श्रीकाळभैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात नागपंचमी विशेष महिला महोत्सव उत्साहात संपन्न; पारंपरिक खेळांनी आणली रंगत!
इंदापूर / कालठण: दि . २ ३ /८ / २० २६
कालठण नं. १ येथील ऐतिहासिक श्री काळभैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात शनिवार (दि. २ २ /८ / २० २६ रोजी सायंकाळी ५ वा. नागपंचमीनिमित्त आयोजित करण्यात आलेला विशेष महिला महोत्सव अत्यंत आनंदी आणि उत्साही वातावरणात मोठ्या दिमाखात पार पडला. हा संपूर्ण कार्यक्रम ज्येष्ठ योग मार्गदर्शक तथा सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. महिला पतंजली योग परिवार (जि. प. शाळा) कालठण नं. १, समस्त महिला मंडळ, सर्व महिला स्वयंसाहाय्यता बचत गट आणि ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या महोत्सवास इंदापूर तालुका महिला पतंजली परिवारातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तसेच कालठण गावातील स्थानिक महिला भगिनींनी एकत्र येत पारंपरिक संस्कृतीचा अनोखा संगम घडवून आणला.
पारंपरिक खेळांची रंगतदार जुगलबंदी
महोत्सवात महिलांनी पारंपरिक भलई गाणी, माहेरची गाणी म्हणत सुंदर फेर धरले. यानंतर झिम्मा, पिंगा, कावट, फुगड्यांचे विविध प्रकार आणि पारंपरिक नृत्यांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत महिलांनी नागपंचमीचा मनमुराद आनंद लुटला. यासोबतच रंगलेल्या उखाण्यांच्या चढाओढीने उपस्थित महिलांमध्ये हास्याची लकेर उमटवून कार्यक्रमात विशेष रंगत भरली. वेळेअभावी झोक्यांचा कार्यक्रम घेता आला नसला, तरी इतर सर्व पारंपरिक खेळांमध्ये महिलांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
उत्कृष्ट सूत्रसंचालन व नियोजन
कार्यक्रमाचे अतिशय ओघवते आणि प्रभावी सूत्रसंचालन प्राची चिंचकर आणि श्वेता लकडे यांनी केले. त्यांच्या उत्कृष्ट निवेदनामुळे संपूर्ण कार्यक्रमाची रंगत द्विगुणित झाली.
परिश्रम व सहकार्य
हा भव्य महिला महोत्सव यशस्वी करण्यासाठी , स्वाती पाडुळे, शोभा सपकाळ, शुभांगी सपकाळ, वैशाली सपकाळ, स्वाती सपकाळ, मोनिका सपकाळ, लता पवार , मंगल गटकुळ, शहाबाई कदम , पूनम जावळे ,पूनम गायकवाड , स्वाती गायकवाड ,उर्मिला कुंभार, मंगल कदम , यांनी विशेष परिश्रम घेतले आभार ,सुष्मा घाडगे यांनी मानले
स्थानिक संस्कृती आणि परंपरेचे जतन करणाऱ्या या यशस्वी आयोजनाबद्दल संपूर्ण पंचक्रोशीतून महिला भगिनींचे भरभरून कौतुक होत आहे.

