बांधकाम सभापती अरविंद कोते, नगरसेविका सौ. छायाताई शिंदे, व गटनेत्या सौ. प्रतीक्षाताई कोते यांचे नगराध्यक्षांना साकडे
शिर्डी प्रतिनिधी: (तुषार महाजन)
शिर्डी नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक ११ मध्ये नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी प्रलंबित असलेली विविध विकासकामे तातडीने हाती घेण्यात यावीत, अशी आग्रही मागणी बांधकाम सभापती श्री. अरविंद (आप्पा) कोते, नगरसेविका सौ. छायाताई शिंदे, आणि नगरपरिषदेच्या गटनेत्या सौ. प्रतीक्षाताई कोते यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी शिर्डीच्या नगराध्यक्षांना सविस्तर निवेदन दिले असून, प्रभागातील तब्बल १९ आवश्यक कामांची यादी प्रशासनाकडे मंजुरीसाठी सादर केली आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, प्रभागातील नागरिकांची दैनंदिन सोय, वाहतूक सुलभता आणि मूलभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी ही कामे अत्यंत तातडीची आहेत. त्यामुळे या सर्व विकासकामांना प्राधान्याने प्रशासकीय मान्यता देऊन प्रत्यक्ष कार्यवाही लवकरात लवकर सुरू करावी, अशी विनंती या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
निवेदनातील प्रमुख प्रस्तावित कामे:
प्रशासनाला दिलेल्या १९ कामांच्या यादीत प्रामुख्याने रस्ते कॉंक्रिटीकरण, दिवाबत्ती आणि ड्रेनेज लाईनच्या कामांवर विशेष भर देण्यात आला आहे.
रस्ते विकास व कॉंक्रिटीकरण: पानमळा कोते वस्ती, हॉटेल समृद्धी परिसर, प्रसादनगरमधील निकम गल्ली, श्रीकृष्णनगर आणि संतनगर परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करणे. हॉटेल स्वामी रिसॉर्टजवळील डीपी रोड २४ मीटर रुंद करून विकसित करणे, चारी नं. १२ पर्यंत रुंदीकरण करणे आणि माळीनगर येथे रस्त्याचे डांबरीकरण करणे.
ड्रेनेज व सुरक्षा व्यवस्था: करडोबानगर चौक ते चांदोरेपर्यंत ड्रेनेज लाईन टाकणे. तसेच, संस्थान गोडाऊनजवळील चौकात सर्कल तयार करून सुरक्षेच्या दृष्टीने हायमास्ट दिवे व सीसीटीव्ही बसविणे.
स्ट्रीट लाईट: शिर्डी-साकुरी शिव, शिंदे वस्ती परिसर आणि पानमळा येथे नव्याने स्ट्रीट लाईट व पोल बसविणे. अमोल कोते यांच्या घराजवळ हायमास्ट बसवणे.
शहराचे सुशोभीकरण: शिर्डी शहराच्या दोन्ही बाजूंच्या वेशींवर (सीमांवर) आकर्षक कमानी उभारणे.
प्रभाग क्रमांक ११ मधील या महत्त्वपूर्ण कामांचे निवेदन मुख्याधिकारी कार्यालयाने स्वीकारले आहे. आता नगरपरिषद प्रशासन या कामांना किती वेगाने मंजुरी देऊन प्रत्यक्ष विकासकामांना सुरुवात करते, याकडे प्रभागातील सर्व नागरिकांचे लक्ष लागून आहे.

