मुंदडा परिवाराने शिवरामपुरी मठ संस्थानाबद्दल समर्पणभाव कायमच जपला - महंत भगवान महाराज
वरपगाव येथे सभामंडपासह रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी :-
__________
मागील पाच वर्षात केज मतदार संघाचा सर्वांगीण विकास हेच ब्रीद केंद्रस्थानी ठेऊन आपण प्रामाणिकपणे विकासाचीच कामे करण्याचा प्रयत्न केला आहे .आज येथे भूमिपूजन केलेले सभामंडपाचे कामही त्याचीच साक्ष असल्याचे मत आ. नमिता मुंदडा यांनी व्यक्त केले. तर मुंदडा परिवाराने शिवरामपुरी मठ संस्थानांवर कायमच आपली श्रद्धा व भक्तिभाव दाखवला असल्याचे हभप भगवान महाराज वरपगावकर यांनी सांगितले . प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत हजारो नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या वरपगाव येथील साधू शिवरामपुरी मठ संस्थानला मंजूर झालेल्या सुमारे एक कोटी रुपयांच्या सभामंडप व रामा - 64 ते वरपगाव या पावणेदोन कोटी रुपयांच्या रस्त्याच्या भूमिपूजन समारंभ कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमास नंदकिशोरजी मुंदडा , सुनील गलांडे , डॉ टी एल देशमुख , डॉ वासुदेव नेहरकर , ऍड हनुमंत देशमुख , तात्यासाहेब देशमुख , संदीप देशमुख , भगवानराव देशमुख , विजयराव खंदारे , शहाजीबापू देशमुख , अंकुशराव देशमुख , लिंबराज फरके , सा बां चे उपअभियंता मुंडे , महादेव सूर्यवंशी , शरद इंगळे , सुरेश नांदे , शिवाजी पाटील , सुनील घोळवे , संतोष जाधव , कदीर खुरेशी यांची प्रमुख उपस्थिती होती .
पुढे बोलताना आ नमिता मुंदडा म्हणाल्या कि ; शिवरामपुरी मठसंस्थान हे परिसरातीलच नाही तर बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील हजारो भक्तांचे श्रद्धास्थान आहे . ईथे होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमात नैसर्गिक आपत्ती बाधा ठरू नये यासाठी विशेष प्रयत्न करून एक कोटी रुपयांच्या या भव्य सभामंडपाची मंजुरी मिळवली अन त्याचे भूमिपूजन आज होत आहे . कामाचे भूमिपूजन होत असताना आपल्याला मनस्वी आनंद होत आहे . आगामी दोनच महिन्यात याचे काम पूर्ण करावे यासाठी आपण आग्रही आहोत . करण्यात येणारे कामही गुणवत्तापूर्णच असेल अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी देत या सभामंडपाचा फायदा सर्वसामान्यांचे कार्यक्रम घेण्यासही होणार असल्याचे सांगितले . तसेच रामा - 64 ते वरपगाव या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कोणीही तो पाईपलाईन अथवा ईतर कोणत्याही कामासाठी खोदु नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले .
यावेळी बोलताना महंत भगवान महाराज म्हणाले कि ; मुंदडा परिवाराने कायमच शिवरामपुरी मठाबद्दल आपला भक्तिभाव जपला आहे वैकुंठवासी रामकृष्ण महाराज अन मुंदडा कुटुंबामध्ये आत्मिक स्नेहभाव व प्रेम होता तो त्यांनी आजही जपला आहे तसेच होऊ घातलेल्या सभामंडपामुळे सामाजिक व धार्मिक कार्य कोणत्याही अडचणीशिवाय पार पडण्यास मदत होणार आहे . विशेष म्हणजे मठ संस्थानने त्यांना सभामंडपाची कसलीही मागणी न करता तो मंजूर करून दिला त्याबद्दल त्यांनी आ नमिता मुंदडा व जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांचे ऋण व्यक्त केले व मठ परिसराचा वाढता विस्तार पाहता एक स्वतंत्र डीपी असणे क्रमप्राप्त झाल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले .
यावेळी बोलताना नंदकिशोर मुंदडा म्हणाले कि महंत रामकृष्ण महाराजांनी माझ्यावर मुलासारखे प्रेम केले . मला " काकाजी " हि उपाधी रामकृष्ण महाराजांनी दिली असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी आवर्जून केला . केज मतदार संघात सभागृहांची संकल्पना स्व विमलताईंनीच राबवली आजही त्यांच्या कार्यकाळात झालेली सभागृह याची साक्ष देतात . शिवरामपुरी मठ परिसरात होत असलेला हा सभामंडप दर्जात्मक असाच असणार आहे तसेच या सभामंडपात तीन हजार लोक बसू शकतील एवढा भव्य असणार असल्याची माहिती त्यांनी दिली . मतदार संघात वीज , रस्ता , पर्यटन , तीर्थक्षेत्र यासह अन्य विकासात्मक कामासाठी कसा निधी खेचून आणला याचा पाढाच त्यांनी यावेळी वाचत भविष्यातही विकासात्मक कामांसाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही उपस्थितांना दिली .
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा हनुमंत भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन धनंजय देशमुख यांनी केले.
यावेळी हदगाव ,डोका , साळेगाव , सातेफळ , लाखा , बोरगाव ,पोतरा , माळेगाव या गावचे सरपंच व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



