निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) – जागतिक योग दिनानिमित्त सर नेस वाडिया फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने विद्या विकास मंदिर, निमगाव म्हाळुंगी येथे दिनांक २१ जून रोजी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. फाउंडेशनच्या जनरल मॅनेजर मा. कुशाला शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
या शिबिरात विद्यार्थ्यांसह शाळेतील शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. योगा प्रशिक्षकांनी विविध योगासने, प्राणायाम व ध्यानधारणा यांचे प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांना योगाचे महत्त्व समजावून सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर नेस वाडिया फाउंडेशनचे श्री.ओंकार घरत, श्री.सुमेध धुरंदर, श्री. रामेश्वर राऊत, श्री. अक्षय जेजुरकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री.जाधव सर व त्यांचे सहकारी वृंद, तसेच ब्रिटानिया डेअरी संचलित साईगणेश दुध संकलन केंद्राचे चेअरमन श्री. मारुती लांडगे यांनी विशेष परिश्रम घेतले.
योग दिनाचे औचित्य साधून शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योग किती आवश्यक आहे, याविषयी जागरूकता निर्माण झाली. सहभागी नागरिकांनी दररोज योगाभ्यास करण्याचा संकल्प करत हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरल्याची भावना व्यक्त केली.