shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सन रायझर्य हैद्राबादचा सुर्य मावळतीकडे...?


                 अठराव्या आयपीएल सत्राची धडाक्यात सुरुवात करणाऱ्या हैद्राबादची नंतरच्या चार सामन्यात झालेली वाताहत संपूर्ण क्रिकेट जगताला अचंबित करत असताना आपला सुरूवातीचा सामना गमावल्यानंतर गुजरात टायटन्सने आपली गाडी व्यवस्थित रुळावर आणली आहे. कर्णधार शुभमन गिलचे नाबाद अर्धशतक आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर गुजरातने हैद्राबादचा त्यांच्या घरच्या मैदानावर सात गडी राखून पराभव केला. या मोसमात गुजरातचा हा सलग तिसरा विजय ठरला तर हैदराबादला सलग चार सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले.

                  हैद्राबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर चालू आयपीएल सत्रातील १९ व्या सामन्यात सनरायझर्स हैद्राबाद आणि गुजरात टायटन्स आमने सामने आले. या सामन्यात गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैद्राबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १५२ धावा केल्या आणि गुजरातला विजयासाठी १५३ धावांचे लक्ष्य दिले. यानंतर गुजरातने १६.४ षटकात ३ बाद १५३ धावा करत सामना खिशात घातला. आता गुजरातचे ६ गुण झाले असून हा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आला आहे, तर हैद्राबादचे दोन गुण असून हा संघ दहा संघात शेवटच्या स्थानावर ढासळला आहे.

                विजयी लक्ष गाठताना गुजरातच्या साई सुदर्शनला मोहम्मद शमीने ५ धावांवर झेलबाद करविले तर जोस बटलरला पॅट कमिन्सने क्लासेनच्या गोलंदाजीवर शून्यावर झेलबाद केले. कर्णधार गिलने ३६ चेंडूत आठ चौकारांसह आपले अर्धशतक पूर्ण केले. वॉशिंग्टन सुंदरनेही ४९ धावांची झकास खेळी खेळली, पण शमीच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. तिसऱ्या विकेटसाठी त्याने गिलसोबत ५५ चेंडूत ९० धावांची खेळी केली. या सामन्यात गिल ६१ धावांवर नाबाद राहिला तर रदरफोर्ड ३५ धावांवर नाबाद राहिला. हैद्राबादकडून शमीने दोन तर कमिन्सने एक विकेट घेतली.

                प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैद्राबादची सुरुवात चांगली झाली नाही, कारण हेड फक्त आठ धावा करून सिराजचा शिकार बनला. अभिषेक शर्माने १६ चेंडूत १८ धावा केल्या आणि तोही सिराजच्या चेंडूवर बाद झाला. पहिल्या सामन्यात शतकी सुरूवात करणाऱ्या ईशान किशनची सलग चौथ्या सामन्यातही खराब कामगिरी सुरूच राहिली. त्याने १४ चेंडूत १७ धावांची खेळी केली. क्लासेनने २७ धावा केल्या आणि त्रिफळाचित झाले. साई किशोरने ३ धावांवर नितीश रेड्डीला झेलबाद केले. सिराजनेही अनिकेतला १८ धावांवर पायचितच्या जाळ्यात घेरले. हा सिराजच तिसरा बळी होता. त्यानंतर सिराजने सिमरजीतला बाद करून चार बळी पूर्ण केले.  पॅट कमिन्सने नाबाद २२ धावांची छोटेखानी पण उपयुक्त खेळी साकारली.  मोहम्मद शमी सहा धावांवर नाबाद राहिला. गुजरातकडून सिराजने सर्वाधिक चार तर प्रसिध्द कृष्णा आणि साई किशोर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

                  या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरला गुजरात तर्फे पदार्पणाची संधी मिळाली व त्याने तिचे चिजही केली.  अर्शद खानच्या जागेवर त्याची वर्णी लागली.  सनरायझर्स हैद्राबादने हर्षल पटेलच्या जागी जयदेव उनाडकटचा अंतिम अकरामध्ये समावेश केला. 

                प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैद्राबादची सुरुवात चांगली झाली नाही. मोहम्मद सिराजने पहिल्याच षटकात ट्रॅव्हिस हेडला आपला बळी बनवले. त्याला केवळ आठ धावा करता आल्या. याआधी आयपीएलमध्ये सिराज आणि हेड कधीच आमने सामने आले नव्हते, मात्र सिराजने हेडला मागे टाकले. यानंतर सिराजने अभिषेकला बाद करून हैदराबादला आणखी एक धक्का दिला. यासह सिराज या मोसमात पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक बळी मिळविणारा गोलंदाज बनला. पॉवर प्लेमध्ये सिराजच्या सहा विकेट्स आहेत आणि त्याने या बाबतीत लखनौ सुपर जायंट्सच्या शार्दुल ठाकूरला मागे टाकले.  शार्दुलने पॉवर प्लेमध्ये पाच विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर खलील अहमद आणि मिचेल स्टार्क यांच्या नावावर या कालावधीत प्रत्येकी चार बळी आहेत. याबरोबरच सिराजने आयपीएलमधील स्वतःचे बळींचे शतक पूर्ण केले अशी कामगिरी करणारा सिराज हा बारावा भारतीय वेगवान गोलंदाज आहे. त्याचबरोबर, आयपीएलमध्ये शंभर बळींचा टप्पा पार करणारा एकूणात २६ वा गोलंदाज बनला.

                    या सामन्यातील विजयाने गुजरातचा आलेख उंचावला तर हैद्राबादचा खालावला. सलग चार पराभवाने स्पर्धेतील सर्वात मजबूत फलंदाजांची फौज असलेल्या हैद्राबादची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. तसं बघाल तर त्यांचे आणखी नऊ सामने बाकी असून त्यांना आपल्या खेळाबरोबरच ध्येय धोरणातही सुधारणा करण्यास मोठा वाव आहे. पुढील काळात त्यांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असणार हे निश्चित ! पण सध्याचा गत उपविजेत्यांचा ढासळलेला आत्मविश्वास बघता त्यांचे भवितव्य या मितीला तरी अंधकारमय दिसते.

@ डॉ.दत्ता विघावे                        
    क्रिकेट समिक्षक 
    मो. क्रं - ९०९६३७२०८२
close