आ. गोपीचंद पडळकर, तुकाराम बाबा, मेजर विक्रम जगताप यांची प्रमुख उपस्थितीत
जत/प्रतिनिधी:- ढोल, ताशाचा निनाद, जोरदार आतिषबाजी, बाळूमामांच्या नावान चांगभलंचा गजर करत तीन जेसीबीने श्री संत बाळूमामांच्या पालखीवर भंडाऱ्याची मुक्त उधळण करत जत तालुक्यातील येळवी येथील बाळूमामा मंदिराच्या समोर भंडारा उत्सव साजरा करण्यात आला. आ. गोपीचंद पडळकर , चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हभप तुकाराम बाबा महाराज, बाळूमामांच्या जिवनावर ज्यांनी संगीतमय किर्तन सादर केले ते मेजर विक्रम जगताप यांच्यासह हजारो भाविकानी भंडारा उत्सवात हजेरी लावली. बाळूमामांच्या गाण्यावर लहानापासून थोरापर्यत सर्वांनी ठेका धरत भंडारा उत्सवात आपला सहभाग नोंदविला.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत बाळूमामांचा आदमापूर येथील भंडारा उत्सव पडताच अमावस्येला जत तालुक्यातील येळवी येथील श्री क्षेत्र संत बाळूमामा देवस्थान कमिटीच्या वतीने येळवीतील श्री संत बाळूमामा मंदिरात भव्य भंडारा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे पाच वाजता मदने परिवाराच्या वतीने श्री स अभिषेक घालण्यात आला. गंगाधर उर्फ पिंटू स्वामी यांनी श्री स अभिषेक घातला. सायंकाळी सहा वाजता हभप तुकाराम बाबा महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत मदने वस्ती येथून श्री संत बाळूमामांच्या पालखीचे मंदिराकडे प्रस्थान झाले. ढोलाच्या निनादात पालखीचे मंदिरासमोर आगमन होताच होमहवन करण्यात आले.
कीर्तनकार मेजर विक्रम जगताप यांनी दोन तासांच्या आपल्या कीर्तनात बाळूमामांचा जिवनपट उलगडून दाखवत कलयुगातही बाळूमामा हाच सर्वसामान्य, गोरगरिबांचा आधारवड असल्याचे सांगत मामांची सेवा करा, मामांच्या मेंढी माऊलीची सेवा करा, अन्नदान करा असे आवाहन केले.
आकाराम सोलनकर परिवाराच्या वतीने मेजर विक्रम जगताप यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते. मेजर विक्रम जगताप यांचे किर्तन होताच भंडारा उत्सवाच्या मुख्य पालखी सोहळ्यास सुरुवात झाली. मंदिराभोवती पालखीच्या सवाद्य पाच प्रदक्षिणा झाल्या. पालखीवर तीन जेसीबीच्या सहाय्याने भंडारा व फुलांची उधळण करण्यात आली. यावेळी हभप तुकाराम बाबा महाराज यांनी बाळूमामांची एकापेक्षा एक सरस गाणे सादर केली. या गाण्यावर बाळूमामा भक्तांनी ठेका धरत बाळूमामांच्या नावाने गजर केला. तीन हजाराहून अधिक भाविक भंडारा उत्सवात सहभागी झाले होते. महाप्रसादाने भंडारा उत्सवाची सांगता झाली. श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने २५० टी शर्ट यावेळी तुकाराम बाबा यांनी बाळूमामा सेवकांना वाटप केले.