सोनी टीव्ही फेम ह.भ.प. अरुण महाराज दिघे यांची ५३ वी कीर्तन सेवा; भाविकांसाठी खिचडी महाप्रसादाची मेजवानी
शिर्डी प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
"शिर्डी माझे पंढरपूर । साईबाबा रमावर ।।" या भक्तीमय ओवीचा साक्षात प्रत्यय आज शिर्डीकरांना येणार आहे. दर महिन्याच्या शुद्ध एकादशीच्या पर्वावर आयोजित केल्या जाणाऱ्या सार्वजनिक कीर्तन सोहळ्याचे आज ५३ वे पुष्प गुंफले जाणार असून, टाळ-मृदंगाच्या निनादात संपूर्ण परिसर भक्तीरसात चिंब न्हाऊन निघणार आहे.
सद्गुरू श्री साईबाबांच्या आशीर्वादाने आणि ह.भ.प. काशिकानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाने या भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष आकर्षण म्हणजे, 'सोनी टीव्ही मराठी' फेम सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. अरुण महाराज दिघे यांच्या ओजस्वी आणि सुश्राव्य वाणीतून हा 'गजर भक्तीचा.. साई हरी नामाचा' सोहळा रंगणार आहे. त्यांच्या रसाळ कीर्तनाची अनुभूती घेण्यासाठी भाविकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.
येथे रंगणार भक्तीचा सोहळा:
हा कार्यक्रम आज, शुक्रवार दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ठीक ६.३० ते रात्री ९.०० या वेळेत 'साई निर्माण करिअर ॲकॅडमी ग्राऊंड, श्रीकृष्णनगर, शिर्डी' येथे पार पडणार आहे.
साईबाबा व विठ्ठल भक्तांच्या तसेच समस्त शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, स्वागतोत्सुक म्हणून श्री. विजय तुळशीराम कोते पाटील आणि शिर्डी ग्रामस्थ संयोजन पाहत आहेत. कीर्तनाच्या श्रवणभक्तीनंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी स्वादिष्ट 'खिचडी प्रसादाची' विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तरी परिसरातील जास्तीत जास्त भाविकांनी या कीर्तन सेवेचा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

