पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड आवश्यक;सचिव विरसिंह रणसिंग
इंदापूर: इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय, कळंब ता. इंदापूर महाविद्यालयाच्या वतीने दगडवाडी येथील नंदिकेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
यावेळी प्राचार्य डॉ.अशोक काळंगे, उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग, डॉ.प्रशांत शिंदे, प्रा.राजेंद्रकुमार डांगे,डॉ.सुहास भैरट,डॉ. रामचंद्र पाखरे,डॉ.ज्योत्स्ना गायकवाड,प्रा. तेजश्री हुंबे इ मान्यवर प्राध्यापक,विद्यार्थी तसेच निरवांगी व दगडवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना संस्था सचिव विरसिंह रणसिंग म्हणाले, ‘वाढते शहरीकरण, वृक्षतोड आणि बदलते हवामान यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे.त्यामुळे केवळ वृक्षलागवड करून चालणार नाही, तर लावलेल्या प्रत्येक झाडाचे संगोपन व जतन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. एल निनो मुळे भविष्यात पाण्याची टंचाई अधिक तीव्र होऊन त्याचा परिणाम जनजीवनावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजपासूनच पर्यावरण संवर्धनासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.’
महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती निर्माण करण्याबरोबरच परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात येत असल्याचेही रणसिंग यांनी सांगितले.यावेळी मंदिर परिसरात १५० वृक्ष लागवड करण्यात आले.वृक्षांचे संगोपन करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या उपक्रमामुळे नंदिकेश्वर मंदिर परिसराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाला हातभार लागणार आहे.
फोटो ओळ - नंदिकेश्वर मंदिर दगडवाडी येथे वृक्षारोपण करताना मान्यवर

