दुःख अस्तित्व माहीत करून घेत दुःख निरोध उपाय माहित करून घेतपुढे जायला हवे. कर्मकांड नको,अदभूतता नको, काल्पनिक अनुमाने नकोत, वास्तवता व अनुभवाचा आधार हवा. अविद्येचा विनाश हाच सम्यक दृष्टीचा उद्देश आहे.
सम्यक संकल्प म्हणजे आपण जे संकल्प करतो ते उदात्त आणि उच्च असावे. क्षुद्र ध्येयात न अडकता उदात्त ध्येयाकडे जाणे हे सम्यक संकल्पात अभिप्रेत आहे. चित्त किंवा मनामध्ये चांगला संकल्प करायला हवा..माणसाचे सर्व व्यवहार मनोमय असतात. माणूस दुष्ट चित्ताने बोलला तर बैलगाडीचे चाक जसे बैलाच्या मागे लागते ,तसे दुःख मागे लागते. माणसाच्या विचार व आचाराचा परिणाम बाह्य जगावर होत असतो. विचार सम्यक कुशल असतील तर ते शब्दात आणि कृतीत उतरत असतात. मैत्री आणि करुणेने केलेले सर्वांच्या मंगलासाठी केलेले संकल्प हे उदात्त कुशल संकल्प असतात. आपल्या मनात येणारे वाईट विचार जे स्वतःला व इतरांना त्रास देतील असे असतात ते उपयुक्त नसतात. हिंसा, व्देष ,लोभ,मोह मनात ठेवून पुढे वाटचाल करणे इष्ट नसते. यासाठी पापाची मुळे मनातून काढून टाकली पाहिजेत. वाईट विचार मनात असतील तर निर्मळ आचरण होणार नाही. मन समतावादी असणे आवश्यक आहे. अहंकार नको, करुणा आणि प्रज्ञा यांचा मेळ विचारात हवा. अमर्यादित मैत्री भावना ,मुदिता म्हणजे प्रसन्न भावनेने काम करणे ,उपेक्षा म्हणजे मन स्थिर असणे , सुख आणि दुःख आले तरी मन स्थिर ठेवता यायला पाहिजे. समाजात वागताना मैत्री,करुणा ,प्रसन्नता ,आणि उपेक्षा मनाची स्थिरता या गोष्टी असतील तर द्वेष भावना वाढत नाही म्हणूनच या प्रकारे मन घडविण्याचा संकल्प हवा. अगदी बुद्धांनी केलेला सम्यक संकल्प पहा. सर्व मानव जातीचे दुःख दूर व्हायला हवे हा संकल्प त्यांनी केला त्या मुळे जगाला शांतता ,स्थिरता ,बंधुता ,मैत्री भावनेचा ,अहिंसेचा विचार मिळाला आणि सर्वांचे मंगल झाले.
शील या शब्दाचा अर्थ ‘नितीमत्ता’ आहे. ज्याचे बोलणे चालणे नीतीला धरून आहे त्याला शीलवान म्हणतात . जो जीवनात कुशल कर्मेच करीत असतो तो शीलवान. मन हे चंचल आहे.मनाला आळा घालण्याचे काम शील करीत असते. मनाला सदाचारी मार्गाने वाटचाल करायला लावणे महत्वाचे असते. आपल्या जीवनात आपण अनेक चांगली वाईट कर्मे करीत असतो. चांगली कर्मे म्हणजे कुशल. तर वाईट कर्मे ही अकुशल असतात. कर्म म्हणजे कार्य. आता ही कर्मे आपण कशाद्वारे करतो ? तर बुद्धांनी सांगितले काया [शरीर ] वाचा [वाणी ] व मन या द्वारे करत असतो. मनात इच्छा निर्माण झाली की आपण कार्य करायला लागतो. शीलवान माणूस कुशल कर्मे करतो.शरीराने तो हिंसा करीत नाही. चोरी करत नाही,वाणीने वाईट बोलत नाही,मनाने देखील वाईट करत नाही. शीलवान मनुष्य आपल्या चांगल्या कामात मग्न असतो,तो निरर्थक बोलत नाही, वेळ वाया घालवत नाही,झोपा काढत नाही ,आळसी असत नाही, पाप करत नाही ,व्यभिचार करत नाही, तो गर्विष्ठ असत नाही, तो मुर्खासारखी बडबड करत नाही . संयमित अशी त्याची वाणी असते .आपले शरीर तो स्वच्छ ठेवतो,नेहमी तो जागरूक असतो. सावध असतो. स्वतःचे तसेच इतरांचे कल्याण व्हावे यासाठी तो चांगल्या मार्गाने संपत्ती कमावतो. इतरांना मदत करतो. तो व्यसनी असत नाही .दुराचारी असत नाही. आपल्याकडून कोणतेही पापकर्म होऊच नये यासाठी तो स्वतः च्या मनावर सतत नियंत्रण ठेवून असतो. त्यामुळे त्याची कीर्ती होत असते. तो करुणाशील असतो.