घरच्या मैदानावर आयपीएलच्या अठराव्या मोसमातील पहिला सामना खेळणाऱ्या पंजाब किंग्जची विजयाची हॅट्ट्रिक हुकली. राजस्थान रॉयल्सने शनिवारी त्यांच्या घरच्या मुल्लापूर येथे पंजाबचा ५० धावांनी पराभव केला. या हंगामात पंजाबचा हा पहिला पराभव आहे. याआधी पंजाबने दोन सामने खेळले होते आणि दोन्ही जिंकले होते. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने ४ बाद २०५ धावा केल्या. पूर्ण २० षटके खेळल्यानंतर पंजाबला नऊ गडी गमावून केवळ १५५ धावाच करता आल्या. राजस्थानसाठी यशस्वी जयस्वाल फॉर्ममध्ये परतला आणि त्याने मोसमातील पहिले अर्धशतक झळकविले. त्याने ४५ चेंडूत तीन चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने ६७ धावांची खेळी केली. रियान परागने नाबाद ४३ धावा केल्या. तर पंजाबकडून नेहल वढेराने अर्धशतक झळकविले.
पंजाबला या मैदानावर कधीही गाठता न आलेल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. प्रियांक आर्य आणि प्रभसिमरन सिंग संघाला चांगली सुरुवात करतील, अशी पूर्ण अपेक्षा होती. जोफ्रा आर्चरने पहिल्याच षटकात यजमान संघाच्या आशा पल्लवित केल्या. त्याने पहिल्याच चेंडूवर प्रियांशला त्रिफळाचित केले. कर्णधार श्रेयस अय्यरने येताच दोन चौकार मारले पण आर्चरने त्यालाही शेवटच्या चेंडूवर बाद केले. त्याने पाच चेंडूत दहा धावा केल्या.
प्रभसिमरन आणि मार्कस स्टॉइनिस यांनी संघाला सांभाळण्याचा प्रयत्न केला. स्टॉइनिसला संदीप शर्माने त्याच्याच चेंडूवर झेल घेत डग आऊटचा रस्ता दाखवला. कुमार कार्तिकेयनच्या गोलंदाजीवर वानिंदू हसरंगाकडे झेल देऊन प्रभासिमरन बाद झाला. स्टॉइनिसने सात चेंडूंत केवळ एक धाव घेतली. प्रभासिमरनने १६ चेंडूत १७ धावांची खेळी खेळली.
पंजाबची स्थिती कमकुवत असल्याचे दिसत असताना वढेरा आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी शानदार भागीदारी करत पंजाबला सामन्यात परत आणले आणि राजस्थानची चिंता वाढवली. दोघांनी ५२ चेंडूत ८८ धावा जोडल्या. ही जोडी राजस्थानसाठी चिंतेची बाब बनली होती, पण त्यानंतर संपूर्ण सामना दोन चेंडूतच बदलून गेला. पंधराव्या षटकात शेवटच्या चेंडूवर तिक्षणाने मॅक्सवेलला बाद केले. त्याने २१ चेंडूत ३ धावा केल्या ज्यात त्याने ३ चौकार आणि एक षटकार लगावला.
सोळाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हसरंगाने वढेराला जुरेलकरवी झेलबाद करून पंजाबला मोठा धक्का दिला आणि येथून राजस्थान संघ सामन्यात परतला. वढेराने ४१ चेंडूत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ६२ धावांची खेळी केली. सतराव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर संदीप शर्माने सूर्यांश शेडगेला बाद केले. येथून पंजाबचा पराभव निश्चित दिसत होता. अठराव्या षटकातील चौथ्या चेंडूवर टेकशनाने मार्को जेनसेनला परत पाठविले. त्याला तीन धावा करता आल्या. आर्चरने शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर अर्शदीपला बाद करून पंजाबचा नववा बळी मिळवला. राजस्थान कडून आर्चरने तीन बळी घेतले. संदीप आणि तिक्षणाने प्रत्येकी दोन गडी बाद केले. कुमार कार्तिकेय आणि वानिंदू हसरंगा यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
तत्पूर्वी, मुल्लानपूर क्रिकेट स्टेडियमवर पंजाबचा कर्णधार अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार संजू सॅमसन यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. दोन्ही फलंदाजांनी मैदानात चौफेर फटकेबाजी केली आणि संघाची धावसंख्या १०.२ षटकांत ८९ धावांपर्यंत पोहोचवली. ही धोकादायक जोडी फोडण्याचे काम लॉकी फर्ग्युसनने केले. त्याने संजू सॅमसनला ३८ धावांवर कर्णधार अय्यरकडून झेलबाद केले. बाद होण्यापूर्वी संजूने २६ चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने ३८ धावा केल्या. या मोसमातील हा पहिलाच सामना आहे जेव्हा संजू सॅमसनने संघाचे नेतृत्व केले आणि विकेट्स राखल्या.
दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर आलेला नितीश राणा जास्त वेळ क्रीझवर टिकू शकला नाही आणि वैयक्तिक बारा धावांवर मार्को जेनसेनच्या चेंडूवर मॅक्सवेल करवी झेलबाद झाला. यानंतर फलंदाजीला आलेल्या हेटमायर आणि रायन पराग यांनी संघाची धावसंख्या दिडशेच्या पुढे नेली, अर्शदीपने आपल्या शेवटच्या षटकात हेटमायरला (२०) मॅक्सवेल करवी झेलबाद केले. रियान पराग आणि ध्रुव जुरेल (१३) यांच्यामुळे चार गडी गमावून २०५ धावा झाल्या.
@ डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२

