मुंबई इंडियन्सच्या एलिमिनेटर सामन्याच्या पार्श्वभूमीवर अनेक तज्ञ मंडळी, चॅनेल्स, प्रसार माध्यमांनी मुंबईचा पराभवच ग्राह्य धरला होता, मात्र या झुंजार या संघाने सर्व भाकीतं केराच्या टोपलीत टाकून दणदणीत विजय मिळवून क्रिकेट हा खेळ खरोखर वर्तमानाच्या पिचवर खेळला जातो हे दाखवून देत आपले पुढचे मनसुबे काय आहेत यांचे संकेत क्रिकेट जगताला दिले.
मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा २० धावांनी पराभव केला. या विजयासह, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघ क्वालिफायर-२ मध्ये पोहोचला आहे. आता, त्यांचा सामना १ जून रोजी अहमदाबादमध्ये पंजाब किंग्जशी होईल. शुक्रवारी न्यू चंदीगडमध्ये खेळल्या गेलेल्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि २० षटकांत पाच बाद २२८ धावा केल्या. प्रत्युत्तरात, गुजरातला निर्धारित षटकांत सहा गडी गमावून फक्त २०८ धावा करता आल्या. त्यांच्याकडून साई सुदर्शनने सर्वाधिक ८० धावा केल्या.
गुजरातची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार शुभमन गिलला फक्त एका धावेवर ट्रेंट बोल्टने बळी बनवले. यानंतर कुसल मेंडिस क्रीजवर आला आणि हिट विकेट होऊन परतला. त्याने साई सुदर्शनसोबत ३४ चेंडूत ६४ धावांची भागीदारी केली. यामध्ये मेंडिसने २० धावांचे योगदान दिले. मग सुदर्शनला वॉशिंग्टन सुंदरची चांगली साथ मिळाली. दोघांमध्ये ४४ चेंडूत ८४ धावांची भागीदारी झाली. सुंदरने ४८ आणि सुदर्शनने ८० धावा केल्या. तर, रुदरफोर्डने २४ आणि शाहरुख खानने १३ धावा केल्या. राहुल तेवतिया १६ धावांवर नाबाद राहिला आणि राशीद खान खाते न उघडता नाबाद राहिला. मुंबई इंडियन्सकडून ट्रेंट बोल्टने दोन तर जसप्रीत बुमराह, रिचर्ड ग्लीसन, मिशेल सँटनर आणि अश्विनी कुमार यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.
तत्पूर्वी, रोहित शर्मा आणि जॉनी बेअरस्टो यांच्या सलामी जोडीने मुंबईला जलद सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये ८४ धावांची भागीदारी झाली. या सामन्यात पदार्पण करणाऱ्या बेअरस्टोला साई किशोरने गेराल्ड कोएत्झीकरवी झेलबाद केले. तो २२ चेंडूत चार चौकार आणि तीन षटकारांसह ४७ धावा काढून बाद झाला. यानंतर रोहितला सूर्यकुमार यादवची साथ मिळाली. दोघांनीही ३४ चेंडूत ५९ धावा जोडल्या. यादरम्यान, सूर्यकुमारने २० चेंडूंचा सामना केला आणि ३३ धावा करून बाद झाला.
या सामन्यात रोहित शर्माने २८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. याशिवाय, त्याने आयपीएलमध्ये ३०० षटकारही पूर्ण केले. तो आयपीएलमध्ये ३०० षटकार मारणारा पहिला सक्रिय खेळाडू ठरला. आता त्याच्या नावावर ३०२ षटकार नोंदले आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. हिटमॅनने तिलक वर्मासोबत तिसऱ्या विकेटसाठी २२ चेंडूत ४३ धावा जोडल्या. माजी कर्णधाराने ५० चेंडूत नऊ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ८१ धावा केल्या. तर तिलक ११ चेंडूत २५ तर नमन धीर नऊ धावा काढून बाद झाला. हार्दिक पांड्या नऊ चेंडूत तीन षटकारांसह २२ धावांवर नाबाद राहिला तर सँटनर खाते न उघडता नाबाद परतला. गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णा आणि साई किशोर यांनी प्रत्येकी दोन बळी मिळविले तर मोहम्मद सिराजला एक यश मिळाले.
