shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लॉर्ड ठाकूरची करामत लखनौसाठी लाभदायक !

           शार्दुल ठाकूरच्या घातक गोलंदाजी नंतर, निकोलस पूरन आणि मिचेल मार्शच्या स्फोटक खेळीमुळे लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) ने सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) चा पाच गडी राखून पराभव केला. विद्यमान स्पर्धेत लखनौचा हा पहिलाच विजय आहे. तत्पूर्वी, दिल्लीने त्यांना सनसनाटी सामन्यात एक गडी राखून हरविले होते. गुरुवारी हैद्राबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करावी लागलेल्या हैदराबादने २० षटकांत ९ बाद १९०  धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौने १६.१ षटकांत पाच गडी राखून सामना जिंकला. २३ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकून लखनौने गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले. त्याचवेळी या सामन्यापूर्वी अव्वल स्थानावर असलेल्या सनरायझर्स हैदराबादची सहाव्या स्थानावर घसरण झाली. त्यांचा नेट रन रेट -०.१२८ झाला. त्याच वेळी, आरसीबी  कोलकात्याला आपल्या पहिल्या सामन्यात सात विकेट्सने पराभूत केले, ते दोन गुण आणि + २.१३७ च्या निव्वळ धावगतीने प्रथम स्थानावर पोहोचले. 


                 विजयासाठीच्या १९१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात धक्कादायक झाली. त्यांना पहिला धक्का मोहम्मद शमीने एडन मार्करामच्या रूपाने दिला. केवळ एक धाव घेऊन तो बाद झाला. यानंतर मिचेल मार्श आणि निकोलस पूरन यांनी संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ४३ चेंडूत ११६ धावांची भागीदारी झाली. यादरम्यान पुरनने १८ चेंडूतच कारकिर्दीतील दहावे अर्धशतक झळकविले. त्याने २६ चेंडूत ७० धावांची दमदार खेळी केली. चालू मोसमातील त्याच्या बॅटने झळकावलेले हे दुसरे अर्धशतक आहे. लखनौने पूरनला टॉप ऑर्डरमध्ये संधी दिली आणि त्याच्या बॅटमधून धावा ओसंडून वाहू लागल्या. त्याच्याशिवाय मिचेल मार्शने ५२ धावांची दमदार खेळी केली. यादरम्यान मार्शच्या बॅटमधून सात चौकार आणि दोन षटकार आले. हैद्राबादविरुद्ध कर्णधार रिषभ पंतने १५ आणि आयुष बडोनीने सहा धावा केल्या. तर, डेव्हिड मिलर आणि अब्दुल समद यांनी अनुक्रमे १३ आणि २२ धावा करून नाबाद परतले. हैद्राबादकडून पॅट कमिन्सने २ तर मोहम्मद शमी, ॲडम झम्पा आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला. 

                   घरच्या मैदानावर सामना खेळणारा हैद्राबाद संघ तिनशे पेक्षा जास्त धावा करू शकेल, अशी अटकळ होती. मात्र, लखनौच्या घातक गोलंदाजीमुळे त्यांना २०० धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. सलामीला फलंदाजीला आलेला अभिषेक शर्मा केवळ सहा धावा करून बाद झाला. यानंतर गेल्या सामन्यात शतक झळकविणाऱ्या ईशान किशनला  खातेही उघडता आले नाही. शार्दुल ठाकूरने डावाच्या तिसऱ्या षटकात लागोपाठ दोन चेंडूंवर दोन्ही फलंदाजांना बाद केले. गुच्छात बळी घेण्याची शार्दूलची कला या सामन्यातही कायम राहिल्याने लखनौला विजयासाठी मजबूत पाठबळ मिळाले. सामनावीर ठरलेल्या शार्दूलला मेगा लिलावात कोणीही खरेदी केले नव्हते. त्याच्या सुदैवाने लखनौच्या एका खेळाडूच्या दुखापतीमुळे त्याला संघात स्थान मिळाले.


                    सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला नितीश कुमार रेड्डीची साथ लाभली आणि तिसऱ्या विकेटसाठी दोघांमध्ये ३२ चेंडूत ६१ धावांची भागीदारी झाली. हेड २८ चेंडूत ४७ धावा करून बाद झाला. त्याला राजकुमार यादवने बोल्ड केले. या सलामीच्या फलंदाजाला दोनदा मिळालेल्या जीवनदानाचा फायदा उठवता आला नाही. लखनौ विरुद्ध नितीश कुमार रेड्डी ३२, हेनरिक क्लासेनने २६, अनिकेत वर्मा ३६, पॅट कमिन्स १८, अभिनव मनोहर दोन आणि मोहम्मद शमीने एक धावा केली. तर हर्षल पटेल आणि सिमरजीत सिंग १२ आणि ३ धावा करून नाबाद राहिले.  लखनौकडून शार्दुल ठाकूरने चार बळी घेतले. त्याच्याशिवाय आवेश, दिग्वेश, बिश्नोई आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी एक विकेट मिळाली.

