जोश बटलरची शानदार खेळी आणि गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा त्यांचे घरचे मैदान एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आठ गडी राखून पराभव केला आहे. विद्यमान आयपीएलमधील गुजरातचा हा दुसरा विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत आठ गडी गमावून १६९ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने १७.५ षटकांत दोन गडी गमावून हे लक्ष्य गाठले.
अखेरीस आरसीबीसाठी लियाम लिव्हिंगस्टनने ४० चेंडूत एक चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने ५४ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय जितेश शर्माने २१ चेंडूत ३३ धावा केल्या. टीम डेव्हिडने १८ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३२ धावा केल्या. जोस बटलरने ३९ चेंडूत नाबाद ७३ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार आणि सहा षटकार मारले.
गुजरातचा कर्णधार शुभमन गिल या सामन्यात अपयशी ठरला आणि १४ चेंडूत तेवढ्याच धावा करून बाद झाला. भुवनेश्वर कुमारने त्याला माघारी पाठविले. मात्र, यानंतर साई सुदर्शन आणि जोश बटलर यांनी भागीदारी करत संघाला मजबूती दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४७ चेंडूत ७५ धावांची भागीदारी केली. सुदर्शनला आपले अर्धशतक पूर्ण करता आले नाही. वैयक्तिक ४९ धावांवर हेजलवूडने त्याला जितेशकरवी झेलबाद केले. ३६ चेंडूंच्या खेळीत त्याने सात चौकार आणि एक षटकार लगावला. त्याच्या पाठोपाठ आलेल्या शेरफेन रदरफोर्डला सोबत घेऊन बटलरने संघाला विजयापर्यंत नेले. रदरफोर्डने १८ चेंडूत ३० धावांची खेळी खेळली ज्यात एक षटकार आणि तीन चौकारांचा समावेश होता. विकेट्सच्या बाबतीत गुजरातचा हा दुसरा सर्वात मोठा विजय आहे.
अर्शद खान आणि मोहम्मद सिराज यांनी घरच्या मैदानावर खेळणाऱ्या आरसीबीची सुरुवात चांगली होऊ दिली नाही. अर्शदने विराट कोहलीला दुसऱ्याच षटकात वैयक्तिक सात धावांवरच परत पाठविले. देवदत्त पडिक्कलला सिराजने बाद करत आरसीबीला दुसरा धक्का दिला. त्याला केवळ चार धावा करता आल्या. कर्णधार रजत पाटीदारला ईशांत शर्माने माघारी धाडले. कर्णधाराला १२ चेंडूत केवळ बाराच धावा करता आल्या. त्याच्याआधी सिराजने तुफानी फलंदाज फिल सॉल्टची इनिंग संपवली होती. त्यालाही १३ चेंडूत केवळ १४ धावाच करता आल्या. यानंतर जितेश आणि लिव्हिंगस्टनने डाव सांभाळला. या जोडीने संघाची धावसंख्या ९४ धावांपर्यंत नेली. साई किशोरने जितेशला डग आऊटचा रस्ता दाखविला. कृणाल पांड्यालाही साई किशोरने बाद केले. सिराजने अर्धशतक पूर्ण करणाऱ्या लिव्हिंगस्टनला बाद करून गुजरातला दिलासा दिला. टीम डेव्हिडने शेवटच्या षटकांमध्ये खूप धावा केल्या आणि संघाला १६९ धावांपर्यंत नेले. मात्र, विसाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला. गुजरातकडून सिराजने तीन बळी घेतले, साई किशोरने दोन गडी बाद केले. तर अर्शद, प्रसिध्द आणि ईशांत यांनी प्रत्येकी एक बळी मिळाला.
मोहम्मद सिराजने बुधवारी आपला जुना आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना केला आणि घातक मारा केला. विद्यमान सत्रात गुजरात टायटन्सकडून खेळत असलेल्या सिराजने एम चिन्नास्वामी स्टेडियमवर शानदार गोलंदाजी करत तीन विकेट घेतल्या. यासह तो माजी भारतीय वेगवान गोलंदाज झहीर खानला मागे टाकण्यात यशस्वी ठरला. या सामन्यात गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
या सामन्यातील सिराजच्या आकडेवारीवर नजर टाकली तर त्याने चार षटकात केवळ १९ धावा दिल्या आणि तीन विकेट घेतल्या. यासह तो चिन्नास्वामी स्टेडियमवर आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. यापूर्वी झहीर खान आघाडीवर होता, मात्र आता सिराजने त्याला मागे टाकले आहे. सिराजच्या या मैदानावर आता २९ विकेट्स आहेत. या मैदानावर झहीरने २८ विकेट घेतल्या आहेत. मात्र, सिराजला या मैदानावर विकेट्सचा बादशाह बनणे अजून खूप लांब आहे आणि याचे कारण आहे युजवेंद्र चहल, ज्याने या स्टेडियममध्ये ५२ विकेट्स घेतल्या आहेत.
चहल बराच काळ आरसीबीकडून खेळला आणि त्यामुळेच तो या मैदानावर सर्वाधिक आयपीएल विकेट घेण्यात आघाडीवर आहे. सिराजही या संघाकडून खेळला आहे. गेल्या मोसमापर्यंत तो आरसीबीमध्ये होता. झहीरने आपल्या आयपीएल कारकिर्दीला या संघातूनच सुरुवात केली होती. झहीरनंतर विनय कुमार चौथ्या स्थानावर आहे, ज्याने या स्टेडियममध्ये २७ विकेट घेतल्या आहेत.
सन २०२३ सालापासून सिराजने या मैदानावर कहर केला आहे. पॉवरप्लेमध्ये तो खूपच धोकादायक असल्याचे सिद्ध झाले आहे. २०२३ पासून आजपर्यंत सिराजने या मैदानावर एकूण १४ सामने खेळले असून पॉवरप्लेमध्ये त्याने १२ बळी घेतले आहेत. सिराज इतर मैदानांवर मागे पडल्याचे आकडेवारी सांगते. दरम्यान, इतर मैदानांवरील पॉवरप्लेमधील सिराजचे आकडे बघितले तर त्याने १७ सामन्यांत फक्त सात विकेट्स घेतल्या आहेत. यावरून सिराजला या मैदानावर गोलंदाजी करणे किती आवडते हे दिसून येते. आरसीबी व गुजरात प्रत्येकी दोन विजय व एक विजय मिळवून बरोबरीत असले तरी येथून पुढे जो समजदारपणे खेळेल तोच पुढे जाईल.
@ डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२