दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होऊ घातलेला चॅम्पियन्स ट्रॉफीतील सातवा सामना मंगळवारी पावसामुळे रद्द करण्यात आला. हा सामना रावळपिंडीत होणार होता, मात्र सकाळ पासूनच पावसाचा प्रभाव सुरू होता. त्यामुळेच हा सामना नाणेफेक न होताच रद्द करण्यात आला. पाऊस थांबल्यास भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजल्यापासून २०-२० षटकांचा सामना होऊ शकतो, अशी पंचांची अपेक्षा होती, परंतु मेघराजने कोणतीही उदारता दाखवली नाही आणि सामना रद्द करण्यात आला.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना पावसात वाहून गेल्याने ब गटातील उपांत्य फेरीची लढत रंजक बनली आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक गुण जोडला आहे आणि टेंबा बावुमाच्या नेतृत्वाखालील संघ तीन गुण आणि + २.१४० च्या निव्वळ रनरेटसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे, तर ऑस्ट्रेलिया तीन गुण आणि + ०.४७ च्या निव्वळ रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. आता आठवा सामना इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार असून, त्यात पराभूत संघाचा प्रवास जवळ जवळ संपेल.
इंग्लंड -०.४७५ च्या नेट रन रेटसह तिसऱ्या स्थानावर आहे आणि अफगाणिस्तान -२.१४० च्या नेट रन रेटसह चौथ्या स्थानावर आहे. या दोन्ही संघांना त्यांच्या मागील सामन्यांमध्ये अनुक्रमे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला होता. अ गटातून न्यूझीलंड आणि भारत आधीच उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. त्याचबरोबर यजमान पाकिस्तान आणि बांगलादेश हे संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. अशा स्थितीत बुधवारी ब गटातील सामन्यात पराभूत होणारा संघ या स्पर्धेतून बाहेर पडणारा तिसरा संघ ठरेल.
स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच रावळपिडीन सोमवार- मंगळवार -बुधवार या तिन दिवशी हवामान खात्याने अंदाज वर्तविला होता. इतकी महत्वाची स्पर्धा सुरू असतानाही पीसीबीकडून मैदान झाकण्याची कोणतीही प्रभावी व्यवस्थान केल्याने मैदान पाऊस थांबला असता तरी सामना सुरूच होऊ शकला नसता. वास्तविक पूर्ण मैदान झाकण्याची व्यवस्था पीसीबीकडून होणे गरजेचे होते. मात्र त्यांनी काहीही न करता केवळ खेळपट्टयांचा स्क्वेअर झाकण्याचीच औपचारीकता बजावली. अशा परिस्थितीत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघास त्रास होऊ शकला असता. सुदैवाने पाऊस थांबला नाही व पुढील अनर्थ टळला.
पाकिस्तानमधील सुरक्षा व्यवस्था अतिशय नादान असल्यामुळे मागील अनेक वर्षांपासून भारत पाकिस्तानात खेळायला जात नाही, तसेच या स्पर्धेतही भारत पाकिस्तानात गेला नसून हायब्रीड मॉडेलच्या धर्तीवर टीम इंडिया आपले सामने दुबईत खेळत आहे. भारताच्या या भूमिकेला पुष्टी देणाऱ्या घटना सध्या पाकिस्तानात घडत आहेत.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) गलथान कारभाराचा आणखी एक पुरावा समोर आला आहे. पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्यांचे पोलीस कर्तव्य बजावण्यास तयार नाहीत. खेळाडूंच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलिस कर्मचारी ड्युटीवरून बेपत्ता असल्याचे दिसले आणि त्यांनी सुरक्षा कर्तव्य बजावण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. यानंतर पाकिस्तानच्या पंजाब पोलिसांच्या शंभरहून अधिक पोलिसांना बडतर्फ करण्यात आले. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. बडतर्फ केलेले कर्मचारी पोलिस दलातील विविध शाखांचे होते.
पंजाब पोलिसांच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान पोलिस अनेक वेळा कर्तव्यावर गैरहजर आढळून आल्याने शंभरपेक्षा अधिक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांच्या पदांवरून काढून टाकण्यात आले आहे, तर अनेकांनी त्यांची नियुक्त केलेली कर्तव्ये पार पाडण्यास नकार दिला आहे. ते म्हणाले की, लाहोर मधील गद्दाफी स्टेडियममधून नियुक्त हॉटेल्समधून प्रवास करणाऱ्या संघांना सुरक्षा पुरवण्यासाठी पोलिस व अधिकारी तैनात करण्यात आले होते. परंतु ते एकतर गैरहजर राहिले किंवा त्यांनी त्यांची जबाबदारी घेण्यास स्पष्टपणे नकार दिला. सदर अधिकाऱ्याने आणखी सांगितले की, आयजीपी पंजाब उस्मान अन्वर यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून संबंधित पोलिसांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तो अधिकारी म्हणाला की, जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा निष्काळजीपणाला वाव नाही.
बडतर्फ केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचे अधिकृत कर्तव्य बजावण्यास का नकार दिला याबद्दल कोणतेही अधिकृत विधान आलेले नसले तरी, बर्खास्त केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना बऱ्याच तासांच्या ड्युटीमुळे जास्त ओझे वाटत होते असे अनेक स्थानिक मीडिया रिपोर्ट्स सूचित करतात.
सदर स्पर्धेवर दहशतवादाची छाया पसरली आहे. सोमवारी न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील सामन्या दरम्यान एका चाहत्याने बारा हजार पोलिसांना चकमा देत रचिन रवींद्रला भेटण्यासाठी मैदानात प्रवेश केला. न्यूझीलंड आणि बांगलादेश सामन्यादरम्यान इस्लामी राजकीय पक्षाचा कथित समर्थक मैदानात घुसला. न्यूज एजन्सी एपीच्या मते, तहरीक-ए-लब्बैक (टीएलपी) नेता साद रिझवीचे छायाचित्र घेऊन आलेला घुसखोर न्यूझीलंडचा क्रिकेटर रचिन रवींद्रच्या जवळ येऊन त्याला मिठी मारण्यात यशस्वी झाला, ज्यामुळे किवी फलंदाजही संतापला.
ढिसाळ नियोजन पाकिस्तानची इभ्रत आंतरराष्ट्रीय स्तरावर डागाळत असताना विद्यमान स्पर्धेचं भवितव्य अंधकारमय झालं असून दैवच तेथे गेलेल्या संघांना वाचवेल. पण एक गोष्ट जागतिक सममुहाला नक्कीच पटली असेल की, भारत तेथे का खेळत नाही ? येथून पुढे आयसीसीही पाकिस्तानला मोठया स्पर्धेचे यजमानपद देणार नाहीच, दिलेच तर हजारदा विचार करेल. सध्या तरी या स्पर्धेदरम्यान मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यताही नाकारता येत नाही.
@ डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२

