shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आफगाणिस्तानने इंग्लंड क्रिकेटला कोमात ढकलले


               स्वतःच्या देशात क्रिकेटचं एकही स्टेडियम नाही, मायदेशात अद्याप एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही, पण अवघ्या विश्वाला क्रिकेट शिकविणाऱ्या इंग्लंडला चॅम्पियन्स ट्रॉफीतून गाशा गुंडाळायला लावणाऱ्या आफगाणिस्तानने या विजयाबरोबरच आपल्या उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत..


               इब्राहिम झद्रानचे शतक आणि अजमतुल्ला ओमरझाईच्या घातक गोलंदाजीमुळे अफगाणिस्तानने इंग्लंडला चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता दाखवला.  बुधवारी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या राशिद खानच्या नेतृत्वाखालील संघाने ५० षटकांत सात गडी गमावून ३२५ धावा केल्या.  प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ ४९.५ षटकांत ३१७ धावाच करू शकला आणि सर्वबाद झाला.  अशा प्रकारे अफगाणिस्तानने चालू स्पर्धेत आठ धावांनी पहिला विजय नोंदवला. 
                  या स्पर्धेत जोस बटलरच्या संघाचा प्रवास संपला.  तत्पूर्वी, त्यांना ऑस्ट्रेलियाने पाच गडी राखून पराभूत केले होते.  आता त्यांना आपला पुढचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायचा आहे.  हा सामना शनिवारी, १ मार्च रोजी कराचीत होणार आहे.  त्याचबरोबर अफगाणिस्तानने या विजयासह स्पर्धेतील आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.  ब गटात राशीद खानचा संघ दोन गुण आणि ०.९९० च्या निव्वळ धावगतीने तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे, तर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.  आता अफगाणिस्तानला शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरा सामना खेळायचा आहे.
                    विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने शेवटपर्यंत प्रयत्न केले, पण अफगाण गोलंदाजांसमोर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.  अजमतुल्ला उमरझाईने इंग्लिश फलंदाजांची तारांबळ उडवली.  त्याने फिल सॉल्टला १९ धावांवर परत पाठवले.  त्याला केवळ बारा धावाच करता आल्या.  यानंतर मोहम्मद नबीने जेमी स्मिथला आपला शिकार बनवले.  त्याने यष्टिरक्षक फलंदाजाला उमरझाई करवी झेलबाद केले.  तो केवळ नऊ धावा करून परतला.  राशिद खानने इंग्लंडला तिसरा धक्का दिला.  त्याने बेन डकेटला ३८ धावांवर पायचित केले. 
इंग्लंडकडून जो रूटने शतक झळकविले पण ते व्यर्थ गेले.  त्याने १११ चेंडूत १२० धावा केल्या.  या काळात त्याच्या बॅटमधून ११ चौकार आणि एक षटकार बरसला.  त्याच्याशिवाय हॅरी ब्रूक २५, जोस बटलर ३८, लियाम लिव्हिंगस्टोन १०, जेमी ओव्हरटन ३२, जोफ्रा आर्चर १४, आदिल रशीद पाच आणि मार्क वुडने नाबाद दोन धावा केल्या.  उमरझाई शिवाय अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबीने २ तर फजलहक फारुकी, रशीद खान आणि गुलबदिन नायब यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.
                 तत्पूर्वी, इब्राहिम झद्रानच्या १७७ धावांच्या खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने इंग्लंडसमोर ३२६ धावांचे लक्ष्य ठेवले होते.  या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यांची सुरुवात चांगली झाली नाही.  इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने अफगाणिस्तानला सुरुवातीला तीन धक्के दिले.  तथापि, झादरानसह शाहिदीने डावाची धुरा सांभाळली आणि ऐतिहासिक खेळी खेळल्यामुळे अफगाणिस्तानने ५० षटकांत सात बाद ३२५ धावा केल्या.  
                ३ बाद ३९ या सुरुवातीच्या धक्क्यांनंतर झदरानने हशमतुल्लाह शाहिदीच्या साथीने चौथ्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी केली.  शाहिदी बाद झाल्यानंतरही झदरानने आपला डाव टिकवून ठेवत शतक ठोकले.  यानंतरही त्याने धावांचा वेग कमी होऊ दिला नाही.  झदरानने १४६ चेंडूंच्या खेळीत बारा चौकार आणि सहा षटकार मारले व चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या उभारण्यात यश मिळविले. अफगाणिस्तान आणि इंग्लंड या दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा होता. 
              झदरान शिवाय अफगाणिस्तानकडून अजमतुल्ला ओमरझाई ४१, शाहिदी ४०, मोहम्मद नबीने २४ चेंडूत ४० धावा केल्या.  तर रहमानउल्ला गुरबाज ६ धावा करून बाद झाला, सेदीकुल्लाह अटल  रहमत शाह प्रत्येकी  ४ धावा करू शकले.  इंग्लंडकडून आर्चरने तीन, लियाम लिव्हिंगस्टोनने दोन आणि जेमी ओव्हरटन आणि आदिल रशीदने प्रत्येकी एक बळी मिळविला.
              चॅम्पियन्स ट्रॉफीत सलग २ पराभव पत्करावे लागल्याने इंग्लंडचे आव्हान संपले असून द. आफ्रिकेविरूध्द त्यांचा शेवटचा सामना शिल्लक असून तो केवळ औपचारीकता म्हणून इंग्लंडसाठी असणार आहे. हाच इंग्लिश संघ हिस्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतात ४ टि २० व ३ वनडे सामने हरला होता.  तोच ऱ्हीदम त्यांनी पाकिस्तानातही ठेवला. ब गटातून बाद होणारा इंग्लंड पहिला संघ ठरला. तर आफगाणिस्तानने सन २०२३ च्या वनडे विश्वचषका नंतर चॅम्पियन ट्रॉफीतही इंग्लंडला चित केल्याने इंग्लंडचे स्पर्धेतील आव्हान संपले. सलग दोन सामन्यात तिनशेच्यावर धावा करूनही इंग्लंड पराभूत झाल्याने त्यांच्यावर  आफगाणिस्तानने अक्षरशः  कोमात जायची वेळ आणली.

@ डॉ.दत्ता विघावे                        
  क्रिकेट समिक्षक 
  मो. क्रं - ९०९६३७२०८२
close