shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत अधिकाधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घ्यावा


अहमदनगर जि.मा.का. वृत्तसेवा:
महाराष्ट्र शासनातर्फे सार्वजनिक गणेशोत्सवात जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे, यासाठी गतवर्षात राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात आले होते. त्याच धर्तीवर येत्या ७ सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय शासनाने घेतला असुन अधिकाधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

            लोकमान्य टिळकांनी जनजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव आयोजित करण्याची प्रथा सुरु केली. महाराष्ट्र शासनातर्फे सार्वजनिक गणेशोत्सवात जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे, यासाठी सन २०२३ मध्ये राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात आले होते. त्याच धर्तीवर ७ सप्टेंबर, २०२४ पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

            सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २००२४ अंतर्गत मुंबई, मुंबई (उपनगर), पुणे व ठाणे या जिल्हयातून प्रत्येकी ३ व अन्य जिल्हयातून प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण ४४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येणार असून त्यातून राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशात्सव मंडळांस ५ लक्ष रुपये, द्वितीय क्रमांकास रुपये २.५० लक्ष रुपये व तृतीय क्रमांकास रुपये १ लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तर उर्वरीत ४१ जिल्हास्तरीय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी रुपये २५ हजार  चे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

            या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त याच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे किंवा स्थानिक स्वराज्य सस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांना सहभागी होता येईल. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in संकेतस्थळावरील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या ३१ जुलै २०२४ रोजीच्या शासन निर्णयासोबत स्पर्धा निवडीचे निकष व अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. सदर अर्जाच्या नमुन्यानुसार स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर 1 ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट, २०२४ या कालावधीत अर्ज सादर करावा, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
close