राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी न्यायालयाचा जंगम जप्ती वॉरंट जारी; एनएचएआय कार्यालयातून साहित्य जप्त.
जळगाव, १९ जून २०२५:
सन २०११ मधील अधिसूचनेनुसार पारोळा तालुक्यातील करंजी व दळवेल शिवारातील शेतकऱ्यांची जमीन राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात आली होती. सन २०१३ मध्ये सक्षम प्राधिकाऱ्यांनी केवळ अत्यंत कमी नुकसानभरपाई दिल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी मा. जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे वाढीव मोबदल्यासाठी अर्ज केला होता.
सन २०१९ मध्ये हा अर्ज मंजूर होत, शेतकऱ्यांना वाढीव रक्कम मिळावी असा आदेश पारित झाला. तसेच मा. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या तरसेमसिंग विरुद्ध एनएचएआय प्रकरणाच्या निकालानंतर दिलासा रक्कम आणि त्यावरील व्याज देण्याचे आदेश देण्यात आले होते.
दिनांक ४ फेब्रुवारी २०२५ रोजी या प्रकरणाचा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागल्यानंतर, त्यांनी जिल्हा न्यायालय, जळगाव येथे दिलासा रक्कम व त्यावरील व्याज मिळण्यासाठी दरखास्त दाखल केली होती.
न्यायालयीन कारवाई आणि साहित्य जप्ती:
या दरखास्तीवर सुनावणी करताना मा. न्यायाधीश शरद परदेशी (वरिष्ठ स्तर, जळगाव) यांनी एनएचएआय कडून रक्कम वसूल करण्यासाठी जंगम जप्ती वॉरंट जारी केला.
या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी मौजे दळवेल येथील श्री युवराज ओंकार पाटील, जगन्नाथ सिताराम पाटील, तसेच करंजी येथील संजय हिम्मत पाटील आणि संजय राजधर पाटील यांनी आपल्या वकिलांसह —अँड. तुषार प्रकाश पाटील, अँड. रघुवीर सिंग पाटील, अँड. ओम त्रिवेदी, अँड. सुनील माळी, अँड. धीरज जैन, अँड. प्रफुल्ल महाले —
एनएचएआय प्रकल्प संचालक कार्यालय (शिव कॉलनी, जळगाव) येथे भेट दिली.
न्यायालयाच्या आदेशाची प्रत दाखवून टेबल, खुर्ची इत्यादी साहित्य पंचांच्या उपस्थितीत —
सुनील नवल गिरासे व संभाजी भटू पाटील (दोघे रा. दळवेल)यांच्या साक्षीने जप्त करण्यात आले आणि नाझर तथा सहाय्यक अधीक्षक मा. श्याम शिंदे भाऊसाहेब यांच्याकडे जमा करण्यात आले.
( वरील सर्व माहिती दिलेल्या वा.प्र. नुसार.)