shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहिल्यानगरमध्ये ‘वीर वडार एकता’चा दमदार हुंकार!विजय दादा गोरे यांच्या नेतृत्वाखाली समाज एकजुटीचा निर्धार..!

 जिल्ह्या-जिल्ह्यात 'वडार भवन' उभारणीचा संकल्प

अहिल्यानगर, दि. २४ : वडार समाजाच्या संघटनात्मक एकजुटीला बळ देत सामाजिक विकासाची नवी दिशा निर्माण करण्याच्या उद्देशाने वीर वडार एकता फाउंडेशनच्या वतीने रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी अहिल्यानगर येथील केडगाव परिसरातील अर्चना हॉटेल येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजय दादा गोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमात समाजाच्या संघटनात्मक वाटचालीसह विविध सामाजिक प्रश्नांवर विचारमंथन करण्यात आले.


कार्यक्रमाच्या प्रारंभी मार्केट यार्ड, स्टेशन रोड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास तसेच माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर केडगाव येथील अर्चना हॉटेलमध्ये समाजबांधवांची बैठक पार पडली.

या बैठकीत ‘घराघरात वीर वडार एकता, जिल्ह्या-जिल्ह्यात वडार भवन’ हा विचार केंद्रस्थानी ठेवण्यात आला. महाराष्ट्रातील वडार समाजाला एका मजबूत संघटनात्मक व्यासपीठावर आणणे, समाजातील विविध घटकांमध्ये संवाद व समन्वय वाढविणे, युवकांना संघटित करणे आणि समाजाच्या प्रलंबित प्रश्नांसाठी एकत्रितपणे आवाज उठविणे, या विषयांवर चर्चा करण्यात आली.

‘जिल्ह्या-जिल्ह्यात वडार भवन’ संकल्पनेला बळ

वडार समाजासाठी प्रत्येक जिल्ह्यात हक्काचे वडार भवन उभारण्याचा संकल्प हा या अभियानातील महत्त्वाचा मुद्दा ठरला. समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी कायमस्वरूपी व्यासपीठ उपलब्ध व्हावे, तसेच समाजातील नागरिकांना एकत्र येऊन आपल्या प्रश्नांवर चर्चा करता यावी, यासाठी समाजभवनांची आवश्यकता असल्याची भूमिका या निमित्ताने मांडण्यात आली.

युवकांच्या संघटनावरही भर

समाजाच्या भविष्यासाठी युवकांची भूमिका महत्त्वाची असल्याने तरुणांना संघटित करणे, त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणे आणि समाजाच्या विकासाच्या प्रवाहात त्यांचा सक्रिय सहभाग वाढविणे, यावरही बैठकीत भर देण्यात आला. एकजूट, संघटन आणि समाजहित या त्रिसूत्रीच्या माध्यमातून पुढील काळात काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

अहिल्यानगरच्या भूमीतून महाराष्ट्राला एकतेचा संदेश

विजय दादा गोरे यांच्या नेतृत्वाखाली वीर वडार एकता फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रभर समाजाशी संपर्क वाढवून संघटन मजबूत करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. अहिल्यानगर येथे झालेल्या या बैठकीने त्या प्रयत्नांना आणखी एक नवी दिशा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

समाजाच्या प्रश्नांवर मतभेद न ठेवता एकत्र येणे, संघटन मजबूत करणे आणि पुढील पिढीच्या भविष्यासाठी ठोस पावले उचलणे, हाच या कार्यक्रमाचा मुख्य संदेश ठरला.

अहिल्यानगरच्या भूमीतून उमटलेला हा ‘वीर वडार एकता’चा हुंकार आगामी काळात महाराष्ट्रभर अधिक व्यापक होणार का, याकडे समाजाचे लक्ष लागले आहे.

‘एकजूट होऊया… संघटित होऊया…
वडार समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुढे जाऊया!’

०००


close