एरंडोल – तालुक्यातील विखरण गावात उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती, एरंडोल अंतर्गत विखरण-रिंगणगांव जि.प.गटातील प्रांजल महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि महिला मेळावा आज संपन्न झाला. राज्यातील ग्रामीण भागाचा विकास आणि महिला सबलीकरणाच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असून यावेळी उपस्थित भगिनींना आमदार मा.अमोलदादा पाटील व सौ.मृणालताई पाटील यांनी मार्गदर्शन केले.
ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी उमेद अभियान प्रभावी ठरत आहे. ग्रामविकासामध्ये महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून गाव ग्रामीण भागाचे स्वप्न साकार करण्यासाठी व गरीब आदिवासी, विधवा, निराधार, अपंग आदी. घटकांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. उमेद हे राज्यातील लाखो महिलांच्या हक्काचे व्यासपीठ आणि आधार बनले आहे. महिलांना स्वातंत्र्य सामर्थ्य स्वतःची ओळख आणि आत्मविश्वास उमेद अभियानाच्या माध्यमातून वाढला आहे. बचत गटामुळे गावातच रोजगारांच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. गटांच्या माध्यमातून महिला आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने आगेकूच करत आहेत, त्यामुळे महिलांच्या उन्नतीचे बचत गट एक साधनच नसून महिला सबलीकरण सशक्तिकरणाची एक क्रांतिकारी चळवळ आहे. महिला सबलीकरण आणि सर्वांगीण विकसनशील उदात्तीकरण होण्याच्या अनुषंगाने बचत गट संकल्पना अतिशय महत्वाची आहे. सार्वजनिक जीवनातील आत्मसन्मान आणि कौटुंबिक आर्थिक उभारणीसाठी आपण निर्माण केलेले विश्व ही व्यापक समाजनिर्मितीचे मोठे व्यासपीठ असल्याची भावना यावेळी आमदार मा.अमोलदादा पाटील यांनी बोलताना व्यक्त केली आणि उपस्थित भगिनींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, मा.तालुकाप्रमुख बबलुदादा पाटील, तालुकासंघटक संभाआबा पाटील, युवासेना तालुकाप्रमुख कमलेश पाटील यांचेसह उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी, कर्मचारी, विखरण-रिंगणगांव जि.प.गट प्रभाग संघाचे पदाधिकारी, सभासद, विखरण-रिंगणगांव गटातील बचत गटांचे पदाधिकारी, सभासद माता-भगिणी, विखरण व पंचक्रोशितील इतर गावांचा स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.