एरंडोल प्रतिनिधी :-३० जानेवारी २०२५ –एरंडोल येथील १५७ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या नगर वाचनालयाची सर्वसाधारण वार्षिक सभा आज सकाळी ११ वाजता संस्थेचे मावळते कार्याध्यक्ष मा. किशोर काळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान कार्यकर्ते व संस्थेचे अध्यक्ष स्व. डॉ. वा. पु. जोशी यांच्यासह विविध क्षेत्रातील दिवंगतांना तसेच कुंभमेळ्यात दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सभेत ग्रंथपाल संतोष वंजारी यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून त्यास मंजुरी देण्यात आली. यानंतर सन २०२४-२५ व २०२५-२६ या दोन वर्षांसाठी नव्या कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. नगर वाचनालयाच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक जगन्नाथ (जगदीश) ठाकूर, कार्याध्यक्षपदी खान्देशातील सुप्रसिद्ध साहित्यिक व वक्ते प्रा. वा. ना. आंधळे तर चिटणीसपदी निवृत्त शिक्षक व लेखक रवींद्र लाळगे यांची निवड करण्यात आली.
याशिवाय सहचिटणीस म्हणून संतोष वंजारी यांची निवड झाली. संचालकपदी मा. किशोरभाऊ काळकर, गुरुप्रसाद तुकाराम पाटील, जाधवराव भीमसेन जगताप, प्रवीण आधार महाजन, परेश किशोर बिर्ला, डॉ. प्रेमराज गंगाधर पळशीकर, अमोल अशोक काबरा, रवींद्र प्रभाकर सोनार आणि सुदर्शन मधुकर देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सभेचे संपूर्ण कामकाज ग्रंथपाल देवेंद्र संतोष वंजारी, लिपिक संजय बाळकृष्ण अग्निहोत्री व शिपाई गोकुळ अरुण मोरे यांनी पाहिले. नूतन कार्यकारिणीच्या सदस्यांचे माननीय किशोरभाऊ काळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
सभेच्या समारोपप्रसंगी मा. किशोरभाऊ काळकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. नवनियुक्त अध्यक्ष जगदीश भाऊ ठाकूर आणि कार्याध्यक्ष प्रा. वा. ना. आंधळे यांनी आपल्या भावना व्यक्त करत संस्थेच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाच्या शेवटी सहचिटणीस संतोष वंजारी यांनी आभारप्रदर्शन केले. खेळीमेळीच्या वातावरणात सभा यशस्वीरीत्या संपन्न झाली.