shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आफ्रिकन वाघांची सफर पुन्हा एकदा बाद फेरीतच संपली


                न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पन्नास धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.  या विजयासह मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखालील संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला.  आता ९ मार्चला (रविवार) चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत त्यांचा सामना भारताशी होणार आहे.  हा सामना दुबईत होणार आहे.  बुधवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडने रचिन रवींद्र आणि केन विल्यमसन यांच्या शतकी खेळीच्या जोरावर ५० षटकांत सहा गडी गमावून ३६२ धावा केल्या.  चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या डावातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे.  प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला निर्धारित षटकांत नऊ बाद ३१२ धावाच करता आल्या.  त्यांच्याकडून डेव्हिड मिलरने नाबाद शतक झळकविले.

                टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील संघ उपांत्य फेरीपर्यंत अपराजित होता, तर न्यूझीलंडने तीनपैकी दोन सामने जिंकले आणि एक पराभव पत्करावा लागला.  चांगल्या फॉर्ममध्ये दिसणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने पुन्हा एकदा नॉकआऊट सामन्यात चोकर असल्याचे सिद्ध केले.  आयसीसी वनडे स्पर्धेच्या बाद फेरीत त्यांना तिसऱ्यांदा न्यूझीलंड विरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले.  यापूर्वी २०११ विश्वचषक आणि २०१५ विश्वचषक स्पर्धेत किवींनी आफ्रिकन संघाचा पराभव केला होता.

                 आयसीसी वनडे स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा विक्रम काही खास राहिला नाही.  आतापर्यंत झालेल्या अकरा उपांत्य फेरीच्या सामन्यांमध्ये त्यांना फक्त एकच सामना जिंकता आला आहे, तर नऊ सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.  त्याच वेळी, एक सामना बरोबरीत आहे.  या बाबतीत न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर आहे, त्यांनी तेरा पैकी आठ उपांत्य फेरीतील सामने गमावले आहेत.

                  विजयासाठीच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात डळमळीत झाली.  त्यांना पहिला धक्का मॅट हेन्रीने रायन रिकेल्टनच्या रूपाने दिला, तो केवळ सतरा धावा करू शकला.  यानंतर कर्णधार टेम्बा बावुमा आणि रॅसी व्हॅन डर डुसेन यांनी संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी १०५ चेंडूत १०५ धावांची भागीदारी झाली. मिचेल सँटनरने बावुमाला केन विल्यमसनकरवी झेलबाद केले. ७१ चेंडूत ५६ धावा करून तो बाद झाला.  त्याचवेळी ड्युसेन चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ६९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.  यानंतर संघाला चांगल्या भागीदारीची गरज होती, पण त्यांची मधली फळी पत्त्याच्या बंगल्यासारखी ढासळली. 

                उपांत्य फेरीच्या सामन्यात डेव्हिड मिलरने ६७ चेंडूत नाबाद शंभर धावा केल्या.  त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे सातवे वनडे शतक आहे.  त्याच्याशिवाय एडन मार्कराम ३१, हेनरिक क्लासेन तीन, वियान मुल्डर आठ, मार्को जॅनसेन तीन, केशव महाराज एक, कागिसो रबाडाने १६ धावा आणि लुंगी एनगिडीने नाबाद एक धाव केली.  किवीजकडून मिचेल सँटनरने तीन तर मॅट हेन्री आणि ग्लेन फिलिप्सने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

                प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २१ धावा करून बाद झालेल्या विल यंगची विकेट झटपट गमावली.  मात्र, त्यानंतर रचिन आणि विल्यमसन यांनी शानदार भागीदारी करत दुसऱ्या विकेटसाठी १६४ धावांची भागीदारी केली.  याच काळात रचिनने त्याच्या वनडे कारकिर्दीतील पाचवे शतकही ठोकले.  शतक झळकवून रचिन बाद झाला.  त्याने १०१ चेंडूत तेरा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १०८ धावा केल्या.  त्यानंतर विल्यमसननेही डाव पुढे नेला आणि एकदिवसीय कारकिर्दीतील पंधरावे शतक झळकविण्यात तो यशस्वी ठरला.  विल्यमसन ९४ चेंडूंत  दहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने १०२ धावा करून बाद झाला. 

                विल्यमसन आणि रचिन बाद झाल्यानंतर टॉम लॅथम चार धावा करून बाद झाला.  मात्र, डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी शानदार भागीदारी करत संघाची धावसंख्या तिनशेच्या पुढे नेली.  मिचेलचे अर्धशतक हुकले, ३७ चेंडूत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४९ धावा केल्यानंतर तो बाद झाला.  तर मायकेल ब्रेसवेलने १२ चेंडूत १६ धावा केल्या.  फिलिप्स शेवटपर्यंत टिकून राहिला आणि २७ चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४९ धावा करून नाबाद परतला.  कर्णधार मिचेल सँटनरने नाबाद ४० धावा केल्या.  दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने सर्वाधिक तीन बळी घेतले, तर कागिसो रबाडाने दोन आणि विआन मुल्डरने एक गडी बाद केला. 

                  दक्षिण आफ्रिकन संघ आयसीसी स्पर्धात अतिशय उत्तम कामगिरी करतो. उपांत्य फेरीपर्यंत सहज पोहोचतो. सन २०२४ च्या टी२० विश्वचषकाची अंतिम फेरीपर्यंत त्यांनी अनेक वर्षानंतर मजल मारली, मात्र तेथेही विजय दृष्टीक्षेपात असताना त्यांनी कच खाल्ली व भारताला विजय अक्षरशः बहाल केला. याचा अर्थ असा की आयसीसी स्पर्धात ते गट साखळीत चांगले खेळतात मात्र निर्णायक सामन्यात ते कच खातात व पात्रता असून विजेतेपद मिळवू शकत नाही. हे त्यांच्या बाबत या स्पर्धेत पुन्हा एकदा घडलं. नेमकं असा का घडतं ? आता हा देखील एक संशोधनाचा विषय बनला असून आफ्रिकेला यावर लवकरच तोडगा काढावा लागेल. नाही तर ते गट साखळीपर्यंतचे राजे ठरतील. तसे बघाल तर आता त्यांच्यावर बसलेला चोकर्सचा शिक्का योग्य असल्याचेच सिद्ध होत आहे.

                 न्यूझीलंड व भारत हे दोन्ही संघ अ गटात सहभागी होते. त्यांची आपसात दुबईमध्ये गट साखळीत लढत झाली होती, त्यामध्ये भारताने बाजी मारली होती. कागदोपत्री दोन्ही संतुलीत असून दोघांनाही एकमेकांच्या बलस्थान व कमकुवत बाबींची पूर्ण जाणीव आहे. शिवाय भारतीय कर्णधार मागील चौदा सामन्यांपासून नाणेफेक जिंकण्यात अपयशी ठरत आहे. त्यामध्ये नाणेफेकीचा लाभ भारताला मिळत नाही. तरीही टीम इंडिया एकजीव होऊन लढत असल्याने सध्या तरी अपराजित आहे. त्यामुळे प्रत्यक्ष अंतिम सामन्यात संयम व शिस्त पाळून आपल्या क्षमतेनुसार जो संघ सर्वोत्तम कामगिरी करेल तो चषक उंचावण्याचा आनंद मिळवेल.

@ डॉ.दत्ता विघावे                        
    क्रिकेट समिक्षक 
    मो. क्रं - ९०९६३७२०८२
close