shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पाडव्याच्या दिवशी दिल्ली व राजस्थानने विजयाची गुढी उभारली


                    गुढी पाडव्याच्या दिवशी रविवारी झालेल्या डबल हेडरमध्ये राजस्थान व दिल्लीने आपली विजयी गुढी उभारली. दिवसाच्या पहिल्या सामन्यात सांघिक कामगिरीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने रविवारी सनरायझर्स हैद्राबादचा सात गडी राखून पराभव करून आयपीएल २०२५ मध्ये सलग दुसरा विजय नोंदवला. सनरायझर्स हैद्राबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १८.४ षटकांत १६३ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीकडून फाफ डुप्लेसिसने अर्धशतक झळकविले, त्यामुळे संघाला १६ षटकांतच तीन गड्यांच्या मोबदल्यात १६६ धावा करून विजयाची नोंद करण्यात यश आले.


                  आयपीएलमध्ये दिडशेहून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचा हा सर्वात जलद विजय आहे. दिल्लीने २४ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. दिल्लीने यापूर्वी सन २०२१ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध १६.३ षटकात दिडशे पेक्षा अधिक धावांचे लक्ष्य गाठले होते. दिल्लीच्या विजयात वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचे योगदानही महत्त्वाचे होते, त्याने आपल्या शानदार फलंदाजीच्या बळावर हैद्राबादच्या एकाचढ एक तडाखेबाज फलंदाजांना जेरबंद केले. 

                    विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना जॅक फ्रेझर मॅकगर्क आणि फाफ डु प्लेसिस यांनी दिल्ली कॅपिटल्सला वेगवान सुरुवात करून दिली. या दोन फलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे दिल्लीने पॉवरप्लेमध्येच ५० धावांचा टप्पा ओलांडला होता. डुप्लेसिसने शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकविले आणि मॅकगर्कसोबत पहिल्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. झिशान अन्सारीने डुप्लेसिसला बाद करून दिल्ली कॅपिटल्सला पहिला धक्का दिला. झिशानचा हा पहिलाच आयपीएल सामना होता आणि त्याने डु प्लेसिस आणि मॅकगर्क यांच्यातील भागीदारी तोडली. डु प्लेसिस २७ चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५० धावा करून बाद झाला.  लेगस्पिनर झिशान अन्सारी पदार्पणाच्या सामन्यात चमकण्यात यशस्वी ठरला. आयपीएलमधील पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या झिशान अन्सारीने शानदार गोलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्सला तीन धक्के दिले. डु प्लेसिसला बाद केल्यानंतर झिशानने मॅकगर्कला आपला शिकार बनवले. दहावे षटक टाकायला आलेल्या झिशानने पहिल्या चेंडूवर डु प्लेसिसला बाद केले आणि नंतर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मॅकगर्कला बाद केले. मॅकगर्क ३२ चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३८ धावा करून बाद झाला. यानंतर झिशानने दिल्लीकडून पहिला सामना खेळणाऱ्या केएल राहुलला बाद केले, जो १५ धावा करून बाद झाला.  झिशानने दिल्लीला पदार्पणातच तीन धक्के देत स्वतःच्या अस्तित्वाचे संकेत दिले. 

                     तीन गडी बाद झाल्यानंतर अभिषेक पोरेल आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी जबाबदारी स्विकारली आणि आक्रमक फलंदाजी केली. अभिषेकने सोळाव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत दिल्लीला विजय मिळवून दिला. पोरेल पाच चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १५ धावांवर नाबाद राहिला, तर स्टब्स १४ चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने २१ धावा करून नाबाद परतला. सनरायझर्सकडून झिशानने तिन्ही विकेट घेतल्या, तर इतर गोलंदाज रिकाम्या हाताने राहिले. 

                  तत्पूर्वी, अनिकेत वर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्स समोर विजयासाठी १६४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. सनरायझर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यांची फलंदाजी चांगली झाली नाही. दिल्लीकडून वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने चमकदार कामगिरी करत पाच बळी घेतले, तर कुलदीप यादवने तीन आणि मोहित शर्माला एक विकेट मिळाली. सनरायझर्सकडून अनिकेत वर्माने सर्वाधिक ७४ धावा केल्या. प्रथम फलंदाजीला आलेल्या सनरायझर्सची सुरुवात चांगली झाली नाही आणि पॉवर प्लेदरम्यान चार गडी गमावले. यानंतर अनिकेतने हेनरिक क्लासेनच्या साथीने पाचव्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी केली. क्लासेन बाद होताच सनरायझर्सची फलंदाजी पुन्हा एकदा ढासळली. एका बाजूने विकेट पडत राहिल्या आणि अनिकेत दुसऱ्या बाजूने डाव पुढे नेत राहिला. मात्र, कुलदीपच्या चेंडूवर मॅकगर्कने अप्रतिम झेल घेत अनिकेतचा डाव संपुष्टात आणला. अनिकेत शिवाय क्लासेनने ३२ आणि ट्रॅव्हिस हेडने २२ धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादची फलंदाजी इतकी खराब झाली होती की, त्यांच्या आठ फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. या सामन्यात दिल्लीसाठी गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. स्टार्क चमकला, तर मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवही विकेट घेण्यात यशस्वी ठरला.