तोकधीही मूर्खाची संगती करत नाही. वेळ पडली तर जंगलात सिंह एकटाराहतो तसा तो एकटा राहील ,पण दुष्टांची सांगत करणार नाही. उलट दुष्टांचे मन देखील तो आपल्या नैतिकतेने चांगल्या दिशेला नेतो. चांगली लोक कल्याणकारी कामे करण्यात त्यास समाधान मिळते. तो लोभ ,मोह ,द्वेष या पासून अलिप्त राहतो .तो स्वतःचे संरक्षण करतो. योग्य व्यक्तींचा आदर करतो. सन्मार्गाकडे त्याची वाटचाल असते.तो विद्या पुष्कळ संपादन करण्याचा प्रयत्न करतो. त्याचे भाषण समयोचित असते. शक्यतेनुसार दान तो करतो.नातलगांना वेळ प्रसंगी तो मदत करतो. मद्यपान कधीही करत नाही. तो नेहमी विनयशील नम्र असतो. धर्मोपदेश करणे त्यास हिताचे वाटते. शांत आणि समाधानी राहतो. मधुर भाषण करतो. जर तो भिक्कू असेल तर श्रमणांची भेट घेतो.. निंदेकडे तो दुर्लक्ष करतो. त्याचे मन विचलित होत नाही. चित्त स्थिर आणि निर्मळ असावे यासाठी तो स्वतः ध्यान करतो. शीलाचा एकत्रित असा विचार केला तर या प्रकारचे वर्तन व्यक्तीकडून होत असते.
शिलामध्ये सम्यक वाणी म्हणजे काय ? तर खोटे न बोलणे ,चहाडी न करणे , कठोर न बोलणे , निरर्थक न बोलणे ,बोलणे द्वेष निर्माण करणारे नसावे तर मैत्री वाढवणारे असावे. सरळ , गोड ,मृदू व निगर्वी बोलणे हवे .प्रांजळ.निष्कपट ,उजळ बोलणे असावे.बोलण्यात संदिग्धता नको.अर्धवट नको. फुट पाडणारे बोलू नका,एकी निर्माण करणारे बोला. विषारी डास होऊ नये. शांती नांदेल असे बोला,शिवीगाळ करू नका,मूर्ख माणूस शिवीगाळ करून स्वतःवर कुऱ्हाड मारत असतो. कर्कश बोलू नका,मधुर बोला. वाणीने कुशल विचार व कर्म झाले पाहिजे. जास्त बोलणे हे देखील योग्य नाही. सम्यक कर्मांत म्हणजे योग्य निर्मळ कर्म. जीव हिंसा करू नका, चोरी करू नका, व्यभिचार करू नका, दुराचरणी होऊ नका. सत्कर्मे करा हित होईल.दुष्कर्मे केली अहित होईल. आज श्रीमंत माणसे गरीब माणसापेक्षा चोऱ्या करतात. नोकरीत कामचुकारपणा करणे ही देखील एक चोरी आहे असे एम.एस मोरे सांगतात. व्यभिचार का करू नये तर त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडते. पती पत्नींनी एकमेकांच्या लैंघिक सुखाचा आनंद घ्यायला काहीच ना नाही. त्यांनी एकमेकात संतुष्ट राहावे .पर पुरुष ,पर स्त्री यांचेशी लैंघिक सबंध ठेवू नये त्यामुळे स्वतःचे व समाजाचे स्वास्थ्य नीट राहत नाही. दुसऱ्याची सन्मार्गाने भरभराट होत असेल तर आपण जळफळाट करून घेऊ नये. सारांश माणसाने वाणी,कर्म व मन शुद्ध ठेवावे. मलीन करू नये हा विचार शीलात सांगितला आहे. तसेच सम्यक आजीविका म्हणजे व्यवसाय योग्य करून जगावे.शस्त्रे, प्राणी , मांस ,मद्य व विष यांचा व्यापार करू नका. हे अकुशल धंदे आहेत. लालसेने इतरांचे कडून सन्मान घेऊ नका. सदाचारी व्हा. माझ्या मुळे कुटुंबात जगात सुख समाधान मिळावे असे असे आचरण ठेवावे. लोकांना भ्रमित करू नका , फसवू नका, भविष्य सांगू नका, बेकायदेशीर कृत्ये करू नका, अवेळी बाहेर भटकू नका, व्यसन करू नका, नाटक ,तमाशाचे व्यसन नको.पापी मित्रांची संगत नको. दान करा, प्रिय वचन बोला. आर्थिक स्थैर्य निर्माण करा.चांगल्या मार्गाने संपत्ती मिळवा ,कोणाचेही कर्जात राहू नका. या प्रकारे आजीवन सदाचरणी असावे असे त्यांचे मत आहे.