                  हा सामना सुरू होण्यापूर्वी कोणीही या निकालाचा विचार केला नव्हता. हैद्राबादच्या फलंदाजांचा फॉर्म आणि लखनौची कमकुवत गोलंदाजी पाहता सर्वांनी एसआरएचच्या विजयाचा अंदाज बांधला होता, पण रिषभ पंतच्या संघाने त्या सर्व अटकळांना पूर्णविराम दिला. मात्र, सामन्या दरम्यान असे काही घडले ज्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. वास्तविक, बाद  झाल्यानंतर परतत असताना नितीश रेड्डीचा स्वतःवरील संयम सुटला आणि रागाच्या भरात त्यांनी हेल्मेट जिन्यावर फेकले.

                   नितीश हैदराबादसाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने चौथ्या विकेटसाठी हेनरिक क्लासेनसोबत ३४ धावांची भागीदारीही केली. यानंतर अनिकेत वर्मासोबत १८ धावांची भागीदारी केली. मात्र, तो पाचवा गडी म्हणून बाद झाला. नितीशला रवी बिश्नोईने त्रिफळाचित केले. त्याला २८ चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने ३२ धावा करता आल्या. नितीशने दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही सामन्यात ते काही मोठे करू शकला नाही. राजस्थानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याच्या संघाने २८६ धावा केल्या होत्या तेव्हा त्याला ३० धावाच करता आल्या होत्या. लखनौविरुद्ध ३२ धावा केल्यानंतर, त्याला रागावर नियंत्रण ठेवता आले नाही आणि ड्रेसिंग रूमच्या दिशेने जाताना पायऱ्यांवर त्याचे हेल्मेट मारले. चांगल्या सुरुवातीचा फायदा न उठवता आल्याने नैराश्या पोटी त्याच्याकडून हे घडले असावे.

                   या सामन्यात लखनौचा गोलंदाज प्रिन्स यादवने हैदराबादचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेडला बाद करत त्याच्या आयपीएल कारकिर्दीची शानदार सुरुवात केली. या सत्रातच प्रिन्सने पदार्पण केले आहे. लखनौचा कर्णधार रिषभ पंतने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात युवा गोलंदाजाला संधी दिली. पहिल्या सामन्यात तो काही विशेष करू शकला नसला तरी आयपीएल कारकिर्दीतील दुसऱ्या सामन्यात प्रिन्सने हैद्राबादच्या ट्रॅव्हिस हेडला बाद करून आपली क्षमता सिद्ध केली. एसआरएचच्या डावातील आठव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्याला हे यश मिळाले. तेवीस वर्षीय वेगवान गोलंदाज प्रिन्स हा दिल्लीचा आहे. दिल्ली प्रीमियर लीग २०२४ मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तो पाचव्या क्रमांकावर होता. डिपीएल मध्ये हॅट्रीक घेण्याचा कारनामाही  त्याने केला आहे.  अशी कामगिरी करणारा तो एकमेव गोलंदाज आहे. जुनी दिल्ली -सहा कडून खेळताना त्याने १० सामन्यात १३ बळी घेतले. 


                     प्रिन्सने आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावापूर्वी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेश विरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील पहिला टी २० सामना खेळला. दुसऱ्याच दिवशी, लखनौ सुपर जायंट्सने त्याला ३० लाख रुपयांच्या मूळ किमतीत संघात समाविष्ट केले. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत २०२४-२५  हंगामात, प्रिन्सने ७.५४ च्या इकॉनॉमी रेटने ११ बळी घेतले. यानंतर, तो ५० षटकांच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्लीसाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. त्याने सहा सामन्यांत २२.००  च्या सरासरीने अकरा बळी घेतले.

                   एकंदर कमकुवत वाटणारी लखनौची गोलंदाजी बलाढ्य हैद्राबादी फलंदाजांना डोईजड झाली. त्यामुळे लखनौपुढे फार मोठे आव्हान नव्हते. पहिल्या सामन्यातील निसटत्या पराभवानंतर लखनौची गाडी या विजयाने पुन्हा रूळावर आली असे म्हटले तर गैर ठरू नये.

@ डॉ.दत्ता विघावे                        
    क्रिकेट समिक्षक 
    मो. क्रं - ९०९६३७२०८२
close