अमळनेर प्रतिनिधी – पाणी फाउंडेशन टीम अमळनेर, धरती माता महिला शेतकरी गट, पंचायत समिती अमळनेर आणि पिंपळे ग्रुप ग्रामपंचायत यांच्या संयुक्त सहकार्यातून आणि सेवा सहयोग यांच्या अत्याधुनिक मशिनरीच्या योगदानाने पिंपळे गावातील जलमृदा संधारणेच्या क्षेत्रात प्रचंड यश संपादन झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील नाला खोलीकरण, तलाव खोलीकरण, जलतरा खड्डयांच्या बांधकाम आणि उत्कृष्ट जागेची निवड या कामांमध्ये दुसरा क्रमांक मिळवून या उपक्रमाने संपूर्ण जिल्ह्यात आदर्श निर्माण केला आहे.
.. मारवड विकास मंचच्या आर्थिक सहाय्याने आणि ग्रामस्थांच्या लोक सहभागाने मिळून हे काम करण्यात आले असून, या प्रकल्पाचे नियोजन व अंमलबजावणीमध्ये प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ वर्ष युवराज पाटील , सर्व सदस्य व धरती माता, व सर्व ग्रामस्थ यांच्या नेतृत्वाखाली अनेक जबाबदार व्यक्तींचे अथक प्रयत्न मोलाचे ठरले आहेत. दानशूर व्यक्तिमत्व कामगार आयुक्त विजय चौधरी व मारवड विकास मंच ,सेवा संयोग संस्था, वृषालीताई पटवर्धन अमेरिका आणि लोक वर्गणीतून प्रयत्नशील व्यक्तींच्या एकजुटीमुळे
जलमृदा संधारणेचे हे मोठे कार्य यशस्वी झाले आहे.
या प्रकल्पाच्या यशाबाबत मिळालेल्या पुरस्काराने सहभागींमध्ये अभिमानाची लाट निर्माण झाली असून, या कामांत आलेल्या अडचणी व त्यावर मात करण्याच्या कथा मनाला स्पर्शन जात आहेत. जल, मृदा, माती, शेती आणि प्राणी-पक्ष्यांसाठी केलेल्या या कष्टांचे हे अपूर्व फळ आहे, ज्यामुळे पिंपळे गाव देशातील एक आदर्श मॉडेल विलेज म्हणून उभे राहण्याच्या प्रवासात आहे.
धरती माता गटाच्या नेतृत्वाखाली आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने येत्या काळातही हा प्रकल्प अधिक
व्यापक स्वरूप घेईल व पिंपळे गावाला राष्ट्रीय नकाशावर अग्रगण्य स्थान मिळवून देईल, अशी सर्वांचे ठाम श्रद्धा आहे. जल आणि मृदा संवर्धनासाठी एकजुटीने पुढे येण्याची हीच खरी प्रेरणा आहे