समाधी विभागात सम्यक व्यायाम ,सम्यक स्मृती व सम्यक समाधी हे मार्ग येतात. सम्यक व्यायाम म्हणजे अविद्या नष्ट करण्याचा प्राथमिक प्रयत्न. अष्टांग मार्ग विचार पुन्हा पुन्हा उजळणी करणे हे सम्यक व्यायामात आवश्यक आहे. मनात सतत चांगले विचार यावेत व कुशल कर्मे आपल्या हातून घडवीत जाण्याचा सराव करणे म्हणजे सम्यक व्यायाम. अष्टांग मार्ग विरोधी कोणतीही गोष्ट न करणे ,आपल्या इंद्रियावर नियंत्रण ठेवणे हा सम्यक व्यायाम आहे.. प्रयत्नवादी बना .असे विचार या मार्गात आहेत.दैववादी होऊ नका.
सम्यक स्मृती म्हणजे मनाची सतत जागृती.दुष्ट वासनावर मनाचा पहारा ठेवणे .सतत दक्ष राहणे. काय म्हणजे शरीर रात काय चालले आहे हे तटस्थ दृष्टीने पाहणे ,हित अहिताचा शोध घेऊन फक्त हितकारक गोष्टींचा स्वीकार करणे.शरीरात व मनात घडणाऱ्या सर्व गोष्टी तो जाणतो. अनित्य बोध घेऊन तो विमुक्त जीवन जगत असतो. चित्त ,संवेदना ,शरीर, मनाचे धर्म ,याची टेहळणी तो सतत करतो. यथार्थचे आकलन म्हणजे स्मृती. जागरूक ,प्रयत्नशील ,ज्ञानयुक्त ,सावधान राहणे म्हणजे सम्यक स्मृती. सतत जागरूक राहणे,विवेचक बुद्धी असणे,सतत उत्साही असणे,शांती असणे, प्रेमळ असणे,मन एकाग्र असणे, सर्व संस्कार अनित्य आहेत याचा अभ्यास असणे,प्रमाद रहित जीवन जगणे हे इथे अभिप्रेत आहे. जागरूकता आणि सुस्पष्ट आकलन म्हणजे स्मृती होय. समाधी मनाची एकाग्रता .सम्यक समाधी म्हणजे कुशल मन एकाग्रता. मन शांत करणे म्हणजे चित्त एकाग्र करणे. विपश्यना म्हणजे खोलात जाऊन स्वतःची यथार्थ पाहणी करणे .जग अनित्य आहे. जगात दुःख आहे.आणि आत्मा वगैरे काही नाही याचा स्वतः अनुभव तो घेतो. त्यामुळे निसर्ग सत्याचे ज्ञान माणसाला होते. शीलवान माणूस सम्यक समाधी सुख घेऊ शकतो. पाण्यात शेवाळ असले ,तसेच पाणी गढूळ असले तर स्वतःचे प्रतिबिंब पाहता येत नाही त्या प्रमाणेच आळशी माणसाला यथार्थ ज्ञान दिसणार नाही. समाधीसाठी आपल्यातील आळस ,संशय ,क्रोध ,चित्तातील वासनाचा छंद ,आणि भ्रांती काढूनच टाकली पाहिजे . मन शुद्ध करण्यासाठी समाधी साधना आहे. एकाग्र चित्त असेल तर कुशल वृत्ती निर्माण होतात. योग्य आचरण केले नाही तर धम्मज्ञान मिळत नाही. अष्टांग मार्ग हा स्वतः बुद्ध बनण्याचा मार्ग आहे. स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटणारा मनुष्य समाधानी जीवन जगतो. सर्व सामान्य माणसाला सोप्या भाषेत धम्म समजावून सांगणारे , जगाला दुःख मुक्तीचा मार्ग सांगणारे बुद्ध हे जगातील बहुजन हितकरी करुणाशील व्यक्तिमत्व होते. आपण दुःख मुक्तीचा अष्टांग मार्ग पुन्हा पुन्हा समजून घ्यायला हवा.
लेखन
प्रा.डॉ.सुभाष वाघमारे
छत्रपती शिवाजी कॉलेज,
सातारा - ९८९०७२६४४०
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस,
श्रीरामपूर -९५६११७४१११

