shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

याच साठी केला होता अट्टाहास..!



संतानी म्हंटले आहे की, याच साठी केला होता अट्टाहास.., 
शेवटचा दिवस गोड व्हावा..!

परंतु शेवटचा दिवस माणसाचा कधी गोड होतो.. तर.., मृत्यू समई माणसाचा शेवटचा दिवस असतो.. त्या दिवसाचा जो विधी असतो तो विनासायास.. विना विघ्न पार पडावा असे सर्वांना वाटत असते.. त्यासाठी गावा गावात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून अमरधाम उभारून अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यात येते. शासनही या अंत्यसंस्काराच्या ठिकाणाला भरीव असे अर्थ सहाय्य देऊन माणसाचा शेवटचा दिवस गोड व्हावा यासाठी सहकार्य करीत असते.
        देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या अमरधाम मध्ये काल एका अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होतो..  संस्काराची सर्व तयारी पूर्ण झाली होती. मात्र अंत्यसंस्कारासाठी उभारण्यात आलेली नगरपालिकेची व्यवस्था कोलमडलेली पाहावयास मिळाली.. अंत्यसंस्कारासाठी ज्या लोखंडी जाळ्या आहेत त्या तुटलेल्या अवस्थेत असून.. कसेबसे लाकडांचा आधार देऊन त्यामध्ये अंत्यसंस्कार पार पडला.. त्याही पुढे जाऊन अंत्यसंस्काराच्या जागेला जे छत उभारलेले आहे त्याचा स्लॅब पडायला झाला आहे.. तो स्लॅब केव्हाही कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता तर आहेच.. शिवाय या स्लॅबला पडलेल्या भगदाडातुन पावसाचे पाणी थेट चितेवर पडत असल्याने देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या हद्दीत नागरिकांचा शेवटचा दिवस मात्र गोड होत नसल्याचा कटू अनुभव पहावयास मिळाला.. नागरिकांमध्ये नगरपालिकेच्या बाबतीत उलट सुलट चर्चा आहेत..  कुणी म्हणते फोटो काढा.., कुणी म्हणते व्हिडिओ करा.., कुणी म्हणते नगरपालिकेच्या  मुख्याधिकाऱ्यांना अंत्यसंस्काराला बोलवा.. कुणी म्हणते जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करा.. पण.., खोलात जाऊन अधिक माहिती घेतली असता या सर्व गोष्टींचा काहीही उपयोग नसल्याचे जाणवले.
       देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या याच अंत्यसंस्काराच्या जागेवर दोन अंत्यसंस्कार नगरपालिकेने बांधलेल्या जाळ्यांमध्ये.. तर, दोन अंत्यसंस्कार या दोन जाळ्यांच्या मधोमध असे एकूण चार अंत्यसंस्कार भर पावसात सुरू असल्याचा व्हिडिओ आम्ही काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने तात्काळ देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या अमरधामला निधी मंजूर केला आहे. मात्र सदरची मंजुरी केवळ कागदावरच राहून गेल्याने त्याची माहिती घेतली असता.. महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण योजना आडवी आल्याच्या समजले.
       आता आपल्याला प्रश्न पडला असेल की, या अंत्यविधीच्या जागेचा आणि महाराष्ट्र शासनाच्या लाडक्या बहिण योजनेचा काय संबंध.?
         महाराष्ट्र शासनाने नुकतीच लाडके बहिण योजना सुरू केली.. व त्यासाठी विविध विभागांमधून निधी वळविण्यात आला.. त्याचा परिणाम राज्यातील सर्वच विभागांवरती झाला असल्याने राज्याच्या तिजोरीत खडखडाट पहावयास मिळत आहे.. राज्यातील कित्येक ठेकेदारांनी घरातील पैसे घालून शासनाची कामे पार पाडली. मात्र शासनाकडून सदरच्या कामाला निधी उपलब्ध नसल्याने राज्यातील एका नामांकित ठेकेदाराने कर्जाला कंटाळून नुकतीच आत्महत्या केल्याची अत्यंत दुःखद बातमी वाचायला मिळाली.. 
        इतकेच नव्हे तर ज्या देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या अमरधाम बद्दल आपण चर्चा करत आहोत.. त्या.. अमरधामला मंजुरी मिळून कित्येक दिवस उलटून गेले.. तरी केवळ शासनाकडे पैसा उपलब्ध नसल्याने सदरचे अमरधामचे बांधकाम करता येत नाही... इतकेच नव्हे तर नगरपालिकेच्या सफाई कामगारांपासून ते थेट अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचेच राज्यभर पगार द्यायला शासनाकडे पैसा नाही. दोन दोन महिने कामगारांना पगार नाही.. तरीही कामगार कामावर येतात याबद्दल त्यांना खरे तर धन्यवाद दिले पाहिजे.. राज्यातील संपूर्ण नगरपालिकांचा कर्मचारी पगार २५२ कोटी इतका असून..  ०२ जुलै २०२५ रोजीच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरण करण्यासाठीच्या शासन निर्णयामध्ये लाडक्या बहिणींसाठी ३९६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या विरोधात ओरडून काहीही उपयोग नाही. त्यामुळे निधी आल्यानंतरच येथील नागरिकांचा शेवट गोड होईल असे दिसते.. राज्यातील केवळ नगरपालिका कामगारांचे पगाराचा नव्हे तर आमदारांचा स्थानिक विकास निधी सुद्धा रखडला असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे. आमदारांकडून कित्येक कामांना निधीचे पत्रे दिली गेली आहेत मात्र शासनाकडे पैसा नसल्याने सदरची कामे पडून असल्याचे बोलले जात आहे.. 
        देवळाली प्रवरा नगरपालिकेला सन २०२१ मध्ये केंद्र शासनाचा स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार देण्यात आला.. मात्र त्या पुरस्काराचे २.५ कोटी रुपये सुद्धा देवळाली प्रवरा नगरपरिषदेला अद्याप मिळाले नाहीत हे विशेष. त्यामुळे केंद्र शासनाने नुकताच देवळाली प्रवरा नगरपालिकेला सन २०२४ - २५ साठी स्वच्छ सर्वेक्षण बाबत राष्ट्रपतींच्या हस्ते दिलेल्या पुरस्काराची रक्कम कधी येईल हे कुणीही सांगू शकत नाही.. त्यामुळे राज्यातील सर्वच नगरपालिकांची अवस्था अत्यंत बिकट बनली असून.. स्थानिक कराच्या उत्पन्नातून ज्या नगरपालिकांना पैसा उभा करणे शक्य आहे त्यांचीच कामे सध्या सुरू आहेत.. सध्या देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या तिजोरीत केवळ एक लाख रुपयांच्या जवळपास निधी शिल्लक असल्याने देवळाली प्रवरा नगरपालिका सुद्धा राज्यातील इतर नगरपालिका प्रमाणेच आर्थिक अडचणीत असताना येथील नागरिकांनी त्यांचा शेवटचा दिवस कसा गोड करून घ्यायचा यावर सर्व विभागांचे निधी लाडक्या बहिणींकडे वळवणाऱ्या महाराष्ट्र शासनाने ठरवायचे आहे.
लेखक..
आप्पासाहेब भिमराज ढूस 
देवळाली प्रवरा ता. राहुरी जि. अहिल्यानगर
close