अहमदनगर :
शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक व प्रदेशाध्यक्ष शिवश्री राहुल बाजीराव ढेंबरे पाटील यांनी राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र, प्रत्यक्षात सत्तेत आल्यावर हे आश्वासन पाळण्यास सरकार पूर्णपणे टाळाटाळ करत असल्याची टीका त्यांनी केली.
राहुल ढेंबरे पाटील म्हणाले, “तमाम महाराष्ट्रातील शेतकरी आज हालाखीच्या परिस्थितीत जगत आहे. शेतीमालाला योग्य हमीभाव नाही, कर्जाचा बोजा वाढला आहे आणि सरकार आश्वासनपूर्ती न करता केवळ दिखावा करत आहे. शेतकरी आज रस्त्यावर उतरले आहेत. जर सरकारने तात्काळ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही, तर यापेक्षा उग्र स्वरूपाचे आंदोलन उभे राहील आणि त्यासंदर्भात होणाऱ्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील.”
यासोबतच त्यांनी काही ठोस मागण्या सरकारसमोर मांडल्या. शेतीमालाला हमीभाव मिळावा, दिव्यांग बांधवांना दरमहा ६ हजार रुपये पेन्शन द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच राज्याचे कृषिमंत्री यांच्यावर टीका करत त्यांनी म्हटले की, “कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांची थट्टा करणे तात्काळ थांबवावे. मोबाईलवरचा जुगार सोडून एक दिवस तरी साध्या शेतकऱ्याचे जीवन जगून बघावे, म्हणजे शेतकऱ्यांच्या खऱ्या वेदना समजतील.”
ढेंबरे पाटील यांच्या या वक्तव्यामुळे शेतकरी आंदोलनाला नवा रंग मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा शेतकरी संघर्ष उग्र होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष राहुल ढेंबरे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. हमीभाव, दिव्यांग पेन्शन आणि कृषिमंत्र्यांच्या शेतकरीविरोधी वागण्यावरही त्यांनी टीका केली असून, सरकारने दुर्लक्ष केल्यास उग्र आंदोलन होईल, असा इशारा दिला आहे.