shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मॉडेल स्कूल – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसलेवस्ती येथे विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

 मॉडेल स्कूल – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसलेवस्ती येथे विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न 
इंदापूर: दि. २८ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेच्या भोसलेवस्ती शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शन तसेच कला व कार्यानुभव अंतर्गत विविध वस्तूंचे प्रदर्शन मोठ्या उत्साहात भरविण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन निमगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. संभाजी आजबे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. गणेश शिंदे व इतर मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. आशा नष्टे यांनी केले. त्यांनी आपल्या मनोगतात विज्ञान दिनाचे महत्त्व स्पष्ट करून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याची गरज अधोरेखित केली.
विज्ञान प्रदर्शनात जवळपास ३५ प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पाणी शुद्धीकरण, सौरऊर्जा, चुंबकत्व, हवामान बदल, साधी यंत्रे इत्यादी विषयांवरील प्रयोग आत्मविश्वासाने सादर केले व त्यामागील वैज्ञानिक तत्त्वे समजावून सांगितली.

तसेच कला व कार्यानुभव अंतर्गत इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी कागदी वस्तू, मातीच्या वस्तू, विविध प्रकारची घरे, शोभेच्या वस्तू, संदेशवहन साधने तसेच वाहतुकीची साधने तयार करून आपली कल्पकता आणि सर्जनशीलता प्रभावीपणे मांडली.
प्रदर्शन पाहण्यासाठी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे सर्वांनी त्यांचे कौतुक केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सादरीकरण कौशल्य व वैज्ञानिक विचारसरणी विकसित होण्यास मदत झाली.

या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका सौ. आशा नष्टे, सौ. लतीफा पठाण, सौ. मेघा थोरवे, श्री. राजेंद्र भोंग, श्री. रमेश बरळ, श्री. भारत ननवरे, श्री. समाधान भोंग व श्री. अमित भोंग यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळा व्यवस्थापन समितीचेही मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

🌟 विज्ञानाच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला. 🌟
close