गुन्हा दाखल झाल्यानंतर सतरा तासांनी शवविच्छेदन..
जामखेड प्रतिनिधी..
जामखेड तालुक्यातील नायगाव येथे घरबांधणी आणि विहीर खोदण्यासाठी पाच लाख रुपये देण्याच्या मागणीसह सतत मानसिक छळ होत असल्याने तरुण आईने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले. या प्रकरणी पती, सासरे, ननंद आणि नंदावा अशा चार जणांविरुद्ध खर्डा पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून एकच खळबळ उडाली आहे.
घटनेचा क्रम
दि. ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता रूपाली नाना उगले (वय २५) हिने मुलगा समर्थ (वय ६) आणि मुलगी साक्षी (वय ४) यांच्यासह घराजवळील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. रात्री आठ वाजता तिन्ही मृतदेह जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. मात्र माहेरकडील नातेवाईकांनी आरोपींवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय शवविच्छेदनास नकार दिला.
शनिवारी सकाळी खर्डा पोलीस ठाण्यात रूपालीच्या पती नाना प्रकाश उगले, सासरे प्रकाश पंढरीनाथ उगले (रा. नायगाव, ता. जामखेड), ननंद मनिषा शिवाजी टाळके व नंदावा शिवाजी गोरख टाळके (रा. राळेसांगवी, ता. भूम, जि. धाराशिव) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता शवविच्छेदन करून सायंकाळी पाच वाजता नायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
फिर्यादीचे म्हणणे
शिवाजी श्रीरंग सकुंडे (वय ५०, रा. राळेसांगवी, ता. भूम) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रूपालीचा विवाह आठ वर्षांपूर्वी नायगाव येथे झाला. विवाहानंतर दीड वर्ष संसार सुरळीत होता. त्यानंतर पती नाना आणि सासरे प्रकाश यांनी तिला माहेरी येऊ देत नव्हते, नातेवाईकांना भेटू देत नव्हते तसेच सतत पैशांची मागणी करीत होते. दोन लाख रुपये देऊनही त्रास थांबला नाही.
रूपालीची सासू दोन वर्षांपूर्वी निधन पावल्यानंतर ननंद-नंदावा सतत तिच्या संसारात ढवळाढवळ करीत, घरकाम व्यवस्थित करत नाहीस, पतीकडे लक्ष देत नाहीस, चांगला संसार केला नाहीस तर दुसरे लग्न लावून देऊ अशी धमकी देत असत. तसेच घरबांधणी व विहीर खोदण्यासाठी आणखी पाच लाख रुपये मागितले जात होते.
माहेरकडील मंडळींनी अनेकदा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण परिस्थितीत काहीही सुधारणा झाली नाही. रूपाली आपल्या दोन मुलांच्या भवितव्याकरिता छळ सहन करीत होती, मात्र सततच्या धमक्या आणि मानसिक त्रासामुळे अखेर तिने मुलांसह आत्महत्या केली.
पोलिसांची कारवाई
खर्डा पोलीसांनी या चारही आरोपींवर भादंवि कलम ३०६, ३४ अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.