आयपीएलमध्ये ३०० षटकार मारणारा हिटमन पहिला भारतीय खेळाडू ठरला. त्याच्या नावावर ३०० षटकार नोंदलेले आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने ३५७ षटकार मारले आहेत. तर सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. विराट कोहली २९१ षटकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर धोनी (२६४) आणि आंद्रे रसेल (२२३) अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानावर आहेत. गुजरातविरुद्धच्या सामन्यात दोन षटकार मारून रोहितने आयपीएलमध्ये ३०० षटकार पूर्ण केले. या सामन्यात रोहित शर्माने २८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तो सध्या उत्तम फॉर्ममध्ये दिसत आहे आणि मुंबईला सहावे विजेतेपद मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
गुजरात टायटन्सचा यष्टीरक्षक-फलंदाज कुसल मेंडिसचे आयपीएल पदार्पण खूपच वाईट झाले. इंडियन प्रीमियर लीगच्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध धावांचा पाठलाग करताना तो हिट विकेट (स्वयंचित) बाद झाला. या हंगामात हिट विकेटने बाद होणारा तो तिसरा खेळाडू ठरला.
आयपीएलचा विद्यमान हंगामात एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सचा सामना मुंबई इंडियन्सशी झाला. नाणेफेक जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरात टायटन्सने त्यांच्या संघात दोन बदल केले, जोस बटलरच्या जागी कुसल मेंडिसला संधी दिली. तसेच, अर्शदच्या जागी वॉशिंग्टन सुंदरचा समावेश करण्यात आला.
कुसल मेंडिसने आयपीएलमध्ये पदार्पण केले. तथापि, तो ते संस्मरणीय बनवू शकला नाही. क्षेत्ररक्षण करताना मेंडिसने दोन सोपे झेल सोडले, ज्यात रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांचे झेल समाविष्ट होते. यानंतर, जेव्हा तो फलंदाजीला आला तेव्हा तो हिट विकेट बनला. गुजरातच्या डावाच्या सातव्या षटकात, मिशेल सँटनरच्या एका शॉर्ट बॉलवर मेंडिसचा पाय स्टंपवर लागला आणि त्याला हिट विकेट घोषित करण्यात आले. श्रीलंकेचा यष्टीरक्षक फलंदाज १० चेंडूत २० धावा काढून परतला. या हंगामात हिट विकेटची ही तिसरी घटना आहे. आयपीएलच्या चालू हंगामात अशाप्रकारे बाद होण्याची ही केवळ तिसरी घटना होती. खरं तर, या महिन्याच्या सुरुवातीला सनरायझर्स हैद्राबाद विरुद्धच्या लीग सामन्यात कृणाल पंड्या अशाच पद्धतीने बाद झाला होता. त्याआधी अभिनव मनोहर हिट विकेट झाला होता.
या सत्राची नेहमीप्रमाणे डळमळीत सुरुवात झाल्यानंतर मुंबईने आपल्या खेळात व दृष्टीकोनात अमूलाग्र बदल केले व त्या परिणाम काय झाला हे आपल्या समोर आहे. उलट स्पर्धेची दमदार सुरूवात करणाऱ्या गुजरातची गाडी शेवटच्या दोन साखळी सामन्यात रुळावरून घसरली तर एलिमिनेटरमध्ये साफ कोसळली. सर्वांना वाटलं होतं की, शुभ मन गिल इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी स्वतःच्या नावावर आयपीएल विजेतेपदाचं लेबल चिकटून जाईल. ज्याचा फायदा टिम इंडियाला होईल. मात्र मुंबई इंडियन्सने असे काही होऊ न देता गुजरातचा स्पर्धेतील पत्ताच काटला.
मागच्या लेखात मी, मुंबईच्या क्षमते विषयी विश्वास दर्शवून त्यांच्या कुवतीची जाणीव करून दिली होती. मुंबई इंडियन्सने आता अलिखित उपांत्य फेरी गाठून विजेतेपदाकडे एक आश्वासक पाऊल पुढे टाकले हे मात्र निश्चित !
@ डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२