shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रियांश आर्यच्या विक्रमी शतकाच्या बळावर पंजाब चेन्नईवर भारी !


                   पंजाब किंग्जने मंगळवारी अठराव्या आयपीएल सत्रात चेन्नई सुपर किंग्जचा त्यांच्या घरच्या मैदानावर १९ धावांनी पराभव केला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना युवा फलंदाज प्रियांश आर्यच्या झंझावाती शतकाच्या जोरावर सहा बाद २१९ धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईने पूर्ण षटके खेळून ५ गडी गमावून 201 धावा केल्या. पंजाबचा या मोसमात घरच्या मैदानावरील हा पहिला विजय आहे तर चेन्नईचा सलग चौथा पराभव आहे. 

                    प्रियांशने ४२ चेंडूत सात चौकार आणि नऊ षटकारांच्या मदतीने १०३ धावांची खेळी केली. त्याने ३९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले जे आयपीएलमधील पंजाबचे दुसरे सर्वात जलद शतक आहे. त्याच्यानंतर शशांक सिंगने ३६ चेंडूत नाबाद ५२ धावा केल्या. आपल्या खेळीत त्याने तीन चौकार आणि दोन षटकार मारले.

                    चेन्नईला वेगवान सुरुवात हवी होती आणि ती त्यांना मिळाली. रचिन रवींद्र आणि कॉनवे यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. सातव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मॅक्सवेलने रचिन रवींद्रला बाद केले. त्याने २३ चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने ३६ धावा केल्या. कर्णधार ऋतुराज गायकवाड केवळ एक धाव करू शकला आणि लॉकी फर्ग्युसनला बळी पडला.

                   चेन्नईला शिवम दुबे आणि कॉनवे यांच्याकडून चांगल्या भागीदारीची गरज होती. दोघांनी संघाची धावसंख्या शंभरीच्या पुढे नेली आणि झटपट धावा काढायला सुरुवात केली. या दोघांनी ८९ धावांची भागीदारी केली. फर्ग्युसनने पंधराव्या षटकातील पाचव्या चेंडूवर दुबेला बाद करून पंजाबला सामन्यात परत आणले. त्यानंतर धोनी फलंदाजीला आला तेंव्हा त्याच्याकडून झटपट धावा अपेक्षित होत्या. दरम्यान, अठराव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर चेन्नईने कॉनवेला निवृत्त केले. शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर धोनीही बाद झाला आणि याबरोबरच चेन्नईच्या विजयाच्या आशाही मावळत गेल्या. 

                    तत्पूर्वी, पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रियांशने येताच वादळ निर्माण केले आणि पहिल्याच षटकात सोळा धावा केल्या. दुसरा सलामीवीर प्रभसिमरन सिंगलाही मुकेश चौधरीने खाते उघडू दिले नाही. कर्णधार अय्यरही काही विशेष करू शकला नाही आणि नऊ धावा करून खलीलचा बळी ठरला. मार्कस स्टॉइनिसलाही खलीलने डाग आऊटमध्ये पाठविले. 

                  मागच्या सामन्यात अर्धशतक झळकविणाऱ्या नेहल वढेराला अश्विनच्या चेंडूवर धोनीने यष्टिचित केले. त्याला केवळ नऊ धावा करता आल्या. अश्विनने मॅक्सवेलचा त्याच्याच चेंडूवर झेल घेऊन पंजाबला पाचवा धक्का दिला. दरम्यान, शतक पूर्ण करणारा प्रियांश सतत धावा करत होता. चौदाव्या षटकातील चौथ्या चेंडूवर नूर अहमदने प्रियांशला बाद केले.

                   प्रियांश बाद झाल्यानंतर शशांक सिंग आणि मार्को जेनसनने झटपट धावा केल्या. दोघांनी मोठ मोठे फटके मारले. शशांकने ३६ चेंडूत ५२ धावा केल्या. आपल्या खेळीत त्याने दोन चौकार आणि तीन षटकार मारले. जेनसेनने १९ चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांसह ३४ धावांची नाबाद खेळी खेळली.

                     प्रियांश आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतक झळकविणारा संयुक्त चौथा फलंदाज ठरला आहे. या बाबतीत प्रियांशने सनरायझर्स हैदराबादचा ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हिस हेडची बरोबरी केली आहे, ज्याने गेल्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध ३९ चेंडूतच शतक झळकविले होते.

                चेन्नईविरुद्ध प्रियांश आर्याची बॅट गर्जत होती. त्याने अवघ्या ३९ चेंडूत आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. प्रियांशचे आयपीएलमधील हे पहिले शतक आहे. ४२ चेंडूत १०३ धावांची खेळी करून तो बाद झाला. त्याला नूर अहमदच्या गोलंदाजीवर विजय शंकरने झेलबाद केले. डावखुऱ्या फलंदाजाने शशांक सिंगसोबत सहाव्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली.                            आयपीएलमध्ये शतक झळकविणारा प्रियांश हा आठवा अनकॅप्ड फलंदाज आहे. या बाबतीत तो शॉन मार्श, यशस्वी जयस्वाल यांसारख्या फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. आयपीएलमध्ये शतके झळकविणाऱ्या अनकॅप्ड खेळाडूंमध्ये शॉन मार्श (२००८), मनीष पांडे (२००९), पॉल वाल्थाटी (२००९), देवदत्त पडिक्कल (२०२१), रजत पाटीदार (२०२२), यशस्वी जयस्वाल (२०२२), प्रभसिमरन सिंग (२०२५) आणि आर्या (२०२५) यांचा समावेश आहे.

                       प्रियांशची मूळ किंमत ३० लाख रुपये होती आणि आयपीएलच्या अठराव्या हंगामासाठी गेल्या वर्षी झालेल्या मेगा लिलावात पंजाबने प्रियांशला ३.८० कोटी रुपयांना विकत घेतले. म्हणजेच त्याचे मूल्य सुमारे तेरा पट वाढले होते. प्रियांश हे देशांतर्गत सर्किटमधील एक परिचित नाव आहे. काही काळापूर्वी ऑगस्ट २०२४ मध्ये, दिल्ली प्रीमियर लीगमध्ये एका षटकात सहा षटकार ठोकून तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्याच्या पॉवर हिटिंगने संपूर्ण जग प्रभावित झाले आणि तेव्हापासून त्याला आयपीएल लिलावात मोठ्या किमतीला विकले जाऊ शकते अशी अटकळ बांधली जात होती आणि झालेही तसेच.

@ डॉ.दत्ता विघावे                        
    क्रिकेट समिक्षक 
    मो. क्रं - ९०९६३७२०८२
close