डॉ. वसंत दगडे "विश्वास गौरव" पुरस्काराने जाहीर.....
शुक्रवारी कळंब येथील महाविद्यालयात कै. विश्वासराव रणसिंग यांच्या जयंती निमित्त पुरस्काराचे वितरण,बंदिस्त क्रीडा प्रेक्षागृहाचे भूमिपूजन, प्रयोगशाळेचे उदघाट्न होणार.
इंदापूर :इंदापूर तालूका ग्रामविकास प्रतिष्ठान, निमसाखर यांच्या वतीने देण्यात येणारा विश्वास गौरव 2025 पुरस्कार वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल वालचंदनगर येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ् डॉ. वसंत भगवानराव दगडे यांना जाहीर करण्यात आला आहे.
हा पुरस्कार इंदापूर तालुक्याचे माजी पंचायत समिती सभापती व पुणे जिल्हा परिषद सदस्य तसेच इंदापूर तालूका ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कै. विश्वासराव रणसिंग यांच्या 25 जुलै या जयंती दिवशी प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्कार शोध समितीने डॉ. दगडे यांची या पुरस्काराकरिता प्रतिष्ठानकडे शिफारस केली होती. शाल, श्रीफळ, मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख रु.दहा हजार असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
शुक्रवार दि. 25 जुलै रोजी या पुरस्काराचे वितरण प्रतिष्ठानचे पदाधिकारी, विश्वस्त तसेच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कळंब येथील महाविद्यालयात संपन्न होणार आहे. त्याच सोबत महाराष्ट्र शासन क्रीडा विभाग व प्रतिष्ठान यांच्या संयुक्त 90लक्ष रु. अनुदानामधून बांधण्यात येणाऱ्या बंदिस्त क्रीडा प्रेक्षागृहाचे भूमिपूजन, विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप व नवीन प्रयोगशाळा उदघाट्न समारंभ देखील संपन्न होणार आहे.