                      रविवारी दिवसातील दुसऱ्या सामन्यात वानिंदू हसरंगाच्या घातक गोलंदाजीमुळे राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा सहा धावांनी पराभव करत विजयाचे खाते उघडले. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या राजस्थानने २० षटकांत ९ बाद १८२ धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईचा डाव निर्धारित षटकांत सहा बाद १७६ धावांवरच थांबला. त्यांच्याकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक ६३ धावा केल्या.

                     राजस्थानचा चालू स्पर्धेतील तीन सामन्यांतील हा पहिला विजय आहे. त्याचबरोबर चेन्नईचा हा सलग दुसरा पराभव आहे. विशेष म्हणजे या विजयासह राजस्थान गुणतालिकेत नवव्या स्थानावर पोहोचला आहे. तर सीएसके सातव्या स्थानावर आहे. शिर्षस्थानी आरसीबी चार गुणांसह + २.२२६ च्या निव्वळ रनरेटसह आहे. 

                    विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना सीएसकेची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात जोफ्रा आर्चरने त्याला पहिला धक्का दिला. त्याने रचिन रविंद्रला शुन्यावरच आपला बळी बनवले. यानंतर राहुल त्रिपाठी आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड यांनी डाव सावरला. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ३९ चेंडूत ४६ धावांची भागीदारी झाली. त्रिपाठी २३ धावा करून बाद झाला. तर गायकवाडने ४४ चेंडूत ६३ धावा केल्या. त्यांच्याशिवाय शिवम दुबेने १८, विजय शंकरने ९ , महेंद्रसिंग धोनीने १६ केल्या. शेवटच्या षटकात संदीप शर्माने माजी कर्णधाराला शिमरॉन हेटमायरकडे झेलबाद करविले. रविंद्र जडेजा आणि जेमी ओव्हरटन अनुक्रमे ३२ आणि ११ धावांवर नाबाद राहिले. या सामन्यात राजस्थानकडून वानिंदू हसरंगाने चार विकेट घेतल्या. त्याच्याशिवाय जोफ्रा आर्चर आणि संदीप शर्मा यांनी प्रत्येकी एक यश मिळविले.

                   तत्पूर्वी, नितीश राणाच्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जसमोर १८३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. नितीश शिवाय रियान परागने ३७ धावा केल्या. चेन्नईकडून खलील अहमद, नूर अहमद आणि मथिशा पाथिराना यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याचवेळी रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी एक यश मिळाले. राजस्थानची सुरुवात धक्कादायक झाली. यशस्वी जयस्वाल (४) पहिल्याच षटकात खलील अहमद च्या गोलंदाजीवर अश्विनकरवी झेलबाद झाला. मात्र, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या नितीश राणा ने स्फोटक खेळी केली. त्याने सलामीवीर संजू सॅमसन सोबत दुसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली आणि चेन्नईविरुद्ध पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू ठरला. पॉवरप्लेमध्ये राजस्थानने १ बाद ७९ धावा केल्या.

                    इम्पॅक्ट प्लेअर( प्रभावशाली खेळाडू ) म्हणून आलेला संजू सॅमसन १६ चेंडूत २० धावा करून बाद झाला. त्याला नूर अहमदने बाद केले. यानंतर नितीशला रियान परागची साथ मिळाली. दोघांमध्ये २४ चेंडूत ३८ धावांची भागीदारी झाली. यादरम्यान डावखुरा फलंदाज नितीशने २१ चेंडूत आपले १९ वे अर्धशतक पूर्ण केले. ३६ चेंडूत ८१ धावा करून तो बाद झाला. धोनीने त्याला यष्टिचित केले. १२४ धावांवर तीन गडी गमावल्यानंतर राजस्थानचा डाव गडगडला. एका टोकाला उभा असलेल्या कर्णधार रियान परागला शिमरॉन हेटमायरची साथ लाभली, पण ही भागीदारी केवळ २६ धावांपर्यंतच पोहोचू शकली. परागचा पाथीरानाने त्रिफळा उडविला.  त्याने दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३७ धावा केल्या. या सामन्यात ध्रुव जुरेलने तीन, वानिंदू हसरंगाने चार धावा, कुमार कार्तिकेयने एक धावा केल्या. तर महिष तिक्षाणा आणि तुषार देशपांडे यांनी अनुक्रमे दोन आणि एक धावा करून नाबाद राहिले. जोफ्रा आर्चरला आपले खातेही उघडता आले नाही.

                  पाच वेळच्या विजेत्या चेन्नईने त्यांच्या इतकेच विजेतेपद मिळविणाऱ्या मुंबई इंडियन्सला हरवून धडाक्यात सुरुवात केली खरी, पण नंतरच्या सलग दोन पराभवांनी त्यांच्या मिशनला धक्का पोहोचला आहे. या बिकट परिस्थितीतून ते कसा मार्ग काढतात हे बघणेही निश्चितच मनोरंजक ठरेल.

@ डॉ.दत्ता विघावे                        
    क्रिकेट समिक्षक 
    मो. क्रं - ९०९६३७२०८